अलीकडे मी काही नवीन प्रेमकथा वाचल्या. त्यात “सुस्वरूप” मुलींच्या प्रेमात पडलेल्या मुलांच्या कथा होत्या. 

त्यांच्या लेखी “सुस्वरूप”चा अर्थ उंच, शिडशिडीत आणि गोरीपान मुलगी. सुस्वरुपतेची ही गृहितकं कोणी तयार केली माहित नाही. पण ब्रिटीशांच्या काळात ती अधिक तीक्ष्ण झाली एवढं नक्की. खरं तर आपला देश कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा. अगदी पूर्वीपासून स्त्री पुरुष शेतात राबत आले आहेत. त्यांची त्वचा उन्हात चांगलीच रापायाची. त्यांच्या ह्या रापलेल्या त्वचेच्या रंगाला मेहनतीची तकाकी असायची. पण त्याच वेळी ज्या समाजाच्या स्त्रिया आणि पुरुष उन्हात राबण्याची कामं करीत नव्हते त्यांच्या त्वचेत काही फारसा फरक पडला नाही. त्यामुळे त्यांची पुढची पिढी सुद्धा तशीच त्वचा घेऊन जन्मली. त्यांच्या  त्वचेचा रंग हा सप्त रंगात बसणारा नव्हता म्हणून त्यांच्या रंगाला “गोरा” हा विशेष रंग म्हणून संबोधण्यात आलं. “गोरा” हा रंग इतर कोणत्या वस्तूचा असतो का? नाही. काळा, सावळा, करडा रंग मात्र अनेक वस्तूंचा असतो. त्यामुळे गोरा हा रंगांच्या पंक्तीत न बसणारा रंग ह्या मेहनत न करणाऱ्या समुदायाच्या लोकांना लागू झाला आणि साहित्याची निर्मिती करणारे तेच लोक असल्यामुळे “गोरा” ह्या रंगाला साहित्याच्या माध्यमातून समाजमान्यता आणि वर्चस्व मिळत गेलं!

यामुळेच मुलगी गोरी असेल, तर ती “सुस्वरूप”, मग ती बाकीच्या बाबतीत कशी का असेना, अशी धारणा आपल्याकडे अगदी सहज रूढ झाली. काळ्या सावळ्या वर्णाच्या लोकांमध्ये विशेष करून मुलींमध्ये न्यूनगंड पेरण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग झाला. असा न्यूनगंड आलेली बहुजन वर्गातील मुलं मुली आपल्या आयुष्यात फार काही करू शकत नाहीत. आपसूकच मेहनती नसलेल्या समुदायाचे लोक सातत्याने प्रबळ होत जातात. गोरा हा एक वर्ण किंवा त्वचेचा रंग आहे. त्या त्वचेच्या आतील माणूस हा चांगला - वाईट, विद्वान - सुमार, धीट – भित्रा, दयाळू निर्दयी, बोलका – अबोल अशा कोणत्याही स्वभाव वैशिष्ट्यांचा असू शकतो. पण आपल्या धरणाच अशा झाल्या आहेत की गोरा असेल तर तो विशिष्ट जातीचा आणि त्यामुळेच तो विद्वान असा अंदाज आपण आपलाच लावत असतो. आपल्या देशात ज्या काही सांस्कृतिक चुका झाल्या त्यात “गोरेपणाला” अवास्तव महत्त्व देणं ही एक महत्त्वाची चूक आहे असं मला वाटतं.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा गोरे आणि मजबूत देहयष्टीचे होते. त्यांना पहिल्यांदा जेव्हा महात्मा गांधींनी पाहिलं तेव्हा ते या चुकीच्या गृहितकांमुळे फसले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा गांधीजी आणि कॉंग्रेसच्या दलितांच्या बाबतीत असलेल्या भूमिकांबाबत नाराज होते तेव्हा गांधीजीनी त्यांना भेटायला बोलावलं. गांधीजीनी दलितांसाठी काय काय प्रयत्न केले ते बाबासाहेबांना सांगितलं. “मी हिंदू आणि अस्पृश्यांना वेगळं समजत नाही आणि कॉंग्रेसने दलितांसाठी अनेक गोष्टी केल्या आहेत,” असं ते बाबासाहेबांना म्हणाले. तेव्हा बाबासाहेब त्यांना म्हणाले की, “कॉंग्रेसचे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत. गांधीजी, मला माझी मातृभूमी नाही.” डॉ. आंबेडकर तिथून निघाल्यावर गांधीजीनी महादेवभाईना विचारलं, “आंबेडकर मला मातृभूमी नाही असं का म्हणाले?” तेव्हा महादेवभाई म्हणाले, “कदाचित ते महार जातीचे आहेत म्हणून असं म्हणाले असतील.” हे ऐकताच गांधीजीना आश्चर्याचा धक्का बसला. कारण बाबासाहेबांचा गोरा वर्ण आणि विद्वत्ता बघून ते पुण्याचे पुरोगामी ब्राम्हण असावेत असा त्यांचा ग्रह झाला होता. यात गांधीजींची चूक नाही. आपली गृहितकंच तशी आहेत.



एखादा गोऱ्या वर्णाचा माणूस म्हणजे विद्वान माणूस असं गृहीत धरल्यामुळे एखाद्या सावळ्या किंवा काळ्या वर्णाच्या स्त्री किंवा पुरुषाच्या विद्वत्तेवर आधी शंका घेतली जाते. नोकरी किंवा कोणताही प्रस्ताव मांडताना अशा लोकांना लगेच स्वीकारलं जात नाही. मग जर बोलण्या चालण्यातून तो माणूस हुशार, विद्वान वाटला तरच त्याच्याशी पुढे संवाद साधला जातो. प्रेम प्रकरणात किंवा लग्न जुळवण्याच्या बाबतीत ही गोष्ट प्रामुख्याने पहिली जाते. तुम्ही जर मॅट्रिमोनियल जाहिराती पहिल्यात तर त्यात “गोरी वधू हवी” अशा जाहिराती शेकड्याने दिसतील. यासाठी एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे आईवडील गोरे असले किंवा पालकांमध्ये कोणी एक गोरं असेल तर मुलं गोरी किंवा निमगोरी तरी होतातच. म्हणजे येऊन जाऊन त्यांना आपली पुढची संपूर्ण पिढी गोरीच करायची असते. बाकी त्यांच्यात काही गुण असो वा नसो.

काहीवेळा तर हिमोग्लोबिन किंवा रक्तात लोहाची कमी असल्यामुळे त्वचेला गोरेपणा येतो. पण या बाबीकडे दुर्लक्ष केलं जातं. त्या व्यक्तीच्या शारीरिक उणीवेपेक्षा तिचं दिसणं फार महत्त्वाचं मानलं जातं. पुढे आजार त्याना त्यांच्यातील शारीरिक उणिवांमुळे काही त्रास झालाच तर त्यांना सगळ्यांकडून सहानुभूती मिळते. काळी-सावळी, धडधाकट व्यक्ती मात्र राब राब राबली तरी तिला कोणी विचारत नाही.    

हेही वाचा - काळ्या वर्णाच्या मुलीने आफ्रिकेत रोवला भारताचा झेंडा

अशा गृहितकांमुळे काळ्या किंवा सावळ्या मुलींच्या पालकांना आपल्या मुली उजवताना अडचणी येतात. त्यांची अशी काळजी पाहूनच मग ‘फेअर अँड लव्हली’ सारख्या क्रीम्स बाजारात येतात आणि तुफान पैसे कमावतात. अर्थात याने ना गोरेपणा येतो ना मुलींची लग्न होतात. ह्या असल्या गृहीतकांच्या विरोधात आता समाजमानस तयार होत आहे ही अत्यंत चांगली बाब आहे. फेअर अँड लव्हलीने आपलं नाव “ग्लो अँड लव्हली” असं केलं आहे. अशी नावं बदलणं हे प्रतीकात्मक नक्कीच असतं पण त्यामुळे समाजाची मानसिकता खरंच बदलली आहे का हा संशोधनाचा विषय आहे. दुष्ट परंपरा निपटून काढल्या तरी त्यांचे अवशेष कुठे ना कुठे राहतातच. गोरेपणाच्या ह्या काळ्या मनोवृत्ती आपल्या सभोवती खूप आहेत. आपल्या संस्कृतीने केलेली ही घोडचूक येत्या काळातील सुबुद्ध नागरिक सुधारतील ही आशा आहे.