मोठा गाजावाजा करून एसी लोकल सुरु केल्या आणि त्या नंतरही त्या बंद व्हाव्यात म्हणून गाजावाजा झालापण रेल्वे है की मानती ही नही

सार्वजनिक वाहतूक ही जास्तीत जास्त लोकांना फायदा मिळावा म्हणून असते हा नियमच ह्या एसी लोकलने दुर्लक्षित केला आहेत्यातही फार दूरचा प्रवास करणारे त्यातही हार्बर ते वेस्टर्न सबअर्ब असा मोठ्या पल्ल्याचा प्रवास करणारे आपला प्रवास सुखद व्हावा म्हणून पैसे घालून, पास काढून प्रवास करीत आहेतत्यामुळेच गर्दी इथेही ओसंडून वाहते आहे. पण ह्या पास काढलेल्या किंवा वृद्ध, आजारी, लहान मुलं गरोदर बाई यांना घेऊन जाण्यासाठी आयत्यावेळी कोणी तिकीट काढलं असेल तर रेल्वेचा ढिसाळ कारभार इथेही आडवा येतो आहे. दिवसभरातील एसी लोकल रेल्वेकडून रद्द केल्या जात आहेत आणि त्याचा भुर्दंड प्रवाशांना बसतो आहे.

सध्यातरी एसी लोकल रद्द करणं म्हणजे त्यातून प्रवास करण्यासाठी फलाटावर तासनतास रेंगाळणाऱ्या प्रवाशांसाठी विमान रद्द झाल्यासारखं आहे. एकेका दिवसात एका एली तीन एसी लोकल रद्द झालेल्या मी माझ्या समोर पहिल्या आहेत. त्या गाड्यांच्या वेळेवर एसी लोकल सोडता तिथे जनरल लोकल सोडल्या जात आहेत. अशा वेळी हे प्रवासी चौकशी करायला गेले की त्यांना बेमुर्वतपणे पहिल्या वर्गातून प्रवास करा असं सांगितलं जात आहे. खरं म्हणजे एसीचं तिकीट काढून त्यांना दुसऱ्या वर्गाच्या मानाने थोडी कमी गर्दी असलेल्या पहिल्या वर्गातून प्रवास करायला सांगणे म्हणजे ही एक प्रकारची लुट चालली आहे.

आज चर्चगेट वरून संध्याकाळी .३९ ला सुटणारी लोकल ही एसी लोकल असते पण ती जनरल होणार आहे असं जाहीर करता जनरल केली गेली. मला नंतर कळलं की या आधीच्या दोन एसी लोकल अशाच जनरल केल्या गेल्या. याच लोकल मध्ये आपल्या दोन मुलांना घेऊन एक मुस्लीम महिला चढली; तेव्हा तिने सांगितलं की तिने तिघांचंही एसी लोकलचं तिकीट काढलं होतं आणि तीन वाजल्यापासून ती मुंबई सेन्ट्रलला एसी लोकलची वाट पहात होती. दीड तासात वेळापत्रकात नमूद असलेली एकही एसी लोकल आली नाही; त्या जागी तीन जनरल लोकल गेल्यावर वाट बघून अखेर वरील लोकलमध्ये जी मूळ एसी लोकल असायला हवी होती तिच्यात मुलांना घेऊन चढली.

एसी लोकलच्या पासधारक प्रवाशांना असा विना वातानुकुलीत प्रवास करावा लागतोच पण ही एसी लोकल रद्द होऊन ती जनरल झाली आहे एवढी अनाउन्समेंट करण्याचं सौजन्यही रेल्वेकडे नाही. पण जे लोक एसी लोकलचं तिकीट काढायला येतात त्यांना तरी ते सांगू शकतात ना की अमुक एक लोकल एसी नाही तर जनरल झाली आहे. एखादी महिला एवढा वेळ ताटकळत तरी बसणार नाही. रेल्वेचा असा कारभार जर कोणाच्या जीवावर बेतला तर याला जबाबदार कोण असेल?

रेल्वेच्या ह्या ढिसाळ कारभार केवळ एसी लोकलच्या प्रवाशांनाच नाही तर जनरल लोकलच्या प्रवाशानाही तापदायक ठरत आहे. लोकलचं संपूर्ण वेळापत्रक एम इंडिकेटर ह्या App वर आहे. आज हा App मोबाईल मध्ये नाही असा एकही स्मार्टफोन धारक रेल्वे प्रवासी सापडणार नाही. रेल्वेने वेळापत्रकात काही अनाकलनीय बदल केलेत पण ते सर्व अजून एम इंडिकेटर वर अपडेट झालेले नाहीत. कसे होणार? रेल्वे अजून संभ्रमात असेल तर ते एम इंडिकेटरला तरी काय अपडेट देणार? हे एम इंडिकेटर बघून समान्य लोकलचे प्रवासी वेळ निश्चित करत असतात. एसी लोकलच्या वेळेत फलाटावर सामसूम असते. अशा वेळी जर एसी ऐवजी जनरल लोकल काढली तर ती रिकामी जाते. आणि मग वेळा पत्रकानुसार पुढच्या लोकलसाठी प्रवासी येतात; त्यात गर्दी असते. गर्दीचं त्यांना नवल वाटत नाही पण त्यांना हे माहित नसतं की पुढची लोकल जी गेली ती अगदी रिकामी गेली आहे. याआधी सुद्धा विरार वरून निघणाऱ्या एसी लोकल रद्द होऊन जनरल झाल्या आहेत. इथे रेल्वे सर्वच प्रवाशांना जाणून बुजून त्रास देते आहे असं वाटतं

त्यामुळे आम्हा रेल्वे प्रवाशांना उगीच एसी बीसीची गाजरं दाखवू नका. ज्या काही जनरल लोकल आहेत त्याच वेळेवर सोडा आणि एसी लोकलचा नादच सोडा. थोड्या वेळाचा प्रवास एसीत करून काय फायदा जेव्हा इथे जग वितळू लागलं आहे. हा एसी लोकलचा नाद सोडला तर प्रवाशांना होणारा हा विकतचा त्रास तरी थांबेल...