भारतात खरं तर अख्खे मसाले वापरण्याची पद्धत उत्तर भारतात  जास्त आहे

त्याला खडा मसाला म्हणतात. पण दक्षिणेकडे येत जातो तसे मसाले भाजून ते बारीक करून वापरण्याची पद्धत जास्त दिसून येते. महाराष्ट्रात तेही कोकणात असे मसाले बनवून ठेवण्याची पद्धत आहे. उन्हाळ्यात बेगमीचे पापड लोणची असे पदार्थ करतात  त्यात मसाला बनवणं हा एक टास्क असतोच. ही गरज ओळखून मुंबई आणि कोकणात सुद्धा अनेक ठिकाणी मसाल्याच्या गिरण्या आहेत. मुंबईत तर लालबागमध्ये मार्च एप्रिलमध्ये यात्रा भरावी तशी मसाले करून घेणाऱ्यांची गर्दी उसळते. पूर्वी आपल्याला हवे ते मसाले घरीच भाजून आणण्याची पद्धत होती. पण काळ बदलला तसा गृहिणींच्या जबाबदाऱ्या वाढल्या. शिवाय घरात  एवढे सगळे पदार्थ भाजताना अनेकांना त्रास होतो. हे लक्षात घेऊन लालबाग मधले मसालेवाले स्वत: मोठमोठ्या कढया मोठमोठ्या गॅस वर ठेऊन मसाले भाजतात. यामुळे लसूण सोलणाऱ्या, मिरचीची देठं खुडून देणाऱ्या, सुक्या खोबऱ्याचे तुकडे करणाऱ्या आणि बाकी सर्व मसाले भाजणाऱ्या स्त्री पुरुषांना तिथे रोजगार उपलब्ध झाला आहे.   



       

आरोग्यवर्धक भाजलेला लसूण ह्या भागात आपण लसणाचे किती फायदे असतात ते पाहिलं. यात पाहिलं की भाजलेला किंवा भाजलेला असे दोन्ही प्रकारचे लसूण आरोग्यासाठी उपयुक्त असतात. पण लसूण खरपूस भाजला की त्याच्या अरोमाने मनही भरून जातं. असा लसूण खायलाही मजा येते.



हा मसाला जास्त करून कोकणात त्यातही रत्नागिरी  जिल्ह्यात वापरला जात असला तरी त्यालाघाटी मसालाअसंच म्हणतात. असं का म्हणतात हा संशोधनाचा विषय आहे. कोकणात बनवल्या जाणाऱ्या ह्या रोजच्या वापरातील मसाल्यात मिरच्या, सुकं खोबरं, धणे, जिरे, बाकी गरम मसाला आणि लसूण भाजून घेण्याची पद्धत आहे. अनेकांना वाटतं की असा भाजलेला मसाला खराब होत असेल पण तसं नाहीये. हा मसाला व्यवस्थित बंद बरणीत ठेवला आणि वर हिंगाची गोळी टाकली की तो वर्ष दोन वर्ष चांगला टिकतो. म्हणून चाकरमान्यांच्या घरात एकाच वेळी १०/१० किलो मसाला बनवण्याची पद्धत आहे. ह्या मसाल्यात लसूण, लवंगी मिरच्या, सुकं खोबरं, धणे जिरे, शहाजिरे, तमालपत्र, चक्री फुलं, दगडफूल छोटी आणि मोठी वेलची, लवंग, काळीमिरी, दालचिनी, खसखस, जायफळ, जावित्री हे पदार्थ ठराविक प्रमाणात असतात. काही लोक यात कांदे सुद्धा भाजून घालतात. थोडे हळकुंडही यात वापरले जाते. हे सर्व आधी नुसते भाजून मग तेलात तळून घेतलेले असल्यामुळे हे मसाले बाधण्याची शक्यता कमी असते. अशा प्रकारे व्यवस्थित भाजून आणि तळून केलेला हा मसाला जेवणाला चव देतो आणि खाणाऱ्याला तृप्त तर करतोच शिवाय तो आरोग्य वर्धक सुद्धा आहे. बाजारातील मिरची पूड आणि कंपन्यांचे तयार मसाले वापरण्या ऐवजी असा घरी थोड्या प्रमाणात केलेला मसाला कधीही उत्तमच.    

हा मसाला नुसत्या पोळी किंवा भाकरीवर घेऊनही खाल्ला की भाजीची गरज लागत नाही. आयत्यावेळी घरात भाजी नसेल आणि खूप भूक लागली असेल तर चमचभर मसाल्यात दोन थेंब गोडं तेल टाकून मिक्स करून खाल्लं तर मन आणि पोट दोन्ही तृप्त होतं     

असा मसाला तुम्हालाही करायचा असेल तर मुंबईत लालबागला नक्की भेट द्या. इथे तयार केलेला मसाला विकतही मिळतो. जाता जाता लालबागचा चिवडाही विकत घ्या. लालबाग फक्त लालबागच्या राजासाठी प्रसिद्ध नाही तर ह्या मसाला गिरण्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे. तेव्हा एकदा या लालबागच्या मसाले बाजारात नक्की फेरफटका मारा. दिल खुश हो जाएगा!