हिरव्यागार पुदिन्याचा दरवळ आसमंतात पसरला की डोळे आपोआप
बंद होतात...
आपण दीर्घ श्वास घेऊ लागतो…
….आणि तो सुगंध श्वासात मिसळून आपल्या
मेंदूला शांत करण्याचं काम करू लागतो.
काय? मेंदूला शांत करू लागतो? नक्कीच तुमची प्रतिक्रिया अशी
झाली असेल. हो ना? आजवर सर्दी, खोकला
झाला, अपचन झालं की पुदिना वापरायचं हे तुम्हाला माहित आहेच. तुम्ही म्हणाल की पुदिन्याचा
सुगंध आवडतो म्हणून तो मेंदूला शांत करतो या निष्कर्षावर तू कशी काय आलीस बुवा!
नाही हां... मी पदरचं सांगत नाहीये. खरंच आहे ते. पुदिन्याच्या त्या उग्र सुगंधातच
त्याचं हे इंगित लपलं आहे. पुदिन्याचा हाच उग्र सुगंध एरोमा थेरपीमध्ये प्रामुख्याने
वापरला जातो. एखाद्या माणसाला नैराश्य आलं असेल तर त्याला पुदिन्याचा चहा दिल्याने
त्यांच्या सुगंधाने त्याचं नैराश्य कुठल्या कुठे पळून जातं, अगदी पुदिन्याचा आलं,
काळीमिरी, लवंग आणि तुळशीची चार पानं घातलेला गुळाचा चहा जशी सर्दी, खोकला गायब
करतं ना अगदी तसंच. एवढंच नाही तर पुदिन्याचा मेंदूवर आणखी एक चांगला परिणाम होतो
तो म्हणजे आपली स्मरणशक्ती चांगली होते. आता हे तुम्हाला अगदीच अति वाटत असेल. पण
हे ही खरं आहे.
स्मरणशक्ती वाढीसाठी पुदिना सोपा उपाय :
तुमची स्मरणशक्ती काही कारणाने कमी झाली असेल तर तुम्हाला तुमच्या
कामात खूप अडचणी येत असतील. कालच्या गोष्टी आज आठवत नसतील; उद्याच्या कामांची
तयारी काय करायची कळत नसेल, एका जागी व्यवस्थित ठेवलेल्या वस्तू नेमक्या कोणता
जागी व्यवस्थित ठेवल्या आहेत किंवा कोणत्या वहीत कुठे टिपण करून ठेवलं आहे आठवत
नसेल; विद्यार्थी असाल चांगलीच गोची होत असेल. यावर काहीतरी उपाय करावा म्हणून तुम्ही ध्यान
धारणा, दीर्घ श्वसन, प्राणायाम, माइंडफुलनेस असे काही उपचार करत असाल. शिवाय
इंटरनेट वर उपलब्ध माहिती वाचत असाल. अगदीच जास्त त्रास वाटत असेल तर डॉक्टरांकडे
जाल. डॉक्टर यासाठी तुम्हाला ब्राम्ही, अश्वगंधा, जीन्सिंग अशी काही प्रतिष्ठित औषधं
घ्यायला सांगतील. तुम्हाला त्या नावांनीही बरं वाटेल. ही औषधे अत्यंत परिणामकारक
तर आहेतच पण ती विशिष्ट पद्धतीने म्हणजे पावडर असल्यास ती योग्य प्रमाणात पाण्यात
मिसळून किंवा गोळ्यांच्या स्वरुपात घ्यावी लागतात. त्यामुळे ही प्रक्रिया नाही
म्हटली तरी किचकट आणि औषध घेतल्याचा फील
देणारीच असतात. त्यामुळे तुम्हाला काहीतरी आजार झाला आहे असं तुम्हाला उगीच वाटतं.
पुदिना या सगळ्यात तुम्हाला अडकवत नाही. कारण पुदिन्याचं सेवन तुम्ही रोजचं जेवण
किंवा चहापाणी केल्यासारखं अगदी घरगुती पद्धतीने करू शकता आणि त्याने सुद्धा तुमची
स्मरणशक्ती वाढू शकते. कसं ते पाहूया.
पुदिन्याचे कार्य :
पुदिन्यात पॉलीफेनॉल ह्या वर्गाचे फायटोकेमिकल्स असतात. सर्वच
हिरव्या भाज्यांमध्ये फायटोकेमिकल्स असतात जे सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांपासून,
किड्यांपासून आणि प्रदूषणापासून त्या त्या वनस्पतीला वाचवते. पेशींना झालेले
नुकसान भरून काढणे हे पॉलीफेनॉल ह्या फायटोकेमिकलचे मुख्य काम. तुमच्या मेंदूच्या नुकसान
ग्रस्त पेशींमुळे झालेले अनाकलनीय किंवा नुकसान करणारे बदल पॉलीफेनॉलची संयुगं भरून
काढतात आणि पेशी निर्मिती पूर्ववत होऊ शकते. यामुळेच मेंदूमध्ये सतर्कता वाढते आणि
त्या सोबतच आकलनशक्तीही वाढते.
असा होतो उपयोग :
स्मरणशक्तीचे म्हणजेच लक्षात ठेवण्याचे मुख्य काम सतर्कता आणि आकलनशक्ती यामुळेच होत असते. जसे की पुदिन्याचा रस पिणाऱ्या एखाद्या दहावीच्या मुलाने त्याचे गणिताचे प्रमेय शिकले तर त्याची आकलनशक्ती वाढल्यामुळे ते त्याच्या लक्षात राहते. याशिवाय सतर्कता वाढल्यामुळे त्याला ते किती वेळात सोडवायचे आहे याचे भान राहते. शिकलेल्या प्रमेयापेक्षा वेगळा प्रश्न आला तरी तो सतर्कता आणि आकलनामुळे तो ते प्रमेयही सोडवतो. अशा प्रकारे पुदिन्याची संयुगे आपले काम चोख बजावतात.
जंतुनाशक पुदिना :
पुदिन्यात असलेल्या मेंथोल या अँटीसेप्टीक आणि
अँटीबॅक्टेरियल म्हणजेच जंतुनाशक नाशक आणि जिवाणू नाशक तेलामुळे पुदिना दररोज
खाल्ल्याने पचनासाठी आवश्यक असणारे एन्झाइम्सना चालना मिळते. त्यामुळे पचन
सुधारते, पचन शक्ती वाढते आणि खाल्लेल्या प्रत्येक पदार्थातील पोषक द्रव्ये योग्य
रित्या शरीरात शोषली जातात. पचन सुधारल्यामुळे अर्थातच चरबी जमण्याची शक्यता कमी
होते आणि वजन वाढलेले असल्यास ते घटण्यास सुरुवात होते. यामुळेच बॅड कोलेस्टेरॉलही
कमी होतात. याशिवाय पुदिना हा दाह शामक असल्यामुळे किडलेल्या दातांवर उपचार होतो
आणि अँटीबॅक्टेरियल असल्यामुळे तोंडातून येणारा घाण पुदिन्याची पाने खाल्ल्याने
येत नाही. वरील सर्व उपचारांसाठी इतर वनस्पती सुद्धा आहेत पण पुदिना ह्या सर्वात सर्वात
स्वस्त, सहज उपलब्ध होणारी आणि पाहिजे त्या पद्धतीने सेवन करता येणारी वनस्पती
आहे. एकदा २० रुपयाची पुदिन्याची जुडी आणली की ती एका माणसाला आठवडा भर पुरते. २०
रुपयाची ही लोह, कॅल्शियम, पोटॅशियम मॅग्नेशियम, मॅन्गेनीज, विटामिन ए, सी, बी 6, फोलेट,
रायबोफ्लेविन असे उपयुक्त घातक असलेली पाने तुमच्यासाठी नक्कीच सोने ठरतील.
पुदिन्याची आरोग्यवर्धक रेसिपी :
1. पोट खराब असल्यास पुदिन्याची चार पानं चघळून गिळावी.
2. शरीरशुद्धीसाठी डिटॉक्स पाणी प्रकार १ - मुठभर पुदिन्याची
पानं, बडीशेप आणि खडी साखर किंवा गुळासोबत उकळून ते डिटॉक्स पाणी दिवसभर प्यावे.
3. शरीरशुद्धीसाठी डिटॉक्स पाणी प्रकार २ - पुदिना, आलं आणि लिंबाचे चार गोल काप चार – पाच तास काचेच्या भांड्यात पाण्यात ठेऊन मग ते डिटॉक्स पाणी गाळून दिवसभर प्यावे. हा वीडीयो नक्की पहा.
4. मिंट टी / ग्रीन टी – एक ग्लास पाण्यात लिंबाएवढा गूळ, तीन
काळेमिरी + दोन लवंगा + एक इंच आलं एकत्र ठेचून, २० पाने पुदिना, १० तुळशीची पाने
घालून ते अर्ध होईतो उकळावे. सकाळी गरम गरम चहा प्यावा. यात अर्धा चमच चहा टाकून
काळा चहा करून पिऊ शकता.
5. पुदिना टाकलेलं पाणी उकळून ते प्यावं.
पुदिन्याची लागवड :
पुदिन्याची लागवड घराच्या घरी करू शकता. पुदिन्याच्या पाच – सहा कड्या घ्या. त्या काड्यांवर खाली असलेली पाने कात्रीने देठापासून कापून घ्या. वरच्या भागात चार पाच पाने राहू द्यावीत. मग ह्या काड्या एका छोट्या प्लास्टिकच्या (प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीचा खालचा काप) भांड्यात पाण्यात १० ते १२ दिवस ठेवावीत. ह्या काड्यांना वर काही पानेही येतात आणि त्यांना मुळंही आलेली असतात. मग ह्या काड्या एका कुंडीत गार्डनची माती टाकून त्यात काड्यांसाठी भोकं करून त्यात एक एक कडी मुळांसकट लावावी. ही कुंडी सकाळचे ऊन येईल अशा ठिकाणी ठेवावी. २५ दिवसात पुदिना फुललेला आपल्याला दिसेल. पुदिना बागेत किंवा मोकळ्या जागेत लावू नये. पुदिना ही आक्रमक वनस्पती आहे. तो जिथे लावाल तिथल्या जमिनीवर पसरून तो झपाट्याने वाढेल. म्हणून कधीही मोठ्या कुंडीत पुदिना लावणे सोईचे असते.
अधिक माहितीसाठी हा वीडीयो पहा.
तर अशा प्रकारे स्वत:च्या कुंडीतील पुदिना तुम्ही वापरू
शकता. पुदिन्याच्या इतर सर्व फायद्यांसह स्मरणशक्ती वाढवण्याचा फायदा ‘लक्षात ठेवा’
म्हणजे झालं. पुदिन्याची चटणी, चहा किंवा ग्रीन टीचा मनमुराद आनंद घ्या आणि लक्षात
ठेवा की तुमच्या लक्षात आता सर्व काही राहणार आहे.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.