“अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला...”

अफाट समुद्रालाच आव्हान करणारे असेच काहीसे शब्द केरळच्या समुद्र किनाऱ्यावर सुद्धा घुमले असतील जेव्हा एक तृतीय पंथी तिथे पहिली वकील झाली.  पद्मलक्ष्मी ही केरळातील पहिली तृतीय पंथी वकील ठरली आहे.

गरीब आणि उपेक्षितांना न्याय मिळवून देण्याचं स्वप्न तर वकिलीचा नवा कोरा काळा कोट चढवणारे अनेक वकील पहातच असतात पण पद्मलक्ष्मीने पाहिलेल्या स्वप्नाला वास्तवाची किनार आहे. कारण तिच्या न्याय प्रक्रियेच्या यादीत पहिलीच नावे विश्वनाथन आणि मधु यांची आहेत ज्यांना चोरीच्या आरोपावरून जमावाने मारहाण केली. यात विश्वनाथन (46) या आदिवासी माणसाच्या पत्नीने ९ फेब्रुवारी २०२३ रोजी कोझिकोडेच्या रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला. इथेच त्याच्यावर चोरीचा आरोप झाला, त्याला मारहाण झाली आणि त्याने तिथल्या एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असं भासवलं गेलं. २०१८ साली तांदळाची चोरी केली म्हणून प्रकार मधु या आदिवासी माणसाला जामावाने मारहाण केली. जमावाने त्याला पोलिसांच्या हवाली केलं मात्र पोलिसांच्या गाडीतच त्याचा मृत्यू झाला. दोघांच्याही हत्यांना आत्महत्या म्हटलं गेलं. त्यांना योग्य न्याय मिळाला नाही. अशा लोकंना न्याय मिळवून देण्यासाठी पद्मलक्ष्मी लढा देणार असल्याच तिने सांगितलं.

प्रसार माध्यमांशी बोलताना पद्मलक्ष्मी म्हणाली, "ज्या प्रकरणांमध्ये मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले आहे अशा उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी मला लढा द्यायचा आहे. असे अनेक विश्वनाथन आणि मधु आहेत ज्यांना मला न्याय द्यायचा आहे.”  

भौतिकशास्त्रात पदवी शिक्षण घेतल्यावर पद्मलक्ष्मीने आपल्या कायद्याच्या अभ्यासाला सुरुवात केली. मात्र असं करत असताना तिने आपल्या शिक्षणाचा भार आपल्या पालकांवर टाकला नाही. तिची आई एका वकिलाकडे कारकून म्हणून काम करते आणि वडील कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये आहेत. आपला शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी तिने एका खाजगी विमा कंपनीची आणि एलआयसीची विमा एजंट म्हणून काम केलं.

समाज कितीही पुढारला तरी तृतीय पंथी व्यक्तीसाठी त्याची नजर अजून म्हणावी तशी बदलली नाही. पद्मलक्ष्मीलाही याची झळ पोहोचली. पण आपले पालक आणि आपल्या वरिष्ठ अधिवक्ता के व्ही भद्रकुमारी यांच्या पाठींब्यावर तिने हे यश मिळवलं. ती म्हणते, "मी सर्व प्रकारच्या नकारात्मकतेकडे दुर्लक्ष केलं. लोकांच्या निंदा नालस्तीकडे न पाहता सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं. हेच माझ्या यशाचं गमक आहे.”

गेल्या नोव्हेंबरपासून अधिवक्ता भद्रकुमारी यांच्यासोबत पद्मलक्ष्मी काम करत आहे. भद्रकुमारी यांनी केरळ उच्च न्यायालयात कायदेशीर व्यवसायातील मोठ्या वकिलांमध्ये तिचे स्थान निर्माण करण्यास तिला मदत केली आणि यासाठी ती त्यांचे ऋण मानते.

रविवार, 19 मार्च २०२३ रोजी नावनोंदणी झालेल्या 1,500 हून अधिक कायदा पदवीधरांपैकी पद्मलक्ष्मी तिचे नावनोंदणी प्रमाणपत्र मिळवणारी पहिली होती. ती म्हणाली, "केरळ बार कौन्सिलच्या सदस्यांमुळे हे शक्य झाले आहे. इथे नाव नोंदवताना मला आनंद होत आहे कारण विधी व्यवसायातील अनेक मोठ्या आसामी या परिषदेचा भाग आहेत आणि आता मीही आहे".

ती पुढे म्हणाली, “एक नवोदित वकील म्हणून मला न्यायालयीन कामकाजाबद्दल अजून बरंच काही शिकायचं आहे, कठोर परिश्रम करायचे आहेत आणि त्यानंतर गरीब आणि दुर्बलांचा आवाज व्हायचं आहे.

दरम्यान, केरळचे कायदा मंत्री पी राजीव आणि उच्च शिक्षण मंत्री आर बिंदू यांनी लक्ष्मीचे समाज माध्यमांवर पद्मलक्ष्मीच्या यशाबद्दल तिचे अभिनंदन केले.

"आपल्या आयुष्यातील सर्व अडचणींवर मात करणाऱ्या आणि केरळमधील पहिली ट्रान्सजेंडर वकील म्हणून नाव नोंदवणाऱ्या पद्मा लक्ष्मीचे अभिनंदन. पद्मा लक्ष्मीचे जीवन ट्रान्सजेंडर समुदायातील अधिकाधिक लोकांना कायदेशीर व्यवसायात येण्यासाठी प्रेरणा देईल," असं राजीव यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटचं आहे.

बिंदूने यांनी पद्मलक्ष्मीला ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत. "राज्यातील पहिल्या ट्रान्सजेंडर वकील म्हणून पद्म लक्ष्मीचे नाव आता केरळच्या इतिहासात कोरले जाईल ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. या प्रवासात तिला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला यात काही शंका नाही. पण तिने चिकाटीने धीर धरला. पद्मलक्ष्मीच्या यशामुळे राज्यातील आणखी अनेक ट्रान्स व्यक्तींना कायदेशीर व्यवसायात येण्यासाठी प्रेरणा मिळेल, असं त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटलं आहे.

2018 मध्ये नोंदणी झालेल्या तमिळनाडूच्या सत्यश्री शर्मिला या देशातील पहिल्या तृतीय पंथी वकील आहेत.