महसा अमीनच्या मृत्युनंतर इराणी जनतेत जनक्षोभ उसळला! |
लेखिका - - मुक्ता चैतन्य
बावीस वर्षांची महसा अमीन इराणच्या संस्कृती रक्षकांच्या क्रौर्याची बळी ठरली.
त्यानंतर इराणमधल्या स्त्रिया आणि पुरुषही मोठ्याप्रमाणावर रस्त्यावर उतरले. संस्कृती आणि धर्म रक्षणाच्या नावाखाली महिलांवर लादल्या जाणाऱ्या गोष्टींच्या विरोधात इराणसकट जगभर आंदोलने सुरु झाली. कशाकशापासून ‘आजादी’ हवी आहे याविषयी सोशल मीडियावर; विशेषतः ट्विटर आणि इंस्टाग्रामवर अनेक इराणी स्त्री पुरुष लिहीत होते, स्वतःचे व्हिडीओ पोस्ट करत होते. त्या अस्वस्थतेमध्ये एक २५ वर्षांचा मुलगाही आतून हलला होता. आजूबाजूला जे काही सुरु आहे ते बरोबर नाहीये, त्याचा कडाडून विरोध झालाच पाहिजे ही भावना त्याच्याही मनात तीव्र होती आणि त्यातूनच जन्म झाला एका गाण्याचा. ‘बराये’.
शर्विन हाजीपौर या तरुणाने त्याच्या मनातल्या अस्वस्थतेतून हे गाणं तयार केलं, इंस्टाग्रामवर पब्लिश केलं आणि दोनच दिवसात ४ लाख लोकांपर्यंत ते पोचलं.
ग्रॅमी पुरस्कारांमध्ये यंदा एका नव्या विभागाचा समावेश करण्यात आला आहे. त्या विभागाला त्यांनी बेस्ट सॉंग फॉर सोशल चेंज म्हटलं आहे. या विभागात यंदा सर्वोत्कृष्ठ गीत म्हणून बरायेची निवड झालेली आहे. आणि ‘आझादी’ साठी लिहिलेल्या, गायलेल्या गाण्यासाठी ही फार मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे.
एकीकडे इराणच्या आंदोलनाचं गाणं म्हणून ते स्वीकारलं गेलं तर दुसरीकडे गाणं प्रसारित झाल्यानंतर दोनच दिवसात शर्विनला अटक झाली. समुद्रकिनारच्या बाबोलसारच्या आपल्या घरात बसून त्याने हे गाणं लिहिलं, त्याला चाल लावली आणि प्रसारित केलं होतं. अटक झाल्यानंतर काही महिन्यांनी त्याला जामीन मिळाला पण तोवर गाणं वणव्याप्रमाणे पसरलं. आज ते त्याच्या इंस्टवर नसलं तरी इंटरनेटच्या महाजालात उपलब्ध आहे.
तेहरानमधील ह्युमन राईट्स ऍक्टिव्हिस्ट न्यूज एजन्सीनुसार इराणच्या या आंदोलनात १६४ शहरातले आजवर ५२७ आंदोलनकर्ते मृत्युमुखी पडले आहेत.
जी अस्वस्थता माणसांच्या मनात, डोळ्यात, रस्त्यावर दिसते तीच हे गाणं ऐकताना जाणवून जाते. खरंतर हे गाणं फक्त इराणी आंदोलनाचा चेहरा नाहीये तर जिथे जिथे ‘आझादी’ ची अपेक्षा आहे, त्या प्रत्येक व्यक्तीचं, समाजाचं हे गाणं आहे.
‘बराये’चा अर्थ ‘च्या साठी’… रस्त्यावर मुक्त वावरण्यासाठी, चुंबन घेतलं की जी भीती वाटते त्यापासून… अफगाण मुलांसाठी... बाल मजूरी आणि प्रदूषित हवा यापासून... विद्यार्थी आणि त्यांच्या भविष्यासाठी... त्या मुली ज्यांना वाटतं आपण मुलगा म्हणून जन्माला आलो असतो तर बरं झालं असतं... आणि शेवटी.... गाणं संपतं तीन शब्दांवर.... जीन, जिंदगी, आझादी म्हणजे स्त्रिया, आयुष्य आणि स्वातंत्र्य… for freedom…स्वातंत्र्यासाठी….
वेळ काढून गाणं नक्की ऐका. अंगावर काटे आणि डोळ्यात पाणी तरळून जातंच. युट्युबवर सबटायटस सहित गाणं उपलब्ध आहे. इराणच्या रस्त्यावर उतरलेल्या सामान्य नागरिकांच्या मनातला प्रस्थापित सरकरविरुद्ध असलेला राग, प्रचंड अस्वस्थता आणि बदलाची आशा आपल्यापर्यंत पोचल्याशिवाय राहत नाही.
जगभर एक विचित्र अस्वस्थता पसरलेली असताना, बरायेसारखं गाणं त्या प्रत्येक अस्वस्थ मनाचा आवाज बनतं.... नाही, बनलं आहे.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.