Read how 1% Rich Emits more carbon than 99% poor.
आर्थिक विकासामुळे गोरगरिबांना रोजगार मिळतो अशी एक आशादायक कंडी सगळीकडे पिकवली जाते. पण त्या गोरगरिबांना मिळणाऱ्या रोजगाराच्या बदल्यात त्यांच्या जगण्याच्या बाबतीत किती वाताहत लावली जाते हे ह्या विकास साधकांच्या लक्षात का येत नाही? जागतिक स्तरावरच्या अभ्यासात नमूद केलं आहे की जगातील १ टक्का लोक पर्यावरणाला अधिकाधिक घातक परिस्थितीत ढकलत आहेत. याचं उत्तर आपल्याला एका परीक्षणावरून मिळेल, ते असं की आफ्रिकेच्या उप सहारा वाळवंटी भागात १.६ टन कार्बन उत्सर्जन होतं तर उत्तर अमेरिकेसारख्या सधन भागात हे प्रमाण ७० टन एवढं आहे.
कार्बन ब्रीफ या पर्यावरणाला समर्पित पोर्टल वरील ‘Top 1%’ of emitters
caused almost a quarter of global emissions since 1990 ह्या एका लेखात म्हटलं आहे की, श्रीमंत फक्त स्वत: कार्बन उत्सर्जन करत नाहीत तर ते कार्बन उत्सर्जन करणाऱ्या स्त्रोतांमध्ये सहभागही नोंदवतात. म्हणजेच ते उद्योगधंद्यांची निर्मितीही करतात. त्यामुळे ह्या एक टक्का असलेल्या श्रीमंतात हे कार्बन उत्सर्जन २६ टक्के आहे. कार्बन ब्रीफच्या “Eradicating ‘extreme poverty’ would raise global
emissions by less than 1%” या अभ्यासपूर्ण लेखात म्हटलं आहे की श्रीमंतांची जीवनशैली ही अधिक कार्बन उत्सर्जन करणारी असते. हे जागतिक सत्य आहे. वाळवंटी प्रदेशात राहणारा एक माणूस वर्षाला ०.६ टन कार्बन उत्सर्जन करतो तोच अमेरिकेतील अगदी मध्यमवर्गीय म्हणवणारा माणूस सुद्धा १४.५ टन कार्बन उत्सर्जन करतो. ही फक्त एक ढोबळ आकडेवारी आहे त्यामुळे आपण ह्या जागतिक आकडेवारीत न घुसता आपल्या मुंबईत काय चालू आहे ते पाहूया.
सरकारने मोठा गाजावाजा करून एसी बसेस मुंबईत सुरु केल्या. “आता बसचा प्रवास होणार थंडगार” अशा बातम्याही झळकल्या. त्यावेळी त्या बसमधून किती कार्बन उत्सर्जन होतं हे आतापुरतं बाजूला ठेवूया. या बसमधून पिक आवर म्हणजे ऑफिसेसच्या वेळात आणि ऑफिसेस सुटण्याच्या वेळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा कधी विचार केला आहे का? या बसमधून माणसं अगदी कोंबून भरलेली असतात. मागची बस कधी येईल आणि मग ऑफिस किंवा घरी पोहोचायला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही म्हणून त्या एसी बसमध्ये प्रत्येक जण घाम पुसत, दुखरे पाय बदलत, खांद्यावरची बॅग सांभाळत हे दादा/ताई प्रवास करत असतात. हे जिणं उद्या पुन्हा जगायचं असतं. याला कारण असतं ते ट्राफिक जाम.
श्रीमंत, निमश्रीमंत, नवश्रीमंत आणि होतकरू श्रीमंतांच्या गाड्यांनी रस्ते व्यापलेले असतात. यात श्रीमंत आणि नवश्रीमंतांच्या पर्सनल कार्स असतात. नवश्रीमंत ओला आणि उबरमधून प्रवास करतात. होतकरू श्रीमंत रिक्शा, टॅक्सीने प्रवास करतात. या सर्व प्रकारांमध्ये अदमासे एक किंवा दोन प्रवासी आणि एक ड्रायव्हर एवढेच लोक त्या त्या वाहनात असतात. बस नावाची करंजी मात्र “सर्व काही गोड” मानत रस्त्यातून खड्डे, सिग्नल यांच्याशी सलगी करत चाललेली असते. ट्राफिकमध्ये कार मधले सर/मॅडमसुद्धा अडकलेले असतात आणि बस मधले दादा ताई सुद्धा. पण त्या दादा ताईच्या समोर उद्याच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या मुलभूत गरजांची भ्रांत असते. सर/मॅडमना उद्याची भ्रांत असलीच तर आपली आकडेवारी आणखी कशी वाढवता येईल याची. त्यामुळे शहरात दोन्ही प्रकारच्या माणसांमध्ये जीवनशैलीची एक मोठी दरी निर्माण होते.
श्रीमंतांचं आयुष्य झगमगाटाने व्यापलेलं असतं ज्यात आधुनिक मोबाईल, लॅपटॉप, घरात उंची फर्निचर, मोठमोठाले फ्रीज, प्रत्येक खोलीत टीवी आणि सतत सुरु असणारे एसी, पंखे, एक्झॉस्ट पंखे, मायक्रोवेव, सर्व प्रकारच्या मशीन्स इत्यादी विद्युत उपकरणे असतात. शिवाय टीवी, मोबाईल, लॅपटॉप अशा वस्तू रात्रभर वापरल्या जातात. या उपकरणांशिवाय त्यांचं पानही हलत नाही. मोबाईल, लॅपटॉप यांचे आधुनिक अवतार आले की ते लगेच त्यांच्या ताफ्यात सामील होतात आणि जुन्या वस्तू ई कचऱ्यात पडतात. म्हणजेच धनिकच ह्या धरतीच्या उरावर बसले आहेत असं म्हटलं पाहिजे. बसमधले दादा/ताई यांच्या घरी सुद्धा या सर्व वस्तू असतात मात्र आवश्यकता असेल तरच ते त्यांचा उपयोग करतात.
सुट्टीच्या दिवशी दादा/ताई मुलांना घेऊन पुन्हा बसमधून किंवा अगदीच चैन आणि मुलांना गंमत म्हणून रिक्शा टॅक्सीतून ओरिजिनल बागेत किंवा समुद्रकिनारी फिरायला जातात. तर सर/मॅडम जंगलाचा, गावाचा फील देणाऱ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये नाहीतर मॉलमध्ये मुलांना घेऊन जातात.
वर सांगितलेल्या सर्व बाबींमध्ये अपवाद सुद्धा आहेत. आधुनिक जीवनशैलीला माझी ना नाही पण ही आधुनिकता एकाच ठिकाणी दोन ध्रुव निर्माण करत आहे. गरीब श्रीमंत ही दरी जितकी मोठी आहे तितकेच पर्यावरण ऱ्हासामध्ये या प्रत्येकाच्या योगदानाचे गुणोत्तर आहे. उदा. रस्त्यावरून जाणाऱ्या कारचा आकार हा बसच्या आकाराच्या निम्मा असतो. म्हणजेच आयडियली, बसमध्ये जर ६० प्रवासी असतील तर कारमध्ये ३० किंवा त्या प्रमाणात प्रवासी असायला हवेत. पण असं होतं का? नाही. किंबहुना माझं हे विधान हास्यास्पदही वाटेल. पण इथेच समजतं की बस मधून प्रवास करणारे लोक हे कार मधून प्रवास करणाऱ्यांच्या मानाने खूप कमी कार्बन उत्सर्जनात सहभागी असतात. ही दरी केवळ कार्बन उत्सर्जनापुरतीच नाही तर नगर स्वच्छतेत सुद्धा दिसते. ‘अंधे जहाँ के अंधे रास्ते’ या नाटकात याचं अस्सल चित्रण आलं आहे.
श्रीमंत व्यक्ती वेगवगळे उद्योग सुद्धा स्थापन करतात आणि अनेकांना रोजगार देतात. म्हणजेच एक धनिक उद्योग निर्माण करतो आणि शंभर मजूर त्याच्याकडे काम करतात. ढोबळ मानाने १०० कामगारांच्या तुलनेत १ असलेला मालक हा वरील प्रमाणे कार्बन उत्सर्जनात सर्वात जास्त योगदान देत असतो. एसी बस आणि रेल्वे निर्माण केल्याने श्रीमंत व्यक्ती त्याने प्रवास करत नाही. तो त्याची कारच वापरणार. हे साधं गणित आहे. त्यामुळे सामान्य माणसाचं जगणं सुकर करायचं असेल तर सामान्यांना आणखी प्रलोभनं दाखवण्याची नाही तर श्रीमंतांच्या श्रीमंतीवर त्यांचेच प्रबोधन करण्याची गरज आहे. हे ज्या दिवशी होईल तेव्हा इन्फ्रा स्ट्रक्चरवर पैसा ओतून पर्यावरणाला अधिक गलितगात्र करण्याची गरज पडणार नाही. दहा मिनिटांच्या बस प्रवासाला पाउण तास लागणार नाही. सार्वजनिक गाडीतून केलेला प्रवास हा मंत्र सर्वांना पटेल. श्रीमंतांना या गोष्टीचा बोध जेव्हा होईल तेव्हा आपण खऱ्या अर्थाने जागतिक तापमान वृद्धी रोखण्यात यशस्वी होऊ.
2 Comments
हो, पण प्रत्यक्षात सर्वजण श्रीमंत होण्याच्याच शर्यतीत असणे पसंत करतात, संयम ठेवून पर्यावरणस्नेही जीवन निवडण्याची संवेदनशीलता आणि धाडस जनसामान्यांच्या अंगवळणी पडत नाही म्हणुन १% लोकांचे फावते. असे असतांना फक्त त्यांनाच दोष देणे संयुक्तिक आहे का ? याचा विचार होणे पण गरजेचे आहे असे वाटते.
ReplyDeleteअगदी सहमत, आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद.
Deleteआपण असं पाहिलं आहे की सर्व जबाबदारी जनसामान्यांची आहे असं म्हणून प्रबोधनाचे कार्यक्रम त्यांच्यासाठीच होतात. यात श्रीमंत सेलिब्रिटी म्हणून हजेरी लावतात पण ते कधी आपलं खाजगी वाहन न वापरता सार्वजनिक वाहनाने प्रवास करू असं म्हणतात का? उलट त्यांची प्रायव्हसी आपणही जपतो. यामुळें त्यांनी स्वतः पाऊल उचललं तरच रस्त्यावरचं ट्राफिक कमी होऊन कार्बन उत्सर्जन कमी होईल म्हणून हा लेख लिहिला. जबाबदारी एका वर्गाची नाही तर सर्व समाजाची आहे.
आपण नावासकट रिप्लाय केला तर छान वाटेल.
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.