ती नांदतेय एका वादळासोबत,
ती जगतेय एका वादळासोबत,
ती संभाळतेय छत वादळात,
ती सावरतेय भिंती वादळात,
ती जपतेय वादळाला वादळात,
ती सोसतेय वादळाला वादळात,
ती भिडतेय वादळाशी वादळात,
ती झुंजतेय वादळाशी वादळात,
ती लाख लाख वीजा खेळवते वादळात,
ती बनतेय पहा वादळ झपाटलेल्या वादळात....
=====================
बाईचं जगणं याविषयी अनेकांनी अनेक पद्धतीने लिहिलंय. सर्वांनाच असं वाटतं की बाईने आता सर्व बंधनं झुगारून यातून बाहेर पडावं. पण ती खरोखरच यातून बाहेर पडू शकते का?
बाईच्या अंगावर फक्त नवऱ्याची नाही तर घरादाराची जबाबदारी असते. पुरुषावरही असतेच की. पण बाई एका वेळी अनेक वादळांशी भिडत असते. कधी नवरा शांत असतो तर कधी तुफान, कधी कामचुकार तर कधी प्रचंड मेहनती. अशा प्रत्येक नवऱ्याला प्रत्येक बाई जपत असते.
बाईला सन्मान मिळाला किंवा नाही मिळाला तरी ती त्याचा फार विचार करत नाही. कधी कोणी अपमान केला तर ती तक्रार करते पण तेवढ्याने ती सर्व सोडून जात नाही. ती जे वादळ पदरात जोजवते त्याचा तिला अभिमान असतो. तिच्या पदरातील वादळच एक दिवस तिला संपूर्ण करणार असते याची तिला खात्री असते. हेच समाधान तिला तगवत असतं ह्या वादळात.
बाई जितकी तत्त्वज्ञानी असते तितकीच इंजिनिअर असते, वैज्ञानिक असते आणि मनोवैज्ञानिक सुद्धा. ती सांभाळून घेत असते प्रत्येक बाजू तिच्या आकलनाप्रमाणे. नाही समजलं तर विचारते चारचौघींना. आपण त्यालाच गॉसिप म्हणतो. पण ती सल्ला घेत असते, प्रौढ होत असते आणि निचरा करत असते साचलेल्या द्वंद्वाचा.
अशा या बाईला प्रत्येक वेळी सोडून निघून ये हा सल्ला काम करत नाही. तिला माहित असतं, तिच्या खांद्यावर एक नाही तर घराचे चारही खांब आहेत. एकल महिलांचे आणि त्यांच्या मुलाबाळांचे संघर्ष तिला माहित असतात. म्हणून जोवर शक्य आहे तोवर बाई घर मोडत नाही. झटत राहते. झगडत राहते. कवयित्री शेवटी म्हणते, “ती बनतेय पहा वावटळ झपाटलेल्या वादळात....” दोस्तहो, समाज अशाच वादळात नांदणाऱ्या वावटळीनी भरलेला आहे. त्यांना कमी लेखू नका.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.