Photo Courtesy : The Trubune


केरळच्या कोची नजीकच्या समुद्रात १२ हजार कोटी रुपयांचे प्रतिबंधित ड्रग्ज पकडले.

केरळच्या कोची नजीकच्या समुद्रात भारतीय नौदल आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) यांनी मिळून केलेल्या “समुद्रगुप्त” मोहिमेत १२ हजार कोटी रुपयांचे तब्बल २५०० किलो वजनाचे मेथांफेटामाईन हे प्रतिबंधित ड्रग्ज पकडले. या मोहिमेत एका पाकिस्तानी नागरिकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पकडलेला आरोपी आणि संपूर्ण ड्रग्जचा साठा काल शनिवारी केरळच्या मतांचारी बंदरात आणण्यात आला. आता ह्या एवढ्या मोठ्या साठ्याचे नेमके ग्राहक कोण, कुठले याचा शोध एनसीबी घेत आहे. यासाठी पकडलेल्या पाकिस्तानी नागरिकाची चौकशी सुरु आहे.

एनसीबीला भारतीय नौदलाच्या गुप्तचर शाखेसोबत काम करत असताना सतत प्रतिबंधित आणि जीवघेणी ड्रग्ज ‘डेथ क्रेसेंट’ म्हणजेच मृत्यूमुखी चंद्रकोर म्हणून ओळखल्या गेलेल्या इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान इथून बराच मोठा माल लादलेली एक मदर शिप इराण आणि पाकिस्तान दरम्यान असलेल्या मकरान बंदरातून येत असल्याची माहिती मिळाली. या बोटीचा गुप्त पद्धतीने सातत्यपूर्ण मागोवा घेतल्या नंतर तिचा ड्रग्ज वितरणाचा संभाव्य मार्ग समजू शकला. त्यांनी ही माहिती समुद्रात उभ्या असलेल्या भारतीय नौदलाच्या बोटीवरील अधिकाऱ्यांना दिली.  

 मिळालेल्या माहितीवर भारतीय नौदलाने त्या मदर शिप वर छापा टाकून मेथांफेटामाईनच्या १३४ गोण्या हस्तगत केल्या. हे मेथांफेटामाईन तांदळाच्या गोण्यात भरून आणले जात होते. या गोण्यांवर पाकिस्तानी तांदूळ उत्पादकाचे शिक्के होते. ह्या छाप्यात पाकिस्तानी तस्कर लहान बोटीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता पण नौदलाने त्याला पकडलं.    

Photo Courtesy : The Hindu

भारतीय समुद्रात होत असलेल्या अवैध तस्करीची आणि त्यामुळे भारतीय सुरक्षेला पोहोचत असलेल्या धोक्याची कल्पना असल्यामुळे केंद्र सरकारने गेल्या वर्षी म्हणजे जानेवारी 2०२२ मध्ये समुद्रगुप्त मोहिमेची सुरुवात केली. या मोहिमेचा उद्देश २०४७ पर्यंत भारताला ‘ड्रग्ज फ्री’ करण्याचा असल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी एका मुलाखतीत सांगितलं. भारतात प्रतिबंधित ड्रग्ज येण्यापासून बहुआयामी योजना राबवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला असल्याचं यावेळी शहा यांनी सांगितलं. या मोहिमे अंतर्गत फेब्रुवारी २०२२ मध्ये एनसीबी आणि भारतीय नौदलाच्या गुजरातच्या समुद्रात झालेल्या संयुक्त कारवाईत ५२९ किलो हशीश, २२१ किलो मेथांफेटामाईन आणि 13 किलो हेरोईन पकडले जे अफगाणिस्तान आणि बलुचिस्तान इथून आणले गेले होते.

केरळच्या कोची बंदरात अशाच प्रकारच्या हालचाली सुरु असल्याचं एनसीबी आणि भारतीय नौदलाच्या लक्षात आल्याने त्यांनी इथे नजर ठेवली होती. ऑक्टोबर २०२२ मध्ये एका इराणी बोटी वर छापा टाकून उच्च प्रतीची २०० किलो हेरोईन आणि सहा तस्करांना ताब्यात घेतलं.

भारताकडून होत असलेल्या या कारवायांची माहिती श्रीलंका आणि मालदीव पोलिसांनाही दिली गेली. याचाच परिणाम म्हणून श्रीलंकन नेवीने कारवाई करत डिसेंबर २०२२ आणि एप्रिल २०२३ मध्ये अवैध बोटींवर मारलेल्या दोन छाप्यात २८६ किलो हशीश आणि १२८ किलो मेथांफेटामाईन आणि 19 तस्कर पकडले. तर मार्च २०२३ मध्ये मालदीव पोलिसांनी एका छाप्यात 4 किलो हेरोईन आणि 5 तस्करांना ताब्यात घेतलं.  

समुद्रगुप्त मोहिमेचा उद्देश समुद्रावर होणाऱ्या अवैध व्यापाराला आळा घालणे हा आहे. यासाठी एनसीबी आणि भारतीय नौदल हे DRI म्हणजे डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (महसूल गुप्तचर संचालनालय), गुजरातचे दहशतवाद विरोधी पथक, भारतीय नौदलाची गुप्तचर शाखा आणि National Technical Research Organisation अर्थात राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था यांच्याकडून मदत घेतात. ह्या माहितीचा तपास Top to Bottom and Bottom to Top अशा पद्धतीने केला जातो. म्हणजेच एखादा मोठा छापा टाकला तर ते ड्रग्ज कोणत्या ग्राहकाला कोणा तर्फे विकले जाणार आहे याचा तपास केला जातो. तसंच एखाद्या ग्राहकाकडे ड्रग्ज सापडलं तर त्याचा मूळ विक्रेता कोण इथपर्यंत तपास केला जातो. काल पकडलेल्या पाकिस्तानी नागरिकाची अशाच प्रकारे चौकशी होईल आणि तापास यंत्रणा ह्या अवैध व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचतील असं अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितलं.