ट्रेन मधले ते धावते जग आपापल्या विश्वात दंग होते

मी थकलेल्या डोळ्यांनी माणसं वाचत बसले होते.....

समोरच्याच बाकावरची ‘ती’ मनोभावे पोथी वाचत होती

डोईवर पदर घेऊन अर्धोन्मीलित डोळ्यांनी करुणा भाकत होती...

दर पानावर जाताना कपाळ ते हृदय पूल बांधत होती,

भक्तिरसात अवघ्या न्हाऊन निघत होती.....

माहीम स्टेशन गेलं तशी ती लगोलग उठली

निर्माल्य भरलेली प्लास्टिकची पिशवी तितक्याच मनोभावे घेतली....

मिठी येताच तिने पिशवी मनोभावेच भिरकावली

पुन्हा येऊन मनोभावे पोथी वाचू लागली....

माझं थकलेलं डोकं अस्सं गरगर फिरू लागलं...

कोणालाच त्यात काही वावगं का नाही वाटलं?....

इतक्या भक्तीने सुद्धा शहाणपण येऊ नये?

मग मिठी नदीने तरी का पुन्हा कोपु नये?

का विचारांचं निर्माल्य घेऊन तिने गढूळ होत रहावं?

आणि का माणसाच्या भक्तीचा रस निमूट गिळत रहावं?

स्व-भोवतीचा पदर कधी तरी ढळेल का?

कल्याणाचे खरे अस्त्र कधी तरी कळेल का?

कोणच नसेल मग त्या विनाशाचा वाली

जर मनोभावी माणसे अशी मानभावी झाली....

जर मनोभावी माणसे अशी मानभावी झाली....