थ्री इडीयट्स हा २००९ साली आलेल्या चित्रपटातील प्रसुतीचा सीन तुम्हाला आठवत असेलच. प्रचंड चिंता आणि उत्कंठा वाढवणारा असा हा सीन चित्रपट इतिहासात पहिल्यांदाच पाहायला मिळाला

नाहीतर याआधी लेबर रूमच्या बाहेर फेऱ्या मारत देवाचा धावा करणारे बाळंतीणीचे नातेवाईक आणि थोड्या वेळाने बाहेर येऊन मुबारक बात देणारे डॉक्टर्स यापेक्षा वेगळा प्रसुतीचा सीन कधी झाला नव्हता. पण काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं तसं चित्रपटांनी कूस बदलली, नवनवे प्रयोग होऊ लागले. पण हे प्रयोग पडद्यापर्यंत असते तरच ठीक होतंमात्र हे प्रयोग आता प्रत्यक्षात घडू लागले आहेत आणि ही खचितच चिंतेची बाब आहे. शिवाय अशा एक नाही तर गेल्या काही वर्षात अनेक घटना संपूर्ण देशात घडल्या आहेत. यातील काही बाळंतीणी अल्पवयीन तर काही लग्न झालेल्या आहेत. पण त्यांची प्रसूती करणाऱ्यांनी कुठे या बाळंतीणीना तर कुठे त्या बालकांना गमावलं आहे आणि प्रकार उघडकीस आल्यावर गजाआड सुद्धा गेले आहेत. काही प्रकरणात बाळंतीण आणि मुलास मोठा अपाय झाला आहे. चित्रपटात रेन्चो आणि टीमने प्रसूती केली यावरून लोक स्वत:ला सुद्धा निष्णात प्रसूतीतज्ञ समजू लागले आहेत यावरून अक्कल चुलीत घालून हातात तंत्रज्ञानाचे कोलीत नाचवणारी माकडंच आहेत असंच म्हणावं लागेल.

बातमी कालचीच म्हणजे १७ ऑक्टोबर २०२२ची आहे. पुण्याच्या कोंढवे धावडे परिसरात एका इमारतीच्या बाजूच्या झाडीत काही कुत्रे भुंकू लागले. लोकांनी पाहिलं असता तिथे एक नवजात अर्भक सापडलं. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. त्याच वेळी तब्बेत बिघडल्याने एक १७ वर्षांची मुलगी दुसऱ्या रुग्णालयात दाखल झाली. तिची तपासणी करत असताना डॉक्टरांना तिची नुकतीच प्रसूती झाल्याचं आढळून आलं. त्यांनी चौकशी केली असता तिच्या आई वडिलांनी युट्युबवर पाहून आपल्या अल्पवयीन मुलीची प्रसूती घरीच केली असल्याचं कबूल केलं. प्रसूती नंतर त्यांनी बाळाला जवळच्या झाडीत फेकून दिलं. पोलिसांनी अर्थात त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि अलाप्वायीन मुलीला फसवून, तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या तरुणाचा शोध पोलीस घेत आहेत अशी बातमी तेव्हा आली होती.

या प्रकरणात सदर मुलीला दिवस गेल्याचं जेव्हा काही महिन्यांपूर्वी डॉक्टरांनी आई वडिलांना सांगितलं तेव्हा तिच्यावर उपचार करण्याऐवजी त्यांनी शेजाऱ्यापाजाऱ्यांपासून हे लपवून ठेवण्यासाठी तिच्या प्रसूतीची वेळ येईपर्यंत तिला घरातून बाहेर जाऊ दिलं नाही. प्रसूतीची संपूर्ण पद्धत युट्युब वर बघून ठेवली. तशी सर्व व्यवस्था घरातच केली आणि प्रसूतीची वेळ आल्यावर आपला प्रयोग सिद्ध केला. या पालकांनी असं का केलं याला अनेक सामाजिक संदर्भ आहेतच. एक तर आपल्यावर अन्याय झाला आहे आणि त्यासाठी आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा नोंदवला पाहिजे हे या लोकांना अजूनही समजत नाही; पण तंत्रज्ञानाचा वापर करून नामानिराळे होण्याचं तंत्र मात्र यांना बरोबर समजतं! शिवाय हे घडलं आहे आयटी हब असलेल्या पुण्यात. वाईट याच गोष्टीचं वाटतं की डिजिटल क्रांती करू पाहणाऱ्या या देशात माणूस म्हणून असलेलं सामाजिक भान अजूनही कैक योजने दूर आहे. हे अपयश नेमकं कोणाचं आणि याला कसं हाताळता येईल हा एक मोठा प्रश्नच आहे.

केरळमधल्या मल्लपुरममध्ये तर एका अल्पवयीन मुलीने स्वत:चीच प्रसूती एकटीने केली. २८ ऑक्टोबर २०२१ ला प्रसिद्ध झालेल्या या बातमीने सगळ्यांच्याच पायाखालची डिजिटल वाळू सरकली असणार. आईला डोळ्याने नीट दिसत नाही, वडील सेक्युरिटी गार्ड म्हणून रात्री ड्युटीला जाणारे. अशात मुलीचा फायदा शेजारच्या २१ वर्षीय तरुणाने उचलला, आपल्याला दिवस गेल्याचं जेव्हा मुलीच्या लक्षात आलं तेव्हा तिने शाळेचे ऑनलाईन वर्ग आहेत असं सांगून आपल्या रूममध्ये बंद राहू लागली. अधून मधून आणि वडिलांच्या नजरेस पडणार नाही अशी वावरू लागली. युट्युबवर सर्व पाहून प्रसूती करण्याचा सल्ला तिच्या तथाकथित प्रियकरानेच दिला आणि ह्या आज्ञाधारक मुलीने तो मान्य केला. २४ ऑक्टोबर २०२१ रोजी बाळाला जन्म दिल्यावर शाळेचे ऑनलाईन वर्ग आहेत, कोणी डिस्टर्ब करू नये अशी ताकीद देऊन तीन दिवस आपल्या रूममध्ये बंद राहिली. शेवटी मुलाच्या रडण्याचा आवाज आईच्या कानांवर पडला आणि प्रकरण उघडकीस आलं. या सर्व प्रकारात तथाकथित प्रियकरावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे.



तामिळनाडूच्या पोनेरी गावातील घटना तर अत्यंत खेदजनक आणि संतापजनक आहे. चार वर्षांच्या संबंधातून प्रेयसीला दिवस गेल्यावर तिची प्रसूती आपणच करण्याचं प्रियकराने ठरवलं. प्रसूतीची वेळ जवळ आल्यावर तो तिला काजूच्या बागेत घेऊन गेला. त्याने सर्जिकल ब्लेड, ग्लोव्हज, कात्री, सर्जिकल जेल असा जामानिमा आधीच जमवला होता. बागेत गेल्यावर युट्युब पाहून तो सर्व काही करू लागला पण मुलाचा हात बाहेर आला आणि अशा वेळी काय करावं हे त्याला कळलं नाही. मूल पूर्ण बाहेर काढण्यासाठी त्याने बाळंतीणीच्या योनीचा आणखी काही भाग चिरला ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. या प्रकाराने तो घाबरला आणि तशाच अवस्थेत तो तिला रुग्णालयात घेऊन आला. मात्र मुलीचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे मूल दगावलं आणि बाळंतीण अत्यवस्थ झाली.  

तामिळनाडूच्याच रानिपेट इथे राहणाऱ्या लोगनाथन आपली पत्नी गोमतीची प्रसूती आपली बहिण हिच्यासह घरातच युट्युब वीडीओ बघून केली ज्यात मुलाचा मृत्यू झाला तर गोमती अत्यवस्थ झाली.

असे अनेक प्रकार सध्या घडत आहेत. थ्री इडीयट्स मध्येच पिया म्हणजेच करीना कपूरचा एक संवाद आहे, ‘जेव्हा डॉक्टर्स नव्हते तेव्हा सुद्धा मुलं जन्माला येत होती.’ हे ती रेन्चो आणि टीमला दिलासा देण्यासाठी म्हणते. पण मुलांची प्रसूती होण्यासाठी डॉक्टरच हवेत असं काही नाही असा याचा अर्थ जर कुणी घेत असेल तर तो मोठा मूर्खपणा ठरेल. गावपाड्यात अजूनही जिथे डॉक्टर्स नाहीत तिथे सुईणी मुलांना जन्म देतात. पण त्यांना या विषयाचं पारंपारिक ज्ञान असतं. त्यामुळे आपणही हे दिव्य करू शकतो अशा भ्रमात लोकांनी राहू नये. मुलींना दिवस कोणत्याही कारणाने गेले असतील, त्याची शहानिशा नंतर करता येईल. पण तिची प्रसूती ही योग्य डॉक्टरांच्या किंवा सुईणीच्या हातानेच होऊ द्या. बाळ आणि बाळंतीण सुखरूप असणं हे आधी गरजेचं आहे



युट्युब हा माहिती मिळवण्यासाठीचा उत्तम मार्ग आहे. पण ते बघून नको ते साहस करू नये. याने बाळ आणि बाळंतीणीच्या जीवाला तर धोका होईलच शिवाय आयुष्यभर जेलमध्ये सडावं लागेल ते वेगळं! आपल्या हातात मोबाईल आहे, कोलीत नाही. त्याचा उपयोग ज्ञानासाठी करूया, माणुसकी जाळण्यासाठी नाही!