Article by Sunil Bansode

 


आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी?

 

आपल्यापैकी बहुतेक लोक पाणी पिण्यासाठी प्लास्टिक वॉटर बॉटलचा वापर करतात. एकतर ती रिकामी बिसलरी (मिनरल वॉटर) किंवा दुकान, मॉल मधून खरेदी केलेली महागडी प्लास्टिक बॉटल असते. बहुतेकांचा असाच समज असतो की, दिसायला सुंदर, आकर्षक, महागडी बॉटल आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित आहे. पण वस्तुस्थिती उलट असते.

आपण कधी विचार केलाय का, की या प्लास्टिक वॉटर बॉटलचं पाणी तुमच्यासाठी खरंच सुरक्षित आहे का? आज आम्ही आपल्याला याच प्लास्टिक वॉटर बॉटल मागचे काही असे घातक सत्य सांगणार आहोत जे तुमच्या पासून नेहमी लपविण्यात आलेत.

मग कोणत्या प्लास्टिक बॉटल मधून पाणी पिणे योग्य आहे,  यासाठी प्रथम प्लास्टिकचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत? हे जाणून घेवूया. खरेतर प्रत्येक प्लास्टिकची बॉटल सारखीच सुरक्षित नसते. प्लास्टिकची बाटली ही आरोग्यास धोकादायक अशी रसायने बाहेर टाकते. त्यासाठी बाटलीच्या तळाशी असलेल्या विशेष चिन्हांकडे लक्ष द्या, तेथील त्रिकोण हे दर्शवतात की, त्या बाटलीला बनविण्यासाठी कुठल्या प्रकारचं प्लास्टिक वापरले गेले आहे.

प्लास्टिकची ग्रेडिंग प्रणाली म्हणून ओळखण्यासाठी प्लास्टीकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक तयार केले गेले आहे. खालील प्लास्टिक ग्रेड आहेत:

·        ग्रेड 1 (त्रिकोणात 1) : लेबल असलेली बाटली (पीईटी किंवा पीईटीई) फक्त एका वापरासाठी (Only One Time Use) सुरक्षित असते . सूर्य, उष्णता, ऑक्सिजन किंवा उच्च तापमानाच्या संपर्कात येताच अशा बाटलीतुन पाण्यामध्ये विषारी द्रव्य सोडली जातात.

·        ग्रेड 2, 45 (त्रिकोणात 2, 45 ) : पॉलीथिलीन (2 आणि 4) आणि पॉलीप्रॉपिलीनने (5 आणि पीपी) बनलेल्या बाटल्या पुन्हा, पुन्हा वापरांसाठी (Reuse For Regular Use) उपयुक्त आहेत. पण जर त्यात नेहमी थंड पाणी साठवून ठेवलं आणि त्यांना नियमितपणे निर्जंतुक करत राहिलं तरच त्या सुरक्षित असतात.

·        ग्रेड 37 (त्रिकोणात 3 किंवा 7) : 3 किंवा 7 (पीव्हीसी आणि पीसी) लेबल असणाऱ्या बाटल्या घेणं शक्यतो टाळा (Avoid Use) कारण त्यातून काही विषारी रसायने बाहेर टाकली जातात आणि ती तुमच्या पेयात समाविष्ट होतात. तसेच या बॉटल जास्त काळ सूर्यप्रकाशात राहिल्यास त्या पाण्यातून अथवा पेयातून आपल्याला गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

असे आहे तर मग कोणत्या ग्रेडची प्लास्टिकची बाटली ही आरोग्यास चांगली ?

खरे तर कोणत्याही प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी न पिणेच चांगले, तरीपण, मर्यादित वापरासाठी ग्रेड 2, 4 आणि 5 योग्य आहेत. (फक्त नियमितपणे निर्जंतुक करणे आवश्यक) तर ग्रेड 1, 3, 6, आणि 7 यांचा वापर टाळावा.

विशेष सूचना : पाण्याच्या प्लास्टिकच्या बॉटल व्यतिरिक्त इतर ठिकाणी सुद्धा प्लास्टिकचा वापर करीत असतो. यासाठी आपण प्रत्येकाने एक चांगली सवय लावून घेणे गरजेचे आहे की, प्लास्टिकची वस्तू दिसली रे दिसली, की ती उलटी करुन तिची त्रिकोणातील ग्रेड तपासायची असा प्रयत्न केल्याने तुमचा अभ्यासही वाढेल व तुम्ही स्वतःच्या आरोग्य बाबत सदैव जागरूक राहाल.

 

लेखक – सुनील बनसोडे