नुकताच मी एक मेसेज वाचला.
त्यात म्हटलं होतं की जी मुलं आजपासून दहा वर्षांनी जन्म घेतील त्यांना पूर्वीच्या मुंबईविषयी काहीच कळणार नाही. हा मेसेज बहुधा मुंबईच्या होऊ घातलेल्या कायापालटा विषयी असावा. पण यात जी अधिरेखीत केलेली गोष्ट आहे ती म्हणजे पुढच्या पिढीला आज असलेलं वास्तव कधीच कळणार नाही किंबुहुना कळत नाही. यासाठीच ज्यांना इतिहासाची जपणूक करायची असते ते विविध मार्गाने करीत असतात. चित्रपट माध्यमाला सुद्धा एक डॉक्युमेंटेशन म्हणजे दस्तावेजीकरण करण्याचं प्रभावी माध्यमच मानलं जातं. ह्या दस्तावेजीकरणात जर काही गफलत झाली तर पुढच्या पिढीपर्यंत खरा इतिहास कधीच पोहोचत नाही. आणि त्यांना खरा इतिहास सांगणाऱ्यांनी कितीही कानीकपाळी ओरडून सांगितलं तरी त्या पिढीला त्यांच्यावर विश्वास बसत नाही. “बाजीराव मस्तानी” या चित्रपटातील “वाट लावली” या गाण्याविषयी माझा अनुभव असाच आहे. अशी भाषा पेशवे काळात नव्हती हे जेव्हा मी माझ्या अमराठी सहकाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा “क्या पता! तब ऐसी भाषा हो भी सकती है! आपके पास प्रूफ है क्या?” मी निरुत्तर. याच चित्रपटातील मस्तानी – काशीबाई भेट जी इतिहासात कधीच झाली नाही त्या भेटीवर सुद्धा अशीच प्रतिक्रिया मला मिळाली होती. थोडक्यात सिनेमॅटीक लिबर्टीच्या नावाखाली काहीही करण्याची मुभा या चित्रपटकर्मींना कशी मिळते कोण जाणे! अलीकडे संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले “हर हर महादेव” आणि “वेडात मराठे वीर दौडले सात” या चित्रपटात केलेल्या अक्षम्य बदलांवर तुटून पडले होते. यावर मोठा वाद झाला. त्यामुळे आपल्याला चुकीचा इतिहास पहायचा नाही हे मी नक्की केलं असताना मला हा सिनेमा Zee5 ह्या app वर दिसला. चित्रपट न बघता टीका न करण्याचा स्वभाव उफाळून आला आणि मी तो सिनेमा पहिला आणि... आणि मी इतिहासाच्या बाबतीत बुचकळ्यात पडले. मी इतिहासाची जाणकार नाही. शाळेत साठ मार्कांचा पेपर सोडवण्यासाठी केलेला अभ्यास आणि नंतर वेगवेगळ्या कथा कादंबऱ्या आणि इतर माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या रणधुरंधर मावळ्यांविषयी जेवढं सर्वसामान्य माणसाला माहित असतं तेवढंच मला माहित आहे. पण माझ्या एवढुशा माहितीला सुद्धा गढूळ करण्याचं काम अभिजित देशपांडे दिग्दर्शित ‘हर हर महादेव’या चित्रपटाने केलं आहे. वाचकहो, मला या बुचकळ्यातून बाहेर काढता आलं तर बघा पण तुम्ही स्वत: बुचकळ्यात पडणार नाही याची मी काही गॅरंटी देणार नाही बुवा!
तर बुचकळा नंबर एक. सगळ्यात आधी बाहुबलीला हिंदी आवाज देणाऱ्या आणि छोट्या पडद्यावरच्या मोठ्या मराठी माणसाविषयी, अर्थात शरद केळकर यांच्याविषयी. हा पठ्ठ्या अभिनयात खूप चांगला आहे, आवाजही भारदस्त आहे, पण भाऊ तुझं मराठी तेवढं रांगडं न्हाई गड्या! हिंदीळलेलं मराठी बाजी प्रभू देशपांडे यांच्या तोंडी अजाबात शोभून दिसत न्हाई. काही काही प्रसंग तर अवाजवी वाटतात. बाजीबा पावन खिंडीतील युद्धाच्या वेळी जबर जखमी होऊन एका दगडावर मृतवत पडतो तेव्हा त्याला शिवबा राजेंना दिलेले शब्द आठवतात. ऐन युद्ध भूमीवर पाच मिनिटापेंक्षा अधिक काळ हा प्रसंग बाजी आठवत असतात. त्यावेळी त्याचा खात्मा करायला आलेलं सिद्दी जौहरचं सैन्य गोट्या खेळत बसलं असेल काय? हे अतार्किक नाही का? मग मात्र बाजी उफाळून उठतात आणि समोर आलेल्याला कापत सुटतात. ह्या प्रसंगानंतर त्यांचा आवडता असलेला दांडपट्टा त्यांना एक सैनिक आणून देतो. म्हणजे बाजी प्रभू देशपांडे ज्या दांडपट्ट्यासाठी ओळखले जातात तो त्यांना पाउण युद्ध झाल्यावर मिळतो? हे खरंच असंच होतं काय?
बुचकळा नंबर दोन. छत्रपती शिवाजी महाराज अफझल खानाचा कोथळा बाहेर काढतात. हा प्रसंग किमान प्रत्येक मराठी माणसाला तोंडपाठ आहे. मला वाटतंय की हे वाचत असताना सुद्धा तुमच्या नजरे समोर तो प्रसंग उभा राहिला असेल. पण जरा थांबा. आम्ही योग्य इतिहास दाखवला आहे असं छातीठोकपणे सांगणाऱ्या अभिजित देशपांडे आणि टीमने या प्रसंगात शिवाजी महाराज अफझल खानाचा कोथळा विष्णूच्या अवतारातील नरसिंहाने जसा मांडीवर हिरण्यकश्यपूला घेऊन त्याचं पोट फाडलं होतं तसा काढतात. भुवया उंचावल्या का तुमच्या? प्रश्न हा पडतो मला की इतरांचं सोडून द्या पण लोकमान्य टिळक, काशिनाथ घाणेकर इत्यादी व्यक्तिचित्रे साकारणाऱ्या सुबोध भावेंना ह्या चुकीचा बोध होऊ नये? पण नसेलच झाला हा बोध कारण “अमुक अमुक अशी माझी इच्छा आहे आणि माझी इच्छा ही तो श्रींची इच्छा,” असले बाळबोध डायलॉग चित्रपटात तीन ते चार वेळा म्हणणाऱ्या सुबोधना आपण इतिहासाची मोडतोड करीत आहोत याचा काय कप्पाळ बोध होणार!
बुचकळा नंबर तीन. मिलिंद शिंदे यांनी आक्रस्ताळी आणि महत्त्वाकांक्षी सिद्दी जौहर बरा उभा केला आहे पण तो स्वत:ला वारंवार ‘काली चमडी’ असं का म्हणतो हे कळलं नाही. यापूर्वीच्या कोणत्या चित्रपटात हा उल्लेख कोणाला आढळला असेल तर कृपया सांगा.
बुचकळा नंबर चार. छत्रपती शिवरायांसारखा दिसणारा आणि तसाच आवाज असणारा शिवा काशिद हा महाराजांसारखाच व्यक्तिमत्व असणारा, शत्रूशी बोलताना डोळ्यात डोळे घालून बोलणारा होता असं मी ऐकून होते. या चित्रपटातील शिवा काशिद मात्र विनोदी आहे. सुबोध भावेंना यात सुद्धा काही गैर वाटले नाही? आपण शिवाजी राजांसाठी आणि स्वराज्यासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या एका मावळ्याची भूमिका करतो आहोत याचं भानही ह्या चित्रकर्त्यांना राहिलं नाही काय?
बुचकळा नंबर पाच. दक्षिणात्य दे मार सिनेमांचे चाहते मऱ्हाटी जनातही खूप आहेत. असे चित्रपट मराठीत आणण्यासाठी शिवचरित्र हे मोठं भांडार आहे हे निश्चित. पण म्हणून युद्धातील प्रत्येक सीन हा स्लो मोशन मध्येच दाखवला पाहिजे का? ह्यामुळे चित्रपट उगीच लांबला आहे. वीएफएक्स तर किती तकलादू आहेत हे शेंबडं पोरगं बी सांगल.
बुचकळा नंबर सहा. चित्रपटाला ‘हर हर महादेव’ हे नाव का दिलं? महाराजांची कोणतीही कथा ही ह्या शीर्षकाखाली येऊ शकते. ‘हर हर महादेव’ ही घोषणा बाजी प्रभू देशपांडे यांची एकट्याची पण नाही. तरीही...? असो.
राज ठाकरे यांच्या आवाजातील निवेदन चांगलं झालं आहे. पण संपूर्ण चित्रपटच राज ठाकरेंची भाषा बोलतोय असंच जाणवतं. नरसिंहाप्रमाणे अफझल खानाचा वध आणि शेवटी महाराजांच्या राज्याभिषेकाची ६ जून १६७४ ह्या तारखेचा उल्लेखही न करता शालिवाहन शके वगैरे मध्ये सांगितलेली तारीख यावरून शिवचरित्राचं हिंदूकरण करण्याचा प्रयत्नही जाणवतो.
असे आणखीही अनेक छोटे मोठे प्रसंग या चित्रपटात असतील जे माझ्या सारख्या सामान्य इतिहास ज्ञान असणाऱ्या व्यक्तीला कळणार नाहीत. असे प्रसंग असलेच तर त्यावर इतिहास तज्ञांनी भाष्य केलं तर बरं होईल. तसा हा चित्रपट अनेक ठिकाणी फास्ट फॉरवर्ड करूनही पाहता येईल. काही काही व्यक्तिरेखा कोण होत्या हेही लक्षात येत नाही. कोणाचाही अभिनय वाखाणण्यासारखा नाही. फक्त बाजी प्रभू देशपांडे यांचे बंधू फुलाजी यांच्याविषयी नवी माहिती मिळाली. बाकी सिनेमॅटीक लिबर्टी चांगलीच ओरपली आहे. या उपर काही नाही.
2 Comments
अत्यंत महत्त्वपूर्ण बाबी तुम्ही विषद केल्या आहेत. अत्यंत भडकाऊ संवाद आणि विक्षिप्त इतिहास दाखवण्याची सध्या मुद्दाम स्पर्धा लागली आहे. राग तर तेव्हा येतो जेव्हा ही लॉबी अत्यंत वाईट रित्या इतिहासाची प्रस्तुती करते. अस वाटत जणू यांना राजेंच्या इतिहासाशी काही एक घेणं नाही. पन्हाळा गडावरील शिवा काशीद यांची समाधी पाहून मन अभिमानाने भरून येतो. पण या so called कलाकारांना त्यांच्यात काय कॉमेडी वाटलं हे त्यांच्या मनाला ठाऊक. तुम्ही अत्यंत महत्वपूर्ण विचार लेखन केल्याबद्दल तुमचे अनेक धन्यवाद. 🙏🌼
ReplyDeleteआपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद! आपले नाव कळल्यास आनंद होईल.
DeletePost a Comment
Please do not add any spam link in the comment box.