शीर्षक वाचून तुम्हालाही असंच वाटतं ना? ९० टक्के स्त्रियांना हेच वाटत असतं. यात गैर काहीच नाही. तुम्हाला घरातली कामंच इतकी असतात की ती कामं उरकताना तुमच्या नाकी नऊ येतात. सकाळी उठल्यापासून ते रात्री बिछान्याला पाठ टेकेपर्यंत तुम्हाला क्षणाचीही उसंत नसते. तुम्ही इतक्या थकून जाता की ‘तुम्ही व्यायाम का करत नाही?’ असा प्रश्न तुम्हाला विचारायचा म्हणजे तुमच्यावर अन्याय केल्यासारखंच होईल. तुम्ही गृहिणी असा की घरावाहेर पडून काम करणाऱ्या असा, दोन्ही स्त्रियांच्या बाबतीत हे जगणं सारखंच असतं. पण अशी घरातली कामं म्हणजे व्यायाम नाही. घरातली कामं निव्वळ कर्तव्य असतं, ते तुम्ही तुमच्यासाठी कमी आणि तुमच्या कुटुंबियांसाठी जास्त करता. पण ‘व्यायाम’ तुम्ही केवळ तुमच्यासाठी करता. मला माहित आहे, तुम्ही ही गोष्ट उडवून लावाल. म्हणूनच काही गोष्टींचा खुलासा मी करणार आहे.
Courtsey : Istock |
मला सांगा, तुम्ही एवढी कामं करून सुद्धा तुमचं पोट कसं काय सुटतं? मांड्यांवर, हातांच्या दंडांवर चरबी साठून कालांतराने ती लटकू कशी लागते? पाठ, कंबर, गुडघे कादुखतात? आता यावर तुमच्याकडे अनेक उत्तरं असतील. यातील मुख्य म्हणजे प्रचंड सासुरवास आणि दुसरं म्हणजे बाळंतपणं. ही सगळी टाळता न येणारी कारणं आहेत, हे मला मान्य आहे. पण हे सगळं जेव्हा नसतं तेव्हा तुम्ही काय करता? म्हणजे सासू सतत काही कामं सांगत असेल किंवा घरातील कामाला हात लावत नसेल तर ती कामं तुमच्यावरच पडणार. पण ती कामं झाल्यावर तुम्ही एखाद्या कोपऱ्यात कधी पाच मिनिटं एखादा शाळेत शिकलेला व्यायाम प्रकार केला आहे का? हो शाळेत शिकलेलाच, व्यायाम करायला जिममध्येच जायला पाहिजे, योगासनांचे, जुम्बाचे क्लासेसच लावले पाहिजेत असं काही नाही. शाळेत शिकलेले प्रकार सर्वात उत्तम व्यायाम प्रकार असतात. कारण ते मुलांची वाढ नीट व्हावी याच उद्देशाने त्यांच्याकडून करून घेतले जातात. या व्यायामांमुळे शरीराचे स्नायू ओढले जातात, त्यांच्यामुळे शरीराला आकार आणि ऊर्जाही मिळते. तुम्ही दिवसभर कामं केली आणि रात्री जरी यातील काही व्यायाम केले तरी तुम्हाला अगदी मोकळं मोकळं वाटेल.
काही लोक म्हणजे फक्त पुरुष नाही तर बायका सुद्धा म्हणतात की, पूर्वी बायका जात्यावर दळायच्या, पाट्यावर चटण्या, मुसळात मसाले वाटायच्या, लांब लांबून पाणी आणायच्या, चुलीवर जेवण बनवायच्या यामुळे त्यांच्या शरीराचे व्यायाम व्हायचे म्हणून त्या स्त्रिया छान शेवगीच्या शेंगेसारख्या असायच्या. हे एक मिथक आहे. खरं तर यात स्त्रीचं शोषण व्हायचं, तिच्या अंगावर मांसच उरायचं नाही, शिवाय बाळंतपण झालं नाही की घरातल्या कामाला जुंपली जायची. अशी स्त्री बसून रहात नव्हती. त्यामुळे ती बारीक व्हायची. आजही गावागावात अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांच्या हाडांची काडं झाली आहेत. बारीक होणं म्हणजे सुदृढ असणं नाही तर ते कुपोषित असणं असतं. म्हणूनच आज आधुनिक युगात वैज्ञानिक प्रगतीमुळे सर्वात जास्त दिलासा कोणाला मिळाल असेल तर तो स्त्रीला. हेच काही मतलबी लोकांना खटकतं. काही सासवा याचाच गवगवा करतात. आम्ही असं केलं नी तसं केलं सांगून तुम्ही सून म्हणून किती कुचकामी आहात, तुम्ही गृहिणी म्हणून नालायक आहात हे बिंबवण्यासाठी आणि तुमच्याकडून काम करून घेण्यासाठी त्या असं म्हणतात. पण हे प्रमाण ग्रामीण आणि शहरी भागात आता कमी झालं आहे हेही चांगलं दृश्य आहे. याला कारण आताच्या सासवांनी सुद्धा वैज्ञानिक प्रगतीचा लाभ घेतला आहे आणि त्यांना बाईचं जिणं माहित आहे. म्हणूनच आता दोघींनी मिळून व्यायाम केला पाहिजे.
घरातली कामं करताना तुम्ही एका लयीत करत नाहीत. इथे वाक, तिथे वाक, पाय उंच करून फडताळावरून डबे काढ, कपडे पाण्यातून विसळून काढ अशी कामं गरज असेल तेव्हा आणि तेवढीच केली जातात. पण व्यायाम करताना तुम्ही एखादा प्रकार १० वेळा किंवा १५ वेळा असे ३ सेट करता, तुमच्या श्वासावर तुमचं लक्ष असतं. तुमचे पाय आणि हात एका विशिष्ट लयीत हलतात. व्यायामादरम्यान तुम्ही योग्य तेवढा आराम सुद्धा आपल्या स्न्यायुंना देता. यामुळे तुम्हाला पुरेसा घाम येतो आणि तुम्ही आवश्यक तेवढं पाणी पिता. भूक चांगली लागते. दोन घास जास्त खाता. झोप चांगली लागते. मेंदूला आणि मनाला शिस्त लागते. मन भरकटण्याचं प्रमाण कमी होतं, शरीराची ठेवण सुधारते, हात पाय दुखाण्याचं, सर्दी खोकला असले लहान सहान आजार होण्याचं प्रमाण कमी होतं. शिवाय घरात प्रतिष्ठा वाढते, मुलं तुम्हाला बघून स्वत: व्यायाम करू लागतात. आणि हे सर्व फक्त १० ते १५ मिनिटांच्या व्यायामाने साध्य होतं. ह्या सर्व गोष्टी तुम्ही दिवसभर काम करून साध्य करता काय? करा विचार.
इथे आणखी एक गोष्ट नमूद करायची आहे. ते म्हणजे चालणे हे सर्वात उत्तम व्यायाम आहे. त्यामुळे तुम्ही सकाळी चालायला जात असाल तर ते चांगलंच आहे पण तुम्ही खरंच एक व्यायाम म्हणून चालता का? मैत्रिणींशी किंवा रस्त्यात कोण भेटेल त्याच्याशी गप्पा मारत चालता ना! यामुळे तुमच्या मेंदूपर्यंत जे व्यायामाचे संकेत पोहोचायला पाहिजेत ते पोहोचत नाही आणि तुमच्या चालण्याचे योग्य ते परिणाम होत नाहीत. कानात इअरफोन लावून चालणं सुद्धा यासाठीच परिणामकारक ठरत नाही. उलट तुम्ही २० मिनिटं फक्त आपल्या आजूबाजूच्या परिसराचा आस्वाद घेत चाललात तर तुमच्यावर सकारात्मक परिणाम होतात. तुम्हाला चालण्याचा व्यायाम केल्याचं समाधान मिळतं.
वर सांगितल्याप्रमाणे तुम्ही चालण्याचा व्यायाम करत असाल तरी थोडावेळ शारीरिक व्यायाम नक्की करा. यामुळे शरीराच्या प्रत्येक भागाला ताण देऊन त्याला मोकळं करता येतं. यामुळे फक्त शरीर नाही तर मनही उल्हसित होतं. म्हणून काहीही झालं तरी थोडा व्यायाम करा आणि स्वत:ला आनंदी ठेवा.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.