एखाद्या चांगल्या विषयाची वाट कशी लावायची याची अनेक उदाहरणं मराठी हिंदी सिनेमात आपल्याला पाहायला मिळतील. पण ज्या वेब सिरीज मध्यमाकडून खूप अपेक्षा असतात त्या माध्यमाने सुद्धा हीच री ओढावी हे सिनेमा रसिकांसाठी खेदजनकच आहे. झी फाईव वर आलेला “मिसेस अंडरकवर” ह्या चित्रपटाने अशी काही निराशा केली आहे की यापुढे राधिका आपटे, सुमित व्यास आणि राजेश शर्मा सारख्या अभिनेत्यांचे सिनेमे पाहायचे की नाही याचा विचार करावा लागेल.

एक हाउसवाईफ म्हणजेच गृहिणी काय करू शकते हे दाखवण्याचा चित्रपटाचा उद्देश आहे आणि ह्याच एका वन लाईनने अनेकांचं लक्ष ह्या वेब सिनेमाकडे वेधलं. पण या वन लाईनच्या भोवती गुंफलेली कथा म्हणजे एक आगापिछा नसलेला फार्स आहे. ‘आमचं ठरलंय’ पद्धतीने सिनेमाची एक एक फ्रेम पुढे सरकत जाते आणि ‘हे कसं काय बुवा?’ असा प्रश्न आपण आपल्यालाच विचारून नखं कुरतडत राहतो.

चित्रपटाची सुरुवात आधीच 16 खून केलेला कॉमन मॅन त्याच्या 17 व्या खुनाची नांदी करत असताना होते. हा सामान्य माणूस किंवा आम आदमी स्वत:च्या पायावर उभ्या राहून समाजात स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या किंवा करू इच्छिणाऱ्या महिलांना मारत सुटलेला असतो. मग कधी तो त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतो तर कधी साध्या ओळखीतून त्यांच्या जीवाशी खेळतो. ह्या प्रत्येक खुनाच्या वेळी तो त्या पीडित महिलेच्या मोबाईल वरूनच व्हिडीओ शूट करून तो वायरल करतो आणि मग त्या महिलेचा मोकळ्या सुनसान रस्त्यावर खून करतो. हा सामान्य माणूस पोलिसांच्या डोक्याला ताप झालेला असतो कारण त्याचा कोणताच माग पोलिसांना लागत नाही. अशा वेळी स्पेशल फोर्सकडे ही केस येते पण हा सामान्य माणूस एक एक करून त्या स्पेशल फोर्स मधल्या लोकांना म्हणजेच एजंट्सना सुद्धा ढगाआड पाठवू लागतो. तेव्हा पूर्वी अंडरकवर एजंट राहिलेल्या दुर्गाच्या शोधात स्पेशल फोर्सची टीम निघते आणि ही दुर्गा त्यांना सापडते तीच असते आपली राधिका आपटे.

दुर्गा 12 वर्षांपूर्वी अंडरकवर एजंट म्हणून काम करत असते. त्यावेळचं तिचं मिशन संपल्यावर तिचं लग्न लाऊन दिलं जातं. आज तिचा संसार आहे, नवरा, सासू, सासरे एक मुलगा अशा घरकुलात ती एका सामान्य हाउसवाईफ प्रमाणे रमली आहे. त्यामुळे त्या घरात सुद्धा “आई कुठे काय करते?” सदृश नाट्य घडत असतं. हो नाही करता करता दुर्गा अंडरकवर एजंट म्हणून काम स्वीकारते. एका हाउसवाईफचं एकंदरीत वातावरण दाखवण्यात चित्रपट यशस्वी ठरला आहे, अगदी त्यातील कॉमिक टायमिंगसह. पण जिथे गुन्हेगाराचा शोध आणि गुन्ह्याचा तपास या बाबी येतात तिथे चित्रपट सपशेल आपटला आहे.



सामान्य माणसातील खुन्याला शोधणं अत्यंत कठीण असताना तो एका महाविद्यालयात होणाऱ्या स्त्री सशक्तीकरण कार्यक्रमाचा मुख्य व्याख्याता म्हणूनच येईल अशी शोध पथकाला आणि दुर्गाला खात्री कशी काय होते? त्याच्या हातावर असणारा मस्सा बघून त्याला ओळखणारी दुर्गा त्याचा मस्सा आधी कुठे पाहिला होता याचं स्पष्टीकरण देत नाही. हा खुनी सामान्य माणूस एका संघटनेच्या माध्यमातून स्वावलंबी आणि कर्तृत्ववान स्त्रियांना मारत असतो. त्या संघटनेत तो सोडून एक आयेशा नावाची महिलाच फक्त चित्रपटात दिसते. ही आयेशा काहीही कारण नसताना दुर्गाच्या नवऱ्याच्या म्हणजेच देवच्या आयुष्यात आणून त्यांच्यात विवाहबाह्य संबंध प्रस्थपित केले आहेत. आयेशा तेव्हा देवच्या आयुष्यात येते जेव्हा दुर्गा पूर्वी अंडरकवर एजंट होती हे कोणालाच माहित नसते. एक मिनिटासाठी मानलं की कॉमन मॅन संघटनेला दुर्गाविषयी माहित होतं तर मग त्यांनी दुर्गावर नजर ठेवायला हवी होती. किंवा आयेशाला देव सोबत अफेअर करण्यापेक्षा दुर्गावर नजर ठेवायला सांगायला हवं असतं. पण असं कहीही होत नाही. याशिवाय आयेशा कॉमन मॅनच्या सांगण्यावरून देवला मारण्याचा प्लान करते याचंही कारण स्पष्ट होत नाही. देवला मारण्याचा प्लान हा त्याला वाचवताना हाउसवाईफ असलेल्या त्याच्या बायकोची कमाल फायटिंग आणि पुन्हा ‘एक हाउसवाईफ काय करू शकते ते पहा’ हा संदेश देण्यासाठी होता एवढंच इथे म्हणावं लागेल. म्हणजे बायकोची शूरता दाखवायची तर तिच्या नवऱ्याच्या खुनाचा प्लान दाखवा असं ते ‘आमचं आधीच ठरलंय’ प्रकरण आहे. राधिका आपटेची फायटिंग मात्र जबरदस्त.

शेवटाविषयी न बोललेलं बरं. नाही, सिनेमाच्या परिक्षणात शेवट सांगू नये म्हणून नव्हे तर इतका अचाट शेवट तर पूर्वीच्या अमिताभ बच्चनच्या देमार चित्रपटात सुद्धा नव्हता. नाही राहवत. सांगतेच. कॉमन मॅन हाती लागल्यावर खुद्द मुख्यमंत्री महोदया नवदुर्गांना म्हणजे दुर्गाप्रमाणे असलेल्या बाकी आठ गृहिणींना त्याला मारण्याची परवानगी देतात आणि त्या नवदुर्गा त्याला मारतात सुद्धा. आपला देश तालिबानी आहे का? मुख्य म्हणजे हे आपल्या देशात होईल का? हाउसवाईफ सगळं काही करू शकत असली तरी ती कायदा सुद्धा आपल्या हातात घेऊ शकते का? सिनेमाकारांना नेमकं काय सांगायचं आहे? आपल्या संकल्पना स्पष्ट नसतील तर कशाला उगीच असले बिनबुडाचे स्टंट दाखवायचे!

बरं चित्रपटाच्या शेवटी सुद्धा स्वावलंबी स्त्रियांना मारण्याचा ह्या कॉमन मॅन संघटनेचा हेतू काय? याची सुरुवात कधी झाली? या संघटनेचा म्होरक्या कोण? त्यांचे आणखी कोणी माणसं आहेत का? याचा काहीच तपास केला जात नाही. कोणत्याही गुन्ह्यामागे एक उद्देश, एक मोटीव असतो, हा मोटीवच चित्रपटात बाद ठरवला गेला आहे.

चित्रपटातील मुख्य उणीव लिखाणात आणि संशोधनात आहे. ती उणीव लेखक अनुश्री मेहता आणि अबीर सेनगुप्ता यांनी भरून काढायला हवी होती. किमान अनुश्री मेहता यांनी आपल्या दिग्दर्शनात ही उणीव भरायला हवी होती. चित्रपट सुमार असला तरी अभिनेत्यांची काम झकास आहेत. एक अनुभव म्हणून चित्रपट पाहायला हरकत नाही.

मी देते आहे 5 पैकी 2 गुण.