कला कुठे जन्म घेईल, कुठे आकार घेईल सांगता येत नाही. मुंबई ही तर कलांची जननी. इथे कला निपजते आणि बहरतेही. निलेश मोहितेच्या बाबतही हेच घडलं. तो हाडाचा चित्रकार. त्याची कला जन्मली ती मुंबईच्या कुलाबा परिसरातील झोपडपट्टीत. त्यानेही आपली कला जोपासली आणि आज त्याच्या चित्रांवर ताज चढणार आहे तेही मुंबईतील ताज महाल पॅलेस हॉटेलच्या आर्ट गॅलरीत.
निलेश मोहिते म्हणजेच सोनू हा कुलाबा येथील कफ परेड परिसरातील मच्छिमार नगर झोपडपट्टीत राहणारा २९ वर्षीय गरीब, होतकरू तरुण. लहानपणीच त्याच्या वडिलांनी आपल्या पत्नी आणि मुलांशी फारकत घेतल्यामुळे निलेश आपलं शालेय शिक्षणही पूर्ण करू शकला नाही. कसा बसा रात्रशाळेत शिक्षण घेऊन तो ९वी पर्यंत शिकला. वडिलांच्या पाठींब्याअभावी आईनेच चार घरची धुणीभांडी करून निलेश आणि त्याच्या बहिणीचं पालनपोषण केलं. मात्र आईला ही कामं करावी लागू नयेत म्हणून निलेशही वेगवेगळ्या ठिकाणी पार्ट टाईम नोकरी करूलागला. याच दरम्यान जेजे स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना तो चित्रं काढताना पहायचा. त्याच्यात एकलव्य घडू लागला होता. त्याला चित्रकलेचा छंद जडला आणि पुढे त्याने ही कला शक्य तशी जोपासली. याच दरम्यान त्याचं एक चित्रं विकलं गेलं आणि त्याची ही कला त्यांच्या उदरनिर्वाहाचंसाधनही होऊ शकतं हे त्याच्या लक्षात आलं. त्याने आपली चित्रं छगन भुजबळ, विजय दर्डा यांच्यासारख्या महनीय लोकांना विकली आहेत. पण निलेशचं स्वप्न आणखी वेगळं होतं.
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा हे निलेशचे आदर्श. त्यांना भेटण्यासाठी जवळपास वर्षभर तो ताज हॉटेलच्या प्रवेशद्वारावर उभा रहायचा. अखेर एक दिवस रतन टाटा यांनी त्याला पाहिलं आणि बोलावून घेतलं. रतन टाटा यांचं विमानात चढतानाचं एक चित्र रतन टाटा यांना भेट म्हणून दिलं. या तरुणाची कला पाहून टाटा प्रभावित झाले. त्याच्याशी बोलताना त्याची बिकट परिस्थिती रतन टाटा यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला मोठ्या रकमेचा चेक देऊ केला आणि ‘या पैशातून मोठं घर घे,’ असं म्हणाले. पण भेटवस्तू म्हणून दिलेल्या चित्राचे पैसे घेणं निलेशला मान्य नव्हतं म्हणून निलेशने तो चेक नम्रपणे नाकारला. त्याची नम्रता पाहून रतन टाटांनी त्याला विचारलं की, ‘मग तुझ्यासाठी मी काय करू शकतो?’ त्यावर निलेशने चित्रप्रदर्शनासाठी जागा देण्याची आणि तुम्ही त्या प्रदर्शनाला भेट द्यावी अशी मागणी केली. अर्थात ती मागणी लगेच मान्य झाली... आणि आता २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत निलेश मोहितेच्या चित्रांचं प्रदर्शन मुंबईमधील कुलाब्याच्या ताजमहाल पॅलेस हॉटेलच्या गॅलरीत पार पडत आहे. वेळ आहे सकाळी ११.०० ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत.
निलेशचा हा प्रवास एवढा सोपा नव्हता. या कठीण काळात निलेशला भेटल्या जनता दल (सेक्युलर) पक्षाच्या मुंबई महासचिव ज्योतीताई बडेकर. ज्योतीताईंनी सर्वात प्रथम त्याचा आत्मविशास वाढवला. लोकांशी संपर्क कसा करावा, त्यांच्याशी संवाद कसा करावा याविषयी मार्गदर्शन केलं. ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये प्रदर्शनाची निश्चिती झाल्यावर चित्र काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू विकत घेणं हे निलेश समोर एक मोठं आव्हान होतं. पण ह्या संपूर्ण खर्चाची तजवीज त्याची प्रेरणास्थान असलेल्या ज्योतीताईंनी करून दिली आणि संपूर्ण लक्ष चित्रांकडे दे असं सांगितलं. यासोबत निलेशच्या आई लता मोहिते यांचं खंबीर पाठबळ त्याला होतंच. शिवाय उद्योगपती मर्जी पारख यांनीही अमूल्य मदत केली. या सर्वांच्या अनमोल मदतीमुळे निलेश आपली चित्रे कॅनव्हासवर उतरवू शकला.
झोपडपट्टीतील लाजराबुजरा, कमी शिकलेला, चित्रकलेचं कोणतंही प्रशिक्षण न घेतलेला परंतु उच्च प्रतिभेची नैसर्गिक देणगी लाभलेला तरुण आज मुंबईमधील कुलाबा येथील जगप्रसिद्ध ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये आपले चित्रं प्रदर्शन भरवत आहे. अनेक उद्योगपती आणि सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर या प्रदर्शनाला उपस्थित राहणार आहेत. आपणही या प्रदर्शनाला उपस्थित राहून या तरुण चित्रकाराचा उत्साह वाढवावा.
2 Comments
खूपच छान.....
ReplyDeleteअभिमान वाटतो.
झोपडपट्टीत राहणाऱ्यांबाबत तिरस्कार जपणाऱ्यांनी....ह्यातून बोध घ्यावा...
Thank you so much.
DeletePost a Comment
Please do not add any spam link in the comment box.