भीमस्तुतीकार वि. तु. जाधव यांची स्मरणिका प्रकाशित



चवदार तळ्याचा आणि मनुस्मृती दहनाचा इतिहास अनेकांना आवडत नाही. पण तो इतिहास खोडून टाकता येत नाही. भीमस्तुतीमध्ये वि. तु. जाधवांनी याचा उल्लेख केला याला अनन्य साधारण महत्त्व आहे. म्हणूनच कोणी कितीही विरोध केला तरी बौद्ध पूजापाठात भीमस्तुती येणारच, असं प्रतिपादन आनंदराज आंबेडकर यांनी भीमस्तुतीकार वि. तु. जाधव यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या आरंभी आयोजित कार्यक्रमात केलं. 23 एप्रिल २०२३ रोजी मुंबईतील परळ भागात असलेल्या बौद्धजन पंचायत समितीच्या इमारतीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला आनंदराज आंबेडकर यांच्यासह ज्येष्ठ विचारवंत प्रा. शुक्राचार्य गायकवाड,  ज. वि. पवार, विनोद मोरे, लक्ष्मण भगत, राजेश घाडगे, मधु ताम्हाणे हे मान्यवर उपस्थित होते. ह्या प्रसंगी वि. तु. जाधव यांच्या कुटुंबीयांनी तयार केलेल्या स्मरणिकेचंही प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते झालं.  

वि. तु. जाधवांचं इतर अप्रकाशित साहित्य ह्या त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात आपण प्रकाशित करू असं आश्वासनही आनंदराज आंबेडकर यांनी आपल्या संबोधनात दिलं.  



प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांनी आपल्या संबोधनात म्हटलं की, भीमस्तुती लिहिताना वि. तु. जाधव यांनी अनेक संस्कृत शब्दांचा वापर केला आहे आणि त्याचा अर्थ चुकीचा होतो, यातून हिंदू धर्मीय मानसिकता डोकावते, यामुळे ही भीमस्तुती बौद्धविहारात म्हणून नये असा आग्रह काही लोक धरतात. पण जाधव यांनी वापरलेल्या एकेका शब्दाचा अर्थ फार मोठा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण कारकीर्दीचा आढावा ही भीमस्तुती घेते. त्यामुळे ह्या भीमस्तुतीला नाकाराण्याचं कारणच नाही. आपल्या संबोधनात प्रा. गायकवाड यांनी भीमस्तुतीतील काही शब्दांचा अर्थही सांगितला.



वि. तु. जाधव यांची जन्मशताब्दी त्यांच्या कुटुंबीयांनी का करावी? ही समाजाची जबाबदारी आहे, कारण आज भीमस्तुती आंबेडकरी समाजातील आबालवृद्धांच्या मुखी आहे, असं प्रतिपादन करून ज. वि. पवार यांनी आपल्या संबोधनात जाधव यांच्या स्मृतींना उजाळा दिला. ते म्हणाले की, मी कस्टममध्ये नोकरी करत असताना वि. तु. जाधव हे माझे वरिष्ठ होते. त्यामुळे काही काळ मला त्यांचा सहवास लाभला. त्यामुळे त्यांच्याशी खूप संवाद करू शकलो. त्याकाळी पाहिलं आंबेडकर चरित्र लिहिणारे खरावतेकर, घन:श्याम तळवटकर आणि वि. तु. जाधव हे कोकणातले पहिले महार  पदवीधारक तरुण होते. वि. तु. जाधव यांचं मराठी, इंग्रजी आणि संस्कृत वर प्रभुत्व होतं. कामाठीपुऱ्याच्या बाजूला असलेल्या सरदार हायस्कूलमध्ये ते संस्कृत शिक्षक होते. भीमस्तुती पहिल्यांदा छापली ती बाबासाहेब हयात असताना. बाबासाहेबांच्या जन्मदिनी म्हणजे 14 एप्रिल १९५४ रोजी निघालेल्या ‘जनता’च्या विशेषांकात पहिल्या पानावर ही भीमस्तुती छापली होती. त्यानंतर भारतीय बौद्धमहासभा आणि बौद्धजन पंचायत समिती यांनी ह्या भीमस्तुतीला मान्यता दिली. ह्या भीमस्तुती वर काही शब्द संस्कार करण्यासाठी एक समिती नेमली गेली ज्यात मीही होतो. यात गीतात काही शब्द बदल करून भीमस्तुती मान्य झाली आणि आज ती सर्वतोमुखी झाली. ज. वि. पवार यांनी जाधव यांच्या सिनेसृष्टी आणि रंगमंचावरील त्यांच्या कारकीर्दीचाही आढावा यावेळी घेतला.



सुमित प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘भीमस्तुतीकार वि. तु. जाधव’ स्मरणिकेचं संपादन ज्येष्ठ पत्रकार आणि वि. तु. जाधव यांच्या बहिणीचे सुपुत्र संजय कोचरेकर यांनी केलं आहे. या स्मरणिकेसाठी वि. तु. जाधव यांच्या स्नुषा अर्चना उल्हास जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रकाशन आणि जन्मशताब्दी आरम्भाच्या सोहळ्याला वि. तु. जाधव यांचे कुटुंबीय उपस्थित होते. जाधव यांचे नातू मंदार जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

‘भीमस्तुतीकार वि. तु. जाधव’ ही स्मरणिका सुमित प्रकाशनाने प्रकाशित केली आहे. 40 पानांच्या या स्मरणिकेचे स्वागत मूल्य रुपये १००/- आहे. ही स्मरणिका हवी असल्यास संपादक संजय कोचरेकर यांना 77180 46392 ह्या क्रमांकावर संपर्क करावा.