मुंबई, दि, २२ जानेवारी २०२३: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुविद्य पत्नी डॉ माईसाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ' डॉ आंबेडकरांच्या सहवासात' या आत्मचरित्रपर ग्रंथाचा इंग्रजी अनुवादित ग्रंथ ( बाबासाहेब: माय लाईफ विथ डॉ आंबेडकर) पेंगविन पब्लिकेशनने नुकताच प्रकाशित केला आहे. त्यावर येत्या शुक्रवारी २७ जानेवारी रोजी माईसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या फोर्ट - हुतात्मा चौक येथील ' किताबखाना' तर्फे एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम संध्याकाळी ५.३० वाजता किताबखाना येथेच पार पडणार आहे.


या चर्चासत्राला माईसाहेब आंबेडकर यांच्या इंग्रजी आत्मचरित्र ग्रंथाचे लेखक, प्रख्यात अनुवादक नदीम खान हे स्वतः उपस्थित राहणार आहेत. तसेच डॉ आंबेडकर जीवन चरित्र व चळवळीचे संशोधक विजय सुरवाडे आणि ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ हे या चर्चासत्रात प्रमुख वक्ते आहेत.


टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मधील प्रा अवथी रामय्या हे या चर्चासत्राचे सुत्रसंचालन करणार आहेत.


डॉ माईसाहेब आंबेडकर यांच्या मराठी आत्मचरित्राची आता पाचवी आवृत्तीही प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित झाल्याने हे आत्मचरित्र जगभरात जाणार आहे. त्याचे अनुवादक नदीम खान यांनीच यापूर्वी विश्वास पाटील यांची 'पानिपत' आणि साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेल्या अवधूत डोंगरे यांच्या ' स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट' या कादंबऱ्याचा अनुवाद केला आहे. त्यांचे आतापर्यंत डझनभर अनुवादित ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.