Courtesy : Agrowon

व्यापाऱ्यांकडून कोल्हापुरी गुळाची गळचेपी

गेल्या काही वर्षांपासून अनेक लोकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून साखरेचा त्याग करून त्या ऐवजी ते गूळ वापरू लागले आहेत. यामुळेच गुळाला अच्छे दिन दिसू लागले होते. महाराष्ट्रातील विशेषत: कोल्हापुरातील गूळ उत्पादक उत्तम प्रतीचा गूळ तयार करू लागले आहेत ज्याची मागणी शहर आणि ग्रामीण व्यापाऱ्यांमध्ये खूप वाढली आहे. पण जरा सावधान! तुमच्या घरात येणारा गूळ कदाचित चांगल्या प्रतीचा नसेल. तुम्ही वापरत असलेल्या गुळामुळे फायदा नाही तर नुकसानच अधिक होऊ शकतं. कोण तुमच्या जीवाशी खेळत आहे? कोण करतंय तुमची फसवणूक?  

कोणताही व्यापारी नेहमी आपला फायदाच पहात असतो. यामुळे कोल्हापुरच्या बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी कर्नाटकातून येणारा कमी प्रतीचा गूळ खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे ज्याचा परिणाम महाराष्ट्रातील किंबहुना कोल्हापुरातील गूळ उत्पादकांवर होत आहे. जिल्ह्यातील गूळ उत्पादकांना हक्काची बाजारपेठ मिळावी या उद्देशाने शाहू महाराजांनी वसवलेल्या या (Kolhapur Jaggery Market) बाजारपेठेत आता उपरे आपलं बस्तान बसवताना दिसत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात उत्तम प्रतीचा, कसलीही भेसळ नसलेला गूळ उत्पादित केला जातो. यामुळे अर्थातच याची किंमत जास्त असते. ग्राहकांना चांगल्या प्रतीचा आणि आरोग्यासाठी उपयुक्त असा गूळ मिळतो. मात्र किंमत जास्त असते ही बाब हेरून कर्नाटकातील गूळ उत्पादक आपल्या निकृष्ट दर्जाच्या गुळाची इथे आवक करीत आहेत. बाजार समितीतील व्यापारी हा गूळ कमी भावात खरेदी करतात. ह्या गुळासाठी अपरिपक्व ऊस वापरला जातो शिवाय यात साखरेचे मिश्रण केले जाते, यामुळे याचा दर्जा निकृष्ट होतो. हा गूळ स्वस्त दरात व्यापारी विकत घेतात आणि किरकोळ बाजारात तो विकतात. आपण ग्राहकांचा विश्वासघात करीत आहोत याचं त्यांना काहीही सोयरसूतक नसतं.

या प्रकारामुळे गुळाचे मूळ दर किती खाली आहेत हे पाहण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये झालेल्या सौद्यांकडे पाहता येईल. ऑक्टोबर महिन्यात हे दर ४०० रुपये प्रतिक्रेट होते ते नोव्हेंबर महिन्यात १०० रुपये प्रतिक्रेटपर्यंत खाली आले आहेत.  

सप्टेंबर पासून गुळाचा हंगाम सुरु होऊन तो फेब्रुवारी पर्यंत सुरु असतो. मात्र पाऊस लांबला तर हंगाम सुरु व्हायला सुद्धा वेळ लागतो. यावर्षी सुद्धा असंच झालं. त्यात अतिवृष्टीने अखंड महाराष्ट्राला झोडपलं. अशात ऑक्टोबर महिन्यात बाजारात येऊ लागलेल्या गुळावर कर्नाटकी गुळाचं अतिक्रमण सुरु झालं आहे. शिवाय कर्नाटकातून वर्षभर निकृष्ट दर्जाच्या गुळाची आवक सुरू असते. यामुळे भर हंगामात येणाऱ्या चांगल्या प्रतीच्या गुळाला दर मिळत नसल्याने कोल्हापुरातील गूळ उत्पादक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी या बारमाही आणि निकृष्ट दर्जाच्या गुळाला विरोध दर्शवला आहे.

या विरोधाचं आणखी एक कारण म्हणजे हा निकृष्ट दर्जाचा गूळ व्यापाऱ्यांकडून कोल्हापुरी गूळ म्हणून बाहेर विकला जात आहे. यामुळे कोल्हापुरी गुळाच्या नावलौकिकाला धक्का बसत आहे. शिवाय ग्राहकांच्या आरोग्याशीही खेळ सुरु आहे. ह्या बाहेरून येणाऱ्या गुळाच्या आवकेला बाजार समिती अटकाव करू शकली नसल्याने कोल्हापूरच्या गूळ उत्पादकांचा रोष ओढवून घेत आहे.

या प्रकारामुळे गुळाला नीचांकी भाव मिळत असल्याच्या निषेधार्थ गुळ उत्पादकांनी मंगळवार दिनांक २२ नोव्हेंबर २०२२ रोजी कोल्हापुरातील बाजार समितीत सौदे बंद पाडले.

या उत्पादकांच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.

Ø गुळाला किमान हमीभाव मिळावा.

Ø व्यापाऱ्यांकडून होत असलेली पिळवणूक बंद व्हावी,

Ø कर्नाटकातून येणारी गुळाची आवक थांबवावी.  

गुळाच्या अशा व्यवहारामुळे कोल्हापूरच्या गूळ उत्पादकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कर्नाटकातील गूळ उत्पादकांना मागाहून पैसे दिले तरी चालतात अशी कारणं देणाऱ्या व्यापाऱ्यांवर वचक बसवणे जर बाजार समितीला शक्य नसेल तर सरकारने यात लक्ष घालावे. अन्यथा शेतकऱ्यांप्रमाणे गूळ उत्पादकही देशोधडीला लागतील. आता ग्राहकांनी सुद्धा चांगल्या प्रतीच्या गुळाचा आग्रह धरला तरच  या व्यापारी आणि उपरे गूळ विक्रेते यांच्या गोरखधंद्यावर लगाम बसेल. अन्यथा हे असंच सुरु राहील.