गिधाडंच असतात ती

जी संधीची वाट पहात असतात

तुमच्या स्वत्वाला ओरबाडण्यासाठी आतुर...

एकजात मतलबी...

मृत्यूने तुम्हाला नाहीच नेलं

तरी आसुसलेली नखं

रुतवतात तुमच्या मानगुटात

तुम्ही मात्र तटस्थ रहायचं,

ही अपेक्षा वरून

कधी हालचाल केलीच तर...

तर ???

तर भोगा जिवंतपणी नरक...

अनंताच्या कोरड्या कहाण्या ऐकत

जीर्ण काळजावर दुर्लक्षाचं पांघरूण घालत

वाट पहायची....

उगवतीची...

पण डोळे घट्ट आवळून घ्या

अनंताच्या डोहात शिरताना...

यातनांचे लोळ मुरवत रहा काळजात,

एक दिवस स्फोट होईलच त्यांचा!

मग जळा नाहीतर जाळा.

काहीतरी एक संपेलच.

सोबत शून्यत्वही...

हो संपेल शून्यत्वही...

नव्या उभारीची किलबिल होईल...

सुरेल भूपाळीचे गुंजन चैतन्य देईल...

उगवतीवर लुकलुक होईल...

झुंजूमुंजू होईल

उमेदीचे तुषार बरसू लागतील

मग हातांतील नांगर पेरत सुटतील सोनं...

हातांतील नांगर पेरत सुटतील सोनं...

================================

आपला सभोवताल हा नेहमीच आपल्याला पूरक नसतो. कामाच्या ठिकाणी अनेकदा असा अनुभव येतो. एखाद्या ऑफिसमध्ये वेगवेगळ्या सामाजिक थरातील लोक एकत्र आलेले असतात. प्रत्येकाचं पालन पोषण वेगवेगळ्या पद्धतीने झालेलं असतं. त्यामुळे विचारात तफावत होतेच, त्यातही आपला स्वभाव सर्वांना सामावून घेणारा असला की खरं तर इतरांचं फावतं. अगदीच अंगाशी येत नाही तोवर आपण कोणाची तक्रार करत नाही. त्यामुळे प्रत्येक जण आपल्याला गृहीत धरायला लागतो. वाट्टेल ते वोलतो. शब्दा शब्दावर आपली मस्करी केली जाते. हरघडी आपल्याला झुकवण्याचा प्रयत्न केला जातो. आपलं वाचन लिखाण चांगलं असेल, सामान्य ज्ञान चांगलं असेल तर त्यावर संशय घेतला जातो. आपण म्हणतो ‘जाऊ दे, आपण कोण आहोत, कसे आहोत हे आपल्याला माहित आहे ना, मग झालं तर.’ आपण हे सुद्धा कोणाकडे बोलून दाखवत नाही.

कोणाला बरं वाटत नसेल तर आपण त्यांची काळजी घेतो. पण तसा अनुभव आपल्याला येत नाही. आपण आजारी असलो तरी कोणाला कळत देखील नाही. आपल्याला सहानुभूती नको असते, म्हणून आपण औषधं घेऊन आजारपण दूर ठेवतो.

याच स्वानुभवाच्या भावना कवयित्रीने या कवितेत मांडल्या आहेत. कवयित्री लेखिका म्हणून काम करत असताना तिला अशा अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागलं. याचा परिणाम तिच्या व्यक्तिमत्वावर जितका झाला तितकाच तिच्या लिखाणावर झाला. तिला एक प्रकारचं रितेपण आलं होतं. सगळं काही शून्यवत झालं होतं. पण या शून्यातूनच नवन सुरुवात होईल याची तिला खात्री होती. सर्व काही संपतं तिथे नव्याची आणि सुंदर भविष्याची सुरुवात होते हे तिला माहित होतं म्हणून तिने हा काळोख मिटून नव्या सूर्योदयाची कास धरली. अंधाराचा पडदा दूर झाला की उमेदीचा पाऊस बरसू लागेल. पण हातातील नांगर सोनं पेरत सुटतील म्हणजे हातातील लेखणी नव्या जोमाने लिहू लागेल.

कवयित्रीचं मन वर्तमानातील घटनांनी विदीर्ण झालं असलं तरी भविष्यातील सुख स्वप्ने पहात ती आयुष्य जगत आहे हे यातून दिसतं.