तृतीय पंथीय म्हणजे समाजाचा एक अव्हेरलेला भाग

समाजातील सर्वच काही स्त्री पुरुषांना अगदी सहज तर काहींना झगडून त्यांचे जगण्याचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य हे सर्व मुलभूत हक्क मिळतात. पण तृतीय पंथीय यांच्याकडे एकंदरीतच सर्व समाजाचं दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसतं. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत सुद्धा तृतीय पंथीयांच्या आरोग्याचा पूर्णत्वाने विचार झालेला दिसत नाही. काही डॉक्टर्स वैयक्तिक रित्या आणि काही स्वयंसेवी संस्था तृतीय पंथीयांवर उपचारासाठी प्रयत्न करीत असतात पण शासकीय स्तरावर झाले नाहीत हे पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला शोभणारं नाही. पण आता महाराष्ट्राची ही उणीव सुद्धा भरून निघणार आहे ती येत्या जानेवारीत. महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण  मंत्री गिरीश महाजन यांनी तृतीय पंथीयांसाठी मुंबईच्या गोपालदास तेजपाल अर्थात जी.टी. रुग्णालय म्हणून परिचित असलेल्या रुग्णालयात तृतीय पंथीयांसाठी एक स्वतंत्र विभाग सुरु होणार असल्याचं जाहीर केलं आहे. ३५ ते ४५ बेड्स असणारा हा विभाग २०२३ च्या जानेवारीतच सुरु होणार आहे म्हणजे हा विभाग म्हणजे तृतीय पंथीयांना सरकारकडून नववर्षाची भेटच असणार आहे.

हा विभाग उभारण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रक्रियेचे सर्व नियम आणि नियमावली सरकारने जी.टी. रुग्णालय सलग्न असलेल्या जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स यांना सांगितल्या आहेत. ज्यात तृतीय पंथीय कोणाला ठरवायचे याचे निकष समाविष्ट केले आहेत. या निकषांवर तृतीय पंथीय ठरलेल्या व्यक्तीला त्यांच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचवता कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व प्रकारचे उपचार करण्याचे आदेश सरकारने सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले आहेत. या सर्व नियम आणि नियमावलींच्या आधारावर यापुढेही तृतीय पंथीयांसाठी जिल्हा स्तरीय रुग्णालयात विभाग सुरु केले जाणार आहेत.

ह्या विभागात प्रवेश मिळवण्यासाठी तृतीय पंथीय व्यक्तीकडे सरकारी ओळख पत्र, पत्र किंवा स्वसंक्षांकित पत्र असणे अनिवार्य आहे.

ह्या विभागात त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे दोन बाथरूम्स आणि तीन टॉयलेट्स असणार आहेत. याशिवाय ह्या रुग्णांची गोपनीयता आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी एक तपासणी रूम आणि ड्रेसिंग टेबल असणार आहे.



Transgender Persons (Protection of Right) Act, 2019. या कायद्यान्वये तृयीय पंथीय व्यक्तीस आरोग्याचे आणि त्यांच्या इच्छेनुसार लिंग परिवर्तनाचे अधिकार मुभा देण्यात आले आहेत. याच कायद्यानुसार तृतीय पंथीयांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणून अनेक स्वयंसेवी संस्था सरकारकडे तगादा लावत होत्या. पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेज इथे असा एक विभाग सुरु करण्याचं या आधीही जाहीर झालं होतं पण आजतागायत ते होऊ शकलेलं नाही. पण मुंबईत सुद्धा असा एक विभाग असावा म्हणून पाठपुरावा केल्यावर अखेर आता ही सुविधा दृष्टीपथात येत आहे. उत्तर प्रदेशात असे विभाग सुरु करण्यात आले आहेत.

नुकतंच सरकारने तृतीय पंथीयांना पाच लाखाचा आरोग्य विमा देण्याचे जाहीर केले होते. पण जर ही सुविधा देणारे आरोग्य केंद्रंच नसतील तर या विम्याचा फायदा तरी काय होणार? आता ही चिता दूर होण्याचे संकेत मिळाले आहेत. मुंबईच्या गोपालदास तेजपाल रुग्णालयात सुरु होणारा हा विभाग लवकर सुरु होईल आणि तिथे योग्य उपचार तृतीय पंथीय व्यक्तीस मिळेल अशी आशा आहे.