मराठी साहित्यातील पहिल्या दलित स्त्री आत्मचरित्राच्या लेखिका शांताबाई कृष्णाजी कांबळे यांचे पुण्यात आज सकाळी ७ वा. वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्या शंभर वर्षांच्या होत्या. दलित पँथरचे नेते दिवंगत प्रा. अरुण कांबळे यांच्या त्या मातोश्री होत.
‘माज्या जल्माची चित्तरकथा’ हे त्याचं आत्मवृत्त विशेष गाजलं. पहिल्यांदा मार्च १९८३ साली ते पूर्वा मासिकात आलं, त्या आधी साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेंद्र बारलिंगे यांनी या पुस्तकाला १९८२ आली अनुदान दिलं आणि ते पूर्वा प्रकाशना तर्फे १७ जून १९८६ रोजी पुस्तक रूपात आलं.
शांताबाई यांचा जन्म १ मार्च १९२३ रोजी मु. पो. आटपाडी , जि. सांगली येथे झाला. शिक्षिका म्हणून सोलापूर जिल्हा स्कूल बोर्डात त्यांची १६ जानेवारी १९४२ रोजी नियुक्ती झाली. त्या जिल्ह्यातील पहिल्या दलित शिक्षिका ठरल्या.
१९५२ साली पुण्याच्या विमेन्स कॉलेजमधून त्या उत्तीर्ण झाल्या. काही काळ सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं.
२८ फेब्रुवारी १९८१ रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर मराठी वाङ्मयातील दलित स्त्रीचे पहिलेच आत्मकथन त्यांनी लिहिले.
'नाजुका' ह्या नावाने मुंबई दूरदर्शनवर चित्रमालिकेच्या स्वरूपात १० ऑगस्ट १९९० पासून हे आत्मकथन सादर झालं. फ्रेंच, इंग्रजी, हिंदी भाषेत पुस्तकरूपाने अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत. 'फेमिना' मासिकाच्या काही अंकांतून इंग्रजीत अनुवादित झाले आहेत.
त्यांच्या मागे मुले, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. त्यांचे पती कृष्णाजी नारायण कांबळे (गुरुजी), ‘मी कृष्णा’ हे त्यांचे आत्मकथन.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, तीरमारे गुरुजी यांचा सहवास त्यांना लाभला.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.