खळाळत घरंगळतात सुट्टे पैसे तेव्हा

झणत्कार घुमतो अवतीभवती

आणि आठवतं तुला तुझंच मनमुराद हास्य.

आरशातल्या खोल गर्तेत निरखतेस तेव्हा दिसतेस तू...

किती वेगळी, कित्तीतरी वेगळी.

सुट्ट्या पैशांसारखीच चमकदार, ऐटदार, जड, भारी

आपली किंमत माहित असणारी....  

सुट्ट्या पैशांसारखीच

आयुष्यभर विखुरलेली स्वप्नं

एक एक उचलून साठवून ओच्यात ठेवतेस,

स्वप्नांच्या सागरासाठी एक एक थेंब जपतेस....

एखाद्या राणीने ओंजळभर मोहरा दान कराव्यात

अशा ऐटीत जगतेस. 

एकेका नाण्याने ऐश्वर्य उपभोगतेस....

तुला त्यांचं ओझं होत नाही

की कधी तुझा तोल जात नाही....

तुला तमा नसते कोणीही येऊन तुला मुडपून टाकण्याची 

तुला तमा नसते पिगी बँकेत अडकून कालबाह्य होण्याची....

छापा की काट्याचा तुझा खेळ युगान् युगे चाललेला

आपल्याच निर्णयाला आपणच दिलेली पुष्टी पाहण्याचा....

पण बघ, तुझ्या निर्णयाचा हिशेब तरी कोणी ठेवतं का?

की सुट्ट्या पैशांसारखीच असतेस न’गण्य’?....

सुट्टे पैसे फक्त ‘असतात’ तशीच तुही फक्त ‘असतेस’ का?....

मग आता तुझी किंमत जगाला कळायलाच हवी....

नाहीतर तुझी लकाकी फिकी पडेल,

नाहीतर गंज तुलाही चढेल....

स्वत:ला अशी साठवून ठेऊ नकोस,

ओच्यात, कोषात गोठून राहू नकोस....

बदलत्या वाऱ्याची दिशा पहा....

वाहती रहा, खेळती रहा...

आता नवी नाणी येऊ देत,

नवे येऊ देत - सुट्टे पैसे....

-         विनिशा धामणकर