विषय, आशय, कथा, गाणी, संदेश आणि अविश्वसनीय शेवट... ह्या मसाल्यांमुळे जाळ अन् धूर संगटच काढून मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपलं बस्तान बसवलेलं नाव म्हणजे नागराज मंजुळे. कोणत्याही चित्रपटाशी हे नाव जुळलं गेलं मग ते दिग्दर्शक म्हणून असू दे, निर्माता म्हणून असू दे की अभिनेता म्हणून असू दे, प्रेक्षक तो चित्रपट पाहायला उतावीळ असतोच. ‘घर बंदूक बिरयानी’ने तर प्रदर्शना आधीच मोठा जाळ तयार केला होता. कारण इतर चित्रपटात सुभाष घई यांच्या प्रमाणे अधून मधून किंवा एखाद्या बारक्या भुमिकेत पडद्यावर दिसणारे नागराज अण्णा ‘घ.ब.बि.’ मध्ये सिंघमच्या भुमिकेत दिसणार. शिवाय समोर सयाजी शिंदे सारखे मातब्बर अभिनेते होते. म्हणजे महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांच्या पाहायला मिळाली तशी अभिनयाची जुगलबंदी यातही पाहायला मिळणार अशी अपेक्षा होती. पण नागराज अण्णा म्हणजे प्रस्थापित सगळ्याच गोष्टींना फाटा देणारे आहेत हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. ‘घर बंदूक बिरयानी’ ह्या तीन शब्दांप्रमाणे हा चित्रपट सुद्धा तीन नायकांचा आहे. ह्यात कोणी खलनायिका असेल तर ती आहे व्यवस्था. अर्थात आटपाट प्रोडक्शन म्हणजे नागराज अण्णांच्या सर्वच चित्रपटात तीच खलनायिका असते. ह्या खलनायिकेची अनेक रूपं हाच ह्या चित्रपटाचा गाभा आहे. पण चित्रपटाचा वेग अनावश्यक अशा प्रसंगांनी, अनावश्यक विनोदाने मंदावतो. चांगल्या विषयाचा गाभा कुठेतरी हलून जातो.       

चित्रपटाचा मुख्य प्रदेश आहे तो एक नक्षलबारी सदृश असलेल्या कोलगड ह्या गावाचा. इथे गावात शांती आणि सुबत्ता असली तरी गावाच्या समृद्ध आणि वृक्षराजींनी नटलेल्या जंगलात आत किती क्रौर्य दडलेलं आहे हे सुरुवातीच्या काही दृश्यातच आपल्याला दिसतं. पोलिसांना सुगावा लागताच कोलगडच्या जंगलात पोलीस उग्रवाद्यांना ठेचून काढण्यासाठी घुसतात पण केवळ गोळ्या किती वापरल्या गेल्या याचा हिशेब सरकारला द्यावा लागतो म्हणून त्या संपवणं आवश्यक असल्याने सहज उलट्या हाताने मारलेल्या गोळीला उग्रवाद्यांचा म्होरक्या असलेल्या पल्लमची (सयाजी शिंदे) प्रेयसी मारिया बळी पडते. मारियाला जंगलातून पळापळी करून जगण्याचा कंटाळा आलेला असतो. तिला चांगलं जीवन जागून संसार करायचा असतो. म्हणून मारण्या पूर्वी काही वेळ आधीच ती पल्लमकडून आपण सरकारला, पोलिसांना शरण जाण्याचं आश्वासन घेते. पल्लमही ह्या आश्वासनाने खुश असतो पण त्यातच मारियाला गोळी लागते. आपल्या प्रेमळ आणि उत्तम बिरयानी बनवणाऱ्या प्रेयसीला गमावल्यावर पल्लमच्या डोक्यात सूड घेण्याचे विचार येऊ लागतात. मारियाचा मृत्यू ते तिच्यासाठीचा पल्लमचा शोक हा सर्वच भाग फार्सिकल केला आहे. मारियाच्या मृत्यूने झालेल्या वेदनेचे पडसाद कुठेच दिसत नाही. पल्लम रडण्याचं नाटक करतोय की काय आणि त्यामुळे ह्या मृत्यूची टर उडवली जाते आहे की काय असं वाटून जातं. असं केल्याने नेमकं काय साधलं ते कळत नाही.



दरम्यान आपल्या दुसऱ्या हिरोची म्हणजे राजू आचारी (आकाश ठोसर) प्रेमकहाणी सुरु होते. त्याला लक्ष्मीशी (सायली पाटील) लग्न करायचं आहे पण लक्ष्मीचा बाप लग्नासाठी एक घर असण्याची अट राजूला घालतो. उत्तम बिरयानी बनवणाऱ्या राजूला स्वत:चं घर म्हणजे मोठी चैन असते. यासाठी पैशाच्या लोभाने तो अपघाताने पल्लमच्या टोळीसाठी बिरयानी बनवण्याचं काम स्वीकारतो. पण त्याला तिथेही पैसा मिळत नाही. उलट उग्रवाद्यांच्या बरोबर जंगलात पळत जगावं लागतं.

पुढे येतो आपला मुख्य हिरो म्हणजे राया पाटील (नागराज मंजुळे). अत्यंत सत्शील पोलीस अधिकारी असल्यामुळे त्याचा नेहमीच कोणा ना कोणाशी पंगा होत असतो त्यामुळे त्याची कायम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली होत असते. यामुळे त्याची पत्नी वैतागलेली असते. आमदाराच्या मुलांसोबत पंगा घेतल्यामुळे त्याची बदली पुण्याहून अर्थात कोलगडला होते. त्याची पत्नी मात्र दोन मुलींना घेऊन पुण्यातच राहण्याचा निर्णय घेते. पण ती त्यांना घटस्फोट देण्यासाठी वकीलपत्र पाठवते. रायाला हे नको असतो म्हणून तो आमदाराची माफी मागून पुन्हा पुण्याला बदली करून घेतो. मात्र आमदारांची मुलं त्याला अधिकच अपमानित करतात तेव्हा पुण्याची बदली गुंडाळून ठेवून आमदाराला आणि त्याच्या मुलांना हाणतो, बडीवतो आणि पुन्हा एकदा कोलगडला येतो. इथे त्याचा पल्लमच्या टोळीसोबत पाठशिवणीचा खेळ रंगतो. यात पोलीस उग्रवाद्यांसोबत कशा प्रकारे वागतात, शरण येऊ इच्छिणारे उग्रवादी पोलिसांनाच कसे आणि का घाबरतात, पोलिसांसाठी उग्रवाद्यांना मारणं म्हणजे आपल्या प्रमोशनची निश्चिती कशी असते हे प्रखरतेनं मांडलं आहे.

इथे पल्लमच्या उग्रवादी बनण्याची कथा अगदी एका ओळीत येते. स्थानिक आमदाराचा सूड उगवण्याची त्याची शपथ सुद्धा शेवटच्या काही दृश्यात येते. ही कथा अर्थातच पार्ट टू मध्ये येईल अशी अशा आहे कारण याची नांदी करण्यासाठी किशोर कदम शेवटी पडद्यावर येतात.

चित्रपटात नागराज अण्णाची संपूर्ण फायटिंगमध्ये किमान 20 मिनिटांचा फुटेज गेला आहे. एवढ्या मोठ्या भागात पल्लमची थोडी कथा येऊ शकली असती. अगदीच काही नाही तर चित्रपट लांबून कंटाळवाणा झाला नसता. हेमंत अवताडे यांचं दिग्दर्शन मात्र अप्रतिम आहे. त्यांच्याकडून भविष्यात अधिक चांगले चित्रपट येण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. बाकी नागराज टोळी याही चित्रपटात आहेच पण हे सर्व कलाकर आता उमदे अभिनेते बनू लागले आहेत. सुरज पवारचा आणि सोमनाथ अवघडेचा खास उल्लेख करावा लागेल. सर्वात बाजी मारली ती प्रवीण डाळिंबकर यांनी. “शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाने रसिकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या या अभिनेत्याने प्रेमळ आणि सतत भुकेला उग्रवादी खूप छान साकारला आहे. यासोबतच विठ्ठल कले ह्या उमद्या अभिनेत्याने जॉर्ज हा हिंदी बोलणारा उग्रवादी खूप प्रत्ययकारी केला आहे. चित्रपटाची नायिका म्हणावी तर ती सायली पाटील आहे. पण तिला सुंदर दिसण्या पलीकडे फार काम नाही. आटपाटकडून ही अपेक्षा नव्हती. सगळ्यात भाव खाऊन जातो तो अर्थात आकाश ठोसर. आकाशला मोठ्या पडद्यावर पाहणं हा आल्हाददायक अनुभव आहे. शिवाय झुंडमध्ये खलनायक साकारलेल्या आकाशने ह्या चित्रपटातही सयाजी शिंदें आणि नागराज मंजुळे यांच्याशी बरोबरीचा मुकाबला करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.

एवी प्रफुल्चंद्र यांचं संगीत फार लक्षात राहणारं नाही पण त्या जंगलातील लोकांप्रमाणेच आडनीडं आहे त्यामुळे ते ह्या जंगलात शोभून दिसतं. आहाहा हेरो आणि हान की बडिव ही गाणी चांगलीच लोकप्रिय झाली आहेत.

वंचितांच्या आयुष्यावर चित्रपट हा आटपाट अर्थात नागराज मंजुळे यांची खासियत आहे. त्यात हा चित्रपट जंगल आणि दरीखोऱ्यात लपत फिरणाऱ्या डाकूंच्या जीवनावर आधारित असेल असं आधी वाटलं होतं. ही अपेक्षा पन्नास टक्के पूर्ण झाली आहे, पुढील भागात ही पूर्ण कथा उलगडेल अशी अशा करूया.

मी या चित्रपटाला देत आहे 5 पैकी 3 गुण.