ट्रेन मधल्या बाकावर ती आणि मी समोरासमोर

तिच्या डोळ्यांवर नाचत होता निद्रेचा मोर

मीही होते पेंगत पण डोळ्यात जाग होती

चुकून डोळा लागला तर पंचायत झाली असती....

ती डुलक्या देताना मला लागला तिचा पाय,

गडबडीत जागी झाली म्हणत काय झालं तरी काय!....

पायाला पाय लागला म्हणून मी हृदयाला हात लावला

तिने फक्त माझ्याकडे एक कटाक्ष टाकला....

हा प्रकार त्या प्रवासात तीन वेळा घडला,

तिन्ही वेळा मी हृदयाला हात लावला....

अपेक्षा होती की तीही हृदयाला हात लावेल

किमानपक्षी एक स्मित हास्य फेकेल.....

कसचं काय माझी थोडी निराशाच झाली

पुढे मात्र माझ्या आश्चर्याची पाळी आली....

काहीच मिनिटात जवळ एक छोटे मंदिर दिसले

तिकडे पाहून मॅडमनी आपले हात जोडले....

हे काय तिरपागडं, मला काही समजेना!

माणसाला लागलेला पाय तिला काय उमजेना?

माणसापेक्षा देव इतका मोठा असतो?

नाही, देव मोठा असेल पण भाव खोटा असतो....

तिचा पाय लागल्याने मला काही जखम नाही झाली,

पण तिच्या दुर्लक्षाने माणुसकी मात्र दुखावली.....

पण तिच्या दुर्लक्षाने माणुसकी मात्र दुखावली.....