‘’अकेला वाला घर बेटी के काम को समझ गया था. आदर से चुप बैठ रहता। बेटी देर तक पन्ना खोल झुकी रहती। कार्य देवी की उपासना में. किसी भी पल देवी प्रसन्न हो जातीं और धीरे से सरकी आतीं और उसके पास बैठ जातीं. अपने आप कलम उठ जाता और पन्ने पर चलने लगता. लेख, कहानी, किताब बनने लगती’’

लेखनाचा हा एकांतातील अनुभव या लेखनकर्त्याने कदाचित घेतला असावा. त्याशिवाय कार्य देवी प्रसन्न होऊन तिच्याजवळ सरकून बसली आणि विविध साहित्याची निर्मिती होऊ लागली असं पदलालित्य कागदावर कसं उमटलं असतं?

“आजकल घर ढिठा गया है हर ईंट अंगड़ाई लेती है बातें चीतें होती हैं कोई ज़्यादा हुड़दंगी आ गई है दीवारें और चुहल में आनेवाले संग खेलती हैं उसकी हल्की सी टीप पर दीवार बज उठती जैसे उसमें हवा फूंक दी मां के छूने पर तो निस्बतन धीमे से जब रोज़ी बुआ का लहीम शहीम तन इधर उधर लहराता तो पता ही नहीं चलता किधर से खनक उठ के किधर बजी

मूळ कथेचा विसर पडावा अशी ही तालबद्धता वाचकाला त्या शब्दांच्या डोहात बुडवून टाकते. याच नादमाधुर्याने हिंदीला पहिला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळवून दिला. त्या लेखिकेचं नाव गीतांजली श्री आणि लेखन सौंदर्याने नटलेल्या पुस्तकाचं नाव ‘रेत समाधि’. २०१८ साली प्रसिद्ध झालेल्या रेत समाधि’ या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद Tomb of Sand ला २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला. हा सन्मान मिळवणारी ही पहिली हिंदी कादंबरी ठरली. त्यामुळे भारतीय भाषिक साहित्याला जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळाली.



हिंदी साहित्यातील समकालीन, प्रयोगशील आणि नाविन्यपूर्ण लेखिका म्हणून गीतांजली श्री यांचे नाव विशेषत्वाने घेतले जाते. १२ जून १९५७ रोजी उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव गीतांजली पांडे असले तरी त्यांनी आईचे नाव ‘श्री’ हे नाव आडनाव म्हणून स्वीकारले. वडील प्रशासकीय सेवेत असल्याने त्यांचे बालपण विविध शहरांत गेले आणि त्यामुळे त्यांचा हिंदी भाषेशी असलेला जवळचा संबंध अधिक दृढ झाला.

गीतांजली यांनी दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजमधून इतिहास विषयात पदवी आणि नंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांनी बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठात हिंदी साहित्यावर पीएचडी सुरू केली असता लेखनाची प्रेरणा मिळाली. त्यांचे लेखन मुख्यत्वे कादंबरी आणि कथासंग्रह या स्वरूपात आहे. त्यांच्या रचनांमध्ये स्त्रीजीवन, कुटुंबातील नातेसंबंध, विस्थापन, सीमा आणि स्वत:ची स्वत:ला झालेली ओळख यांसारख्या विषयांचा सखोल शोध दिसून येतो. कथनशैलीत प्रयोग, भाषेतील खेळ, विनोद आणि गंभीर चिंतन यांचा सुंदर मिलाफ हा त्यांच्या लेखनाचा गाभा आहे.

Daisy Rockwell and Geetanjali Shree


रेत समाधिया हृदयस्पर्शी कादंबरीत पतीच्या मृत्यूनंतर पाकिस्तानला प्रवास करणाऱ्या ऐंशी वर्षीय स्त्रीची कथा येते. त्यात भारत-पाकिस्तान विभाजनाच्या वेदना, स्त्रीस्वातंत्र्य आणि सीमा या विषयांवर भाष्य केले आहे. या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद डेजी रॉकवेल यांनी Tomb of Sand या नावाने  केला आहे.  

गीतांजली श्री यांनी अनेक कथा कादंबऱ्या लिहिल्या. प्रत्येक कथानकातील स्त्री काहीतरी वेगळी असते. ‘माई’ या कादंबरीतील परंपराचं पालन करता करता त्यात स्वत:ला सामावून घेणारी माई स्वत: वाकलेली आणि कुटुंबात हरवलेली आहे. तिच्याविषयी आस्था असणारी सुनैना माईला जपते आहे पण तिला माईसारखं व्हायचं नाही. सुनैना म्हणते,

‘‘मैं माई बन भी सकती तो भी न बनना चाहूंगी। मुझे माई नहीं बनना। हर तरह के ‘सहने’ को निकाल फेंकना चाहती हूँ वह गलत है. मुझे वह रोकना है।"

तीन पिढ्यांतील महिलांच्या भावविश्वावर आधारित ही प्रभावी कादंबरी आहे.

हमारा शहर उस बरस’ ही कादंबरी सामाजिक व राजकीय अस्थिरतेचे वास्तव मांडणारी आहे. ‘खाली जगह’ या कादंबरीत विस्थापनाचं दु:ख, वेदना अधोरेखित केलं आहे.

गीतांजली श्री यांचे लेखन हे पारंपरिक कथनपद्धतीपासून वेगळे, कल्पनाशक्तीने समृद्ध आणि भाषिक प्रयोगशीलतेने भरलेले आहे. स्त्रीच्या अनुभवविश्वाला दिलेली अभिव्यक्ती, इतिहास आणि वर्तमानाचा गुंफलेला संवाद आणि सीमांचे भौतिक-मानसिक अर्थ उलगडण्याची त्यांची क्षमता यामुळे त्यांचे साहित्य मराठी वाचकांनाही आकर्षित करते.

हिंदी साहित्याला जागतिक व्यासपीठावर नेणाऱ्या गीतांजली श्री यांचे कार्य भारतीय भाषांच्या समृद्ध परंपरेला नवा मानाचा तुरा लावणारे ठरले आहे.

रेत समाधि या बुकर पुरस्कार विजेत्या कादंबरीची मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे ऐंशी वर्षीय ‘मा’. पतीच्या मृत्यूनंतर त्या खोल नैराश्यात जातात, परंतु अचानक नव्या ऊर्जेसह उभ्या राहतात आणि आपल्या कुटुंबाला चकित करत पाकिस्तानला प्रवास करण्याचा निर्णय घेतात. हा प्रवास फक्त भौगोलिक नाही, तर तिच्या भूतकाळातील विभाजनाच्या जखमा, हरवलेल्या आठवणी आणि स्वतःच्या ओळखीच्या शोधाचा मार्ग आहे. ही केवळ विभाजनकथा नाही; ती स्वत:च्या अस्तित्वाचा शोध, स्त्रीची पुनर्रचना आणि मानवनिर्मित सीमांना दिलेले सशक्त आव्हान आहे. वृद्ध स्त्रीला समाज ज्या चौकटीत पाहतो, त्या मोडून ऐंशी वर्षीय ‘मा’ स्वतःची ओळख नव्याने घडवते. वृद्धत्व म्हणजे केवळ क्षय नाही, तर नव्या अनुभवांचे आणि आत्मशोधाचे स्वातंत्र्य आहे, हा संदेश ही कादंबरी देते. हिंदीतील म्हणी, शब्दखेळ, रूपक आणि विनोद यांच्या साहाय्याने कथनाला अनोखी रंगत देते. डेझी रॉकवेल यांनी मूळ हिंदीतील लय, विनोद आणि आशय इंग्रजीत प्रभावीपणे पोहोचवला. यामुळे ही कादंबरी जागतिक स्तरावर लक्ष्यवेधी ठरली.

---- विनिशा धामणकर

 

----=====----