तथागत गौतम बुद्ध यांच्या काळात राजा प्रसेनजित म्हणून राजा होऊन गेला. या राजाचा आवडता हत्ती अचानक एका पायाने लंगडू लागला.

 

त्यामुळे राजा प्रसेनजित फार दुःखी झाला, कष्टी झाला. ही गोष्ट ज्यावेळेस तथागत गौतम बुद्धांना कळाली. ते स्वतः होऊन राजवाड्यावर गेले.

 

हत्तीचा पाय पाहिला तर कोठेही कोणत्याही प्रकारची जखम नाही. तदनंतर त्यांनी त्या हत्तीच्या माहुताला बोलावले. त्याच्या हातात दोरी दिली.

 

माहुत पुढे आणि त्याच्या पाठीमागे हत्ती लंगडत चालत होता. काही वेळानंतर गौतम बुद्धांनी त्या माहुताच्या हातातील दोरी आपल्या हाती घेतली.



 

तथागत गौतम बुद्ध पुढे आणि पाठीमागून लंगडत चाललेला हत्ती अचानक सरळ चालू लागला.

 

हे दृष्य पाहिल्यानंतर राजा प्रसेनजित आनंदीत झाला. हर्षित झाला. आनंदाच्या भरात त्यांनी तथागत बुद्धांच्या पायावर लोळण घेतली.

 

त्यावेळेस तथागत गौतम बुद्ध म्हणाले, मी कोणत्याही प्रकारचा अद्भुत चमत्कार घडवून आणलेला नसून या हत्तीचा माहूत एका पायाने लंगडा होता. त्यामुळे हत्ती त्याचे अनुकरण करत होता.

 

बंधूंनो, ज्या समाजाचा नेता माहुत हा विचाराने लंगडा आणि कर्माने विकृत असेल तर त्याचा समाज सुद्धा त्याचेच अनुकरण करत असतो.