प्रतिनिधी - सुरेखा पैठणे 

दिनांक १० मार्च २०२३ 

फुले आंबेडकर अध्यासन आणि मराठी विभाग मुंबई विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ आंबेडकरी लेखिका प्रा आशालताताई कांबळे लिखित संशोधन ग्रंथ 'सावित्रीबाई फुले : साहित्यमीमांसा' ह्या पुस्तकावर परिसंवाद आयोजित करणयात आला होता. ह्या परिसंवादात डॉ श्यामल गरुड, डॉ संगीता ठोसर, डॉ गोविंद काजरेकर ह्या वक्त्यांनी ह्या संशोधनग्रंथाचे अनेक अंगाने चिकित्सक विश्लेषण केले. मुख्यतः पीएचडीच्या अभ्यासकांना हा ग्रंथ आणि ह्या पुस्तकाच्या लेखिकेने वापरलेली मूलगामी संशोधनवृत्ती याचा अभ्यास करताना एक मानदंड म्हणून अभ्यासता येणार याची खात्री तिन्ही वक्त्यांनी दिली. ह्या चर्चासत्राचे अध्यक्षस्थान डॉ लता प्रतिभा मधुकर ह्या होत्या. लता मॅडम यांनी ह्या ग्रंथाचे बहुआयामी समीक्षण करावे लागणार आणि हा शोधग्रंथ येत्या काळातील एक महत्वाचा दस्तऐवज ठरणार असे प्रतिपादन केले. इतक्या महत्वपूर्ण विषयाला शोधविषयक अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांसमोर आणि साहित्यिकांसमोर हा विषय आणला याचे श्रेय मुंबई विद्यापीठाच्या विभागप्रमुख डॉ वंदना महाजन आणि ह्या चर्चासत्राचे समन्वयक म्हणून आपली भूमिका बजावणारे डॉ अनिल सपकाळ यांना जाते..






या सुंदर वैचारिक चर्चासत्रात बरेच लेखक कवी साहित्यिक यांची विशेष उपस्थिती होती त्यात प्रामुख्याने ज्येष्ठ लेखिका उर्मिलाताई पवार, लेखक अविनाश कोल्हे, ज्येष्ठ कवी अविनाश गायकवाड, ज्येष्ठ साहित्यिक अरुण वाघ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कुंदाताई निळे, इतिहास अभ्यासक  नारायण भोसले आणि आमचा चळवळीतील लहान मित्र कॉम्रेड पंकज चाळके आदि उपस्थित होते.