यंदाच्या क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने पाकिस्तानला नमवत आपला विजय नोंदवला.

एक दिवसीय सामन्यां पाठोपाठ टी ट्वेंटी वरही सायबांनी आपल्याच घरात जन्मालेल्या खेळावर शिक्कामोर्तब केलं. पण यावेळी त्यांनी नुसता विश्वचषक जिंकला नाही तर समस्त विश्वाची मनेसुद्धा जिंकली. अशा विजयाचा उत्सव साहेबच नाही तर भारतीय खेळाडू सुद्धा शॅम्पेनच्या बॉटलचं झाकण उघडून ती फसफसवून साजरा करतात. मात्र परवा हा जल्लोष करताना सुद्धा इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने आपल्या सोबत दोन मुस्लीम खेळाडू आहेत आणि त्यांना दारू वर्ज्य आहे हे लक्षात ठेवून त्या दोघांना म्हणजेच आदिल रशीद आणि मोईन अली यांना तिथून बाजूला जायला सांगितलं. जोसच्या या कृतीचं आणि त्याने इतरांच्या धर्माचा आदर ठेवला याचं जगभरातून कौतुक होत आहे. यावर सगळीकडे लिहूनही आलं आहे.

इस्लाममध्ये दारू हराम का आहे?” यावर लोकसत्तेत आलेल्या विश्लेषण लेख मालिकेत शमसुद्दीन तांबोळी यांची प्रतिक्रिया घेतली आहे. त्यात ते इस्लाममध्ये दारू वर्ज्य असण्याची पार्श्वभूमी सांगून म्हणतात, “कुराणमध्ये (:४३) म्हटलं आहे, “श्रद्धेचा अंगिकार केलेल्या लोकांनो, नशेच्या अवस्थेत प्रार्थना करू नका. (नमाजमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करू नका). तुम्ही काय म्हणत आहात हे तुम्हाला कळत नाही, तोपर्यंत प्रार्थना करू नका. ह्या वक्तव्यातील पहिला भाग हा प्रार्थनेशी संबधित असला तरी दुसरा भाग हा वैज्ञानिक आहे. दारू प्यायल्याने माणसाला आपण काय करत आहोत हे कळत नाही. तो आपला विवेक हरवून बसतो. त्याला चांगलं वाईट, सत्य असत्य यातील फरक कळत नाही. एकदा दारू घशाखाली उतरली आणि तिचा अंमल सुरु झाला की तो काय करेल हे सांगता येत नाही. असा दारुडा मग दुसऱ्याच्या घरात कसा घुसला, गटारात पडला यावर अनेक विनोदही होत असतात पण शिवीगाळ करणे, बायकोला, मुला बाळांना मारहाण, खून दरोडे, नको त्या कागदावर सही करणे असले प्रकारही तो करतोच. शिवाय यकृत बिघडवून कुटुंबियांना आणखी मानसिक, शारीरिक आणि आर्थिक संकटात ढकलत असतो. यामुळे दारूवर फक्त धार्मिक दृष्ट्याच नाही तर शारीरिक स्वास्थ्यासाठी सुद्धा सर्व समाजात बंदी असायला हवी. पण असं होता. सर्वात जास्त रेवेन्यु म्हणजेच महसूल मिळवून देणारी वस्तू काय असेल तर ती दारू. म्हणून कोरोना काळात मंदिर उघडण्या आधी सुद्धा दारू विक्रीवर असलेली बंदी उठवली गेली. यावर झालेला उहापोह आपल्याला माहितच आहे.

पुढे जाण्याआधी दारूची गरज काय ते पाहूया. अतोनात श्रम करणाऱ्या व्यक्तीला जमिनीला पाठ टेकवल्यावर अंग दुखत असल्यामुळे लगेच झोप लागत नाही,  ज्यामुळे त्याला पूर्ण आणि शांत झोप मिळू शकत नाही. यासाठी अशा श्रमिक व्यक्तीचे त्यांचे सर्व अवयव हे शिथिल होऊन त्यांना आराम मिळावा, त्याला शांत झोप मिळावी म्हणून मुख्यत: दारू घेण्यास सुरुवात झाली होती. याशिवाय थंड प्रदेशातील लोकांच्या शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी सुद्धा ह्या पेयाचा उपयोग केला जाऊ लागता होता. आजही दारूच्या ह्याच मुख्य गरजा आहेत. ती सुद्धा माफक प्रमाणात, एका मर्यादेत घ्यावी लागते. प्रमाणापेक्षा अधिक अन्न सेवनातून, अगदी भात जास्त खाल्ल्याने सुद्धा शरीरात नैसर्गिक रित्या अल्कोहोल निर्माण होते. त्यामुळे अनेकदा जेवणानंतर आपल्याला सुस्ती येते. ही सुस्ती शरीराला अतिरिक्त अन्न पचवण्यासाठी अन्य कोणत्याही क्रियेला विराम मिळावा यासाठी आवश्यक असते. याचा अर्थ जेवढ्या प्रमाणात अल्कोहोल निर्मिती शरीरात होते तेवढीच त्याची गरज असते. बाहेरून शरीराला अधिक अल्कोहोल देण्याची गरज नसते. पण हे लक्षात घेतलं जात नाही आणि हवी तशी दारू ढोसली जाते. मग अल्कोहोलची मर्यादा ओलांडली की मानवतेची सीमा पुसली जाऊन ती व्यक्ती हिंस्त्र बनते. म्हणूनच अनेक धर्मात दारू वर्ज्य आहे.  


    

इस्लाम प्रमाणेच बौद्ध धम्मात सुद्धा दारू वर्ज्य आहे. पंचाशिलातील पाचवे शील आहे,

सुरामेरयमज्जपमादट्ठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि

याचा अर्थ आहे, “मी कोणत्याही प्रकारची दारू किंवा मादक पदार्थाचे सेवन करणार नाही अशी मी प्रतिज्ञा करते/करतो.”

याशिवाय १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या दलित पिडीत समाजाला नवसंजीवनी देण्यासाठी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. यात त्यांनी आपल्या समाजाला २२ प्रतिज्ञा दिल्या

यात सतरावी प्रतिज्ञा आहे, “मी  दारू पिणार नाही.” ही प्रतिज्ञा किती बौद्धजन पाळतात? फार कमी. पूर्वीच्या हिंदू धर्मातील कनिष्ठ जातीत असताना अनेक वाईट सवयी आपल्या या बौद्ध समाजातील लोकांना होत्या. पण बाबासाहेबांनी अनेक भाषणातून या सवयीतून बाहेर पडा म्हणून सांगितलं. एक सुंदर आणि सकस व्यक्तिमत्व घडवेल, सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देईल असा धम्म त्यांनी आपल्या ज्ञाती बांधवांना दिला. यासाठी अपार कष्ट घेतले. आणि आपण मात्र स्वत:च्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी त्यांच्या या श्रमांना, त्यांच्या आपल्यावर असलेल्या विश्वासाला तिलांजली दिली. आज अनेक घरातील पुरुष दारू पिऊन स्त्रियांना मारहाण करतात. तिने कष्टाने कमावलेले पैसे जबरदस्तीने उकळून त्याची दारू पितात, जुगार खेळतात, पुन्हा एकदा आपल्या स्त्रीवर अत्याचार करतात. यातील प्रत्येक गोष्ट धम्माने आणि २२ प्रतिज्ञानी निषिद्ध ठरवली आहे. तरीही हे लग्न असो, बारसं असो की कोणाचे अंत्यविधी असोत, दारू शिवाय हे कार्यक्रम जणू पूर्णच होत नाहीत अशी अवस्था आहे.

जोस बटलरने आपल्या मुस्लीम खेळाडूंना जो सन्मान दिला तो त्यांच्या धर्माचा आणि त्यांच्या धार्मिक भावनेचा आदर व्हावा म्हणून. इंग्लंड संघात खेळून सुद्धा आपल्या धर्माचे निष्ठेने पालन करणाऱ्या आदिल रशीद आणि मोईन ली हे मुस्लीम खेळाडू सुद्धा कौतुकास पात्र आहेत. अशी अगदी कट्टर धार्मिक नाही पण विवेकी भूमिका बौद्ध बांधव कधी अंगिकारणार? अलीकडे आधुनिकतेच्या नावाखाली सुशिक्षित स्त्रियाही दारू घेऊ लागल्या आहेत. हा सर्वांचा वैयक्तिक प्रश्न असला तरी यात खरंच विवेक आहे का? हे प्रत्येकाने तपासून पाहिलं पाहिजे. जगापुढे आपल्यामुळे आपल्या धम्माची बदनामी होऊ नये, जगासाठी आपला बौद्ध धम्म आदरणीय, स्पृहणीय, वंदनीय आणि अनुकरणीयच वाटला पाहिजे यासाठी आपणच सर्व प्रयत्न केले पाहिजेत. हेच आपलं धम्म कार्य आणि समाजकार्य असलं पाहिजे.