नामदेव व्हटकर. हे नाव फार कमी जणांना माहित आहे. 

ज्यांना माहित आहे ते एकतर त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी असतील किंवा आंबेडकरी चळवळीचे जाणकार, अभ्यासक असतील. सामान्य माणसाला किंबहुना आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांच्याविषयी फारशी माहिती नसेल. अशा जाणकार आणि अजाणकार अशा सर्व मंडळींना आणि नामदेव व्हटकर ह्या अवलियाची गोष्ट कळणार आहे. आणि ती साकारणार आहे चंदेरी पडद्यावर ‘परिनिर्वाण’ ह्या चित्रपटाच्या माध्यमातून. शैलेंद्र बागडे यांचं दिग्दर्शन आणि पटकथा लेखन लाभलेल्या ह्या चित्रपटाची निर्मिती सुनील चाळके करीत असून सध्या धर्मवीर आणि चंद्रमुखीमुळे सर्वतोमुखी असलेल्या प्रसाद ओक हे नामदेव व्हटकर यांची भूमिका करणार आहेत. नुकतीच ह्या चित्रपटाची घोषणा एका कार्यक्रमात करण्यात आली.   



डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन हे कोणालाही स्फूर्तीदायक असंच आहे. त्यांच्या जीवन काळात त्यांच्या प्रेरणेने अनेक कार्यकर्ते, नेते घडले. त्यांचा सहवास ज्यांना लाभला त्यांना पैलू पडले आणि ते हिऱ्या प्रमाणे लकाकू लागले. ज्यांना त्यांचा प्रत्यक्ष सहवास लाभला नाही ते त्यांच्या भाषण आणि लिखाणातून त्यांना रोजच भेटत राहिले. अशा बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं त्यावेळी साहजिकच सर्व समाज पोरका झाल्याच्या भावनेचे पडसाद तीव्रतेने उमटले. बाबासाहेबांचा समाज “बाबासाहेब आता पुन्हा दिसणार नाहीत” ह्या विचाराने हतबद्ध झाला. मात्र एक व्यक्ती ह्याच विचाराने झपाटून उठली. बाबासाहेब पुन्हा दिसणार नाहीत मग त्यांचं शेवटचं दर्शन तरी आता आणि पुढेही होत राहिलं पाहिजे ह्या विचाराने नामदेव व्हटकर नावाचा अवलिया बाहू सरसावून उभा राहिला. नामदेव व्हटकर यांनी बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेचे चित्रीकरण करून ठेवायचं ठरवलं आणि आपली परिस्थिती नसताना सुद्धा त्यांनी सगळ्याची जमवाजमव केली. शेवटी त्यांनी जे ठरवलं होतं ते साध्य केलं आणि बाबासाहेबांची संपूर्ण अंत्ययात्रा कॅमेराबद्ध केली. आज बाबासाहेबांचं अंतिम दर्शन आपल्याला घडतं ते याचं अंत्ययात्रेच्या चित्रीकरणामुळे. यासाठी संपूर्ण देश नामदेव व्हटकर यांचा ऋणी आहेच. अशा या नामदेव व्हटकर यांच्यावर आता चित्रपट येत आहे. यात १९३५ ते १९५६ हा कालावधी असणार आहे.  

नामदेव व्हटकर यांना त्यांच्या कारकिर्दीत हे सुप्रसिद्ध लेखक, संगीतकार, कुशल प्रशासक, लोककलेचे अभ्यासक,  प्रगतीशील शेतकरी, स्वातंत्र्य सैनिक, जागरूक आमदार, चित्रपट निर्माते म्हणून ओळखलं जात होतं. वैचारिक लेखन, कादंबरी, नाटक, कथा, पटकथा, कविता, समीक्षण, संशोधनात्मक लेखन असे विविध साहित्यप्रकार त्यांनी हाताळले होते.

नामदेव व्हटकर यांनी १९५६ मध्ये हंसा वाडकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या मुलगाया चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन केलं होतं. तर १९५७ मध्ये “आहेर” या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन केलं ज्यात सुलोचना ह्या प्रमुख भूमिकेत होत्या. याशिवाय त्यांनी १९५६ मध्ये “घरधनी” ह्या राम गबाले दिग्दर्शित चित्रपटाचं कथालेखन पु. ल. देशपांडे यांच्यासोबत केलं होतं.

नामदेव व्हटकर यांच्या साहित्य संपदेत - अपराधी (१९४३), झोपाळा (१९५४), सोळा शिनगार (१९६८) ह्या कादंबऱ्या; फितूर  (१९४४), वाट चुकली, सौभाग्यवती भव (१९६१), आई शिवाय जन्मला (१९६५), काळजाची हाक (१९६७), सुखा तुला शोधू कुठे (१९७९), भाकरी (१९७४), सावतामाळी (१९७६), जावईबापू (१९७८) ही नाटके; तिरसट नंबरची खोली, आई शिवाय जन्मला, ऊसाला लागल कोल्हा ही वगनाट्ये यांचा समावेश आहे. तर त्यांनी सात करोड (१९५४), पतित-पावन (१९५५), पदयात्रा (१९५८), हर मोसंम मे पानी (१९५९), कुडे से कंचन (१९६०), एक कला भारतीय पद्धत (१९६२), पाच चाकांची गाडी (१९६३), लोककला तमाशा (१९६५), बाटलीने बाटला तो जन्मातून उठला (१९६७), महापुरुष डॉ. आंबेडकर (१९६९), महाराष्ट्र रंगभूमी (१९७१), खंड्याचा खंडेराव झाला (१९७८), मराठवाडा कृषी विद्यापीठ (१९७९) हे लघु चित्रपट; तर नभोवाणीचे लेखन तंत्र (१९५२-१९५३), भारतातील जातिभेद आणि त्यावर उपाय (१९६४), अभिनय शास्त्र आणि तंत्र समजून घेऊ (१९५८), समाजवाद (१९५८) मराठीचे लोकनाट्य तमाशा कला आणि साहित्य (१९५९), महाराष्ट्रातील चर्मउद्योग आणि त्याचा विकास (१९८१), बौद्ध धर्मदीप (१९५६); आत्मचरित्र:- कथा माझ्या जन्माची हे वैचारिक लेखन केलं. त्यांचा भावफुलोर हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. आकाशवाणीसाठी त्यांनी छोट्या नाटिकांचे लेखन केले, लोकसाहित्य व सामाजिक विषयावर आकाशवाणीतून अनेक भाषणे दिली. गावराज्य,  नजर, जनसागर, दलित सेवक इत्यादी साप्ताहिकांमधून सामाजिक, राजकीय प्रश्न, अस्पृश्यता निवारण, सामाजिक समता आणि दलितांचे प्रश्न यावर त्यांनी सातत्याने लिखाण केले आहे. त्यांना दलित मित्र हा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. अशा ह्या विविधांगी व्यक्तिमत्वाची कथा आता पडद्यावर साकारणार आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर नेत्यांची, कुटुंबियांची भूमिका कोण करणार हे अजून निश्चित झाले नाही. तरीही ‘नावातच सब कुछ’ असणाऱ्या ह्या चित्रपटाची आता प्रतीक्षा आहे.