सौजन्य : टाटा ट्रस्ट होरायझन |
रत्नखचित अशी जरी
मणिपूरची ओळख असली तरी मणिपूरमध्ये लौकिक अर्थाने रत्नांच्या खाणी नाहीत पण जे
सौंदर्य मणिपूरला लाभलं आहे ते रत्नांच्या पर्वतापेक्षा कमी नाही. तशी भारताच्या उत्तर पूर्व भागावर निसर्गाची जितकी मुक्तहस्ते उधळण झालेली आहे तितकेच
त्याकडे आपलं अक्षम्य दुर्लक्षही झालेलं आहे. यामुळेच की काय फक्त पर्यटन स्थळ
म्हणून आपण ज्याकडे पाहतो अशा या राज्यांच्या स्वत:च्याही काही गरजा आहेत याचा
आपल्याला विसरच पडला आहे. खरं तर महानगरांमध्ये प्रचंड औद्योगिक प्रगती होत असताना,
आधुनिक वसाहती वसत असताना आपल्याकडेही त्या आल्या पाहिजेत, शेतीत चिखलात काम
करण्यापेक्षा एसीच्या ऑफिसमध्ये बसून आपल्यालाही ऑर्डर सोडता आली पाहिजे अशी
कोणत्याही ग्रामीण माणसाची अपेक्षा असू शकते. किंबहुना आपण निसर्गाचे कितीही गोडवे
गात असलो तरी वर्षाचे ११ महिने आणि १५ दिवस एसीत बसणार आणि वर्षातल्या १५
दिवसांपेक्षाही कमी दिवस ह्या प्रदेशांमध्ये जाऊन प्राणवायू भरून येणार. अशा वेळी
तिथल्या स्थानिक लोकांना शहरी जीवनमानाचं आकर्षण वाटलं तर त्यात नवल काय!
आज जर
आपल्यापैकी कोणाला मणिपूरमध्ये जाऊन पर्यटनाचा
व्यवसाय कर, गाईड म्हणून काम कर असं सांगितलं तर ते कोण करेल? दहातला एखादा किंवा
एखादी तयार होईलही. म्हणजेच अशा निसर्ग सौंदर्याची गरज आपल्याला फक्त थोडा निवांतपणा
मिळवून देण्यापुरती असते; बरोबर? ह्या ठिकाणी गेलो की आपल्याला ओरिजिनल इंडीजिनस
फील येतो पण तो गावकरी त्याच निसर्गाच्या सान्निध्यात, प्रदूषण मुक्त अशा परिसरात एक
माणूस म्हणून तो छान जगत असतो; पण बाकीच्या जगाशी जोडण्यासाठी ज्या गोष्टी त्याला
आवश्यक असतात त्या मात्र तुटपुंज्या असतात किंवा विजेसारख्या घटकांनी पर्यावरणाला धोका
पोहोचेल म्हणून तो वीजही वापरत नाही. मणिपूर मधील बिष्णूपूर जिल्ह्यात असणाऱ्या
लोकटेक ह्या प्रसिद्ध तलावाच्या काठावर राहणारे कोळी लोक मासेमारी करून तुटपुंज्या
मिळकतीवर जगत होते. मग त्यांनीच बॅगपॅक करून हुंदडायला निघालेल्या पर्यटकांसाठी आपल्या
तरंगणाऱ्या घरांमध्ये ‘होम स्टे’ नावाचा अफलातून अनुभव देणारी संकल्पना राबवायला
सुरुवात केली. पण शहरातून येणाऱ्या भटक्यांना घासलेटचा दिवा चालेलच असं नाही. शिवाय
बाकीच्या गोष्टींनाही वीज लागते. ही गरज ओळखूनच टाटा ट्रस्टने त्यांना ह्या
मणिपूरकरांना सौर्य उर्जेची साधने देऊ केली आहेत. याचा फायदा अर्थातच पर्यटन
वाढण्यात झाला. तिथल्या लोकांचे जीवनमान उंचावू लागले आहे.
ही सौर्य उर्जेची वीज
आणि इतर पारंपारिक पद्धतीने (कोळसा आणि पाणी) आता गावागावातही पोहोचून तिथे नेमके
काय बदल होत आहेत ते प्रत्यक्ष पाहिलं आहे आपले मित्र कुंदन राऊत यांनी....
त्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दात. ....
बरेच दिवसांपासून मणिपूर मधील आमचे माजी सैनिक मित्र घरी बोलवत होते. मलाही मणिपूर मधील निसर्ग व शेती विषयी जाणून घ्यायच होत, अभ्यास करायचा होता म्हणून मी मणिपूर, इंफाळ व थोडे आजूबाजूला मित्रांसोबत फिरलो.
मला कुठलेही विशेष शहर पहाण्यात अजिबात रस नव्हता. आजूबाजूच्या गावात तसेच म्यानमार बॉर्डर पर्यंत गेलो. लोकटाक सरोवरात तरंगत्या गवत बांबूच्या झोपडीत राहिलो. खरंच मणिपूर मधील ग्रामीण भाग अजूनही खूपच सुंदरआहे. प्रदूषण नाही, डोंगर, जंगल नद्या सर्व काही अजूनही व्यवस्थित आहे. अनेक गावात अजूनही सुंदर मातीची घर दिसली. आजही इथले लोक गवता पासून, बांबूपासून वस्तू बनवतात. तसेच अनेकठिकाणी हातमागावर कपडे तयार करणेही सुरु आहेत. मित्राच्या घरी आजही हातमागावर कापड बनत होते. एक एका हातमागाला इलेक्ट्रिक मोटार लावली होती; हे चूक आहे आणि त्यांनी त्यांनी ही चूकही मान्य केली हे त्यांच्या मनाचे मोठेपण आहे. वीज किती विनाश घडवते हे त्यांनाही लक्षात आले आहे.
कुंदन राऊत यांच्या कॅमेऱ्यातून |
घरंही माती आणि लाकडाची आहेत. आर्थिक परिस्थिती ठीक असली तरी इथल्या लोकांनी Rcc घर बांधणे अजूनही टाळले आहे हे पाहून बरं वाटलं. पण तिथेही मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रीटच्या इमारती बांधायला सुरुवात झाल्यामुळे निसर्गाचा ऱ्हास सुरु झाला आहे. शेतात रासायनिक खतांचा व कीटकनाशक वापर चालू आहे.
मणिपूरमध्ये जैवविविधता भरपूर आहे, रानभाज्या व इतर जीवांची विविधता पण भरपूर आहे. त्यावरून निसर्ग अजूनही किती शुद्ध स्वरुपात आहे हे लक्षात येते.
मणिपूर या रत्नखचित राज्यात अप्रतिम निसर्गसौंदर्य आहे पण ते ग्रामीण भागातच. शहरांना विकासाच्या नावावर प्रदूषणाने वेढलं आहे हे वेगळं सांगायला नको. इथल्या लोकांनी आत्ताच हा तथाकथित विकास थांबवला नाही तर पुढे मुंबई पुण्यासारखी ‘माघारी फिरूच शकत नाही’ अशी अवस्था येईल. विषय मोठा आहे; थोडक्यात थांबवतो. धन्यवाद! थोडे फोटो व्हिडीओ पण शेअर करतो.
- कुंदन राऊत
--------------------------------------
या माहितीसाठी कुंदन राऊत यांचे आभार.
मणिपूर मध्ये सिनो तिबेटन या हिमालयन वर्गातील तिबेटो – बर्मन भाषा बोलली जाते. मणिपूर हे राज्य अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड या राज्यांसह सेवन सिस्टर्स म्हणून ओळखले जाते. आता यात आठवी सिस्टर म्हणजे सिक्कीमचाही समावेश झाला आहे. मणिपूर आणि या सात भगिनींविषयी आणखी माहिती आपण पुढील लेखात घेणार आहोत. नक्की वाचा.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.