हे ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात पाहिलं पाऊल आहे.

भाजपचा वरदहस्त लाभलेले कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांना बडतर्फ करण्याची किंवा त्यांना शिक्षा करण्याची कारवाई म्हणजे भिजत घोंगडं असलं तरी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने त्रिसदस्यीय तात्कालिक समिती बनवून त्याद्वारे कुस्ती महासंघाचे सर्व कारभार आपल्या हातात घेऊन कुस्ती महासंघाला पहिला धोबीपछाड दिला आहे.     

आंदोलक कुस्तीपटूंनी रविवारी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) च्या भारतीय कुस्ती महासंघाच्या सर्व कारभाराची जबाबदारी घेण्याच्या निर्णयाला माजी WFI प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्धच्या लढ्यातील पाहिलं पाऊल म्हटलं आहे.

Photo Courtesy : Hindustan Times 


बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांच्यासह देशातील अव्वल कुस्तीपटू महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपाखाली ब्रिज भूषण यांच्या अटकेच्या मागणीसाठी गेल्या 22 दिवसांपासून जंतरमंतरवर आंदोलन करीत आहेत.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने भूपिंदर सिंग बाजवा, रायफल शुटर सुमा शिरूर यांची ह्या तात्कालिक समितीवर नेमणूक केली आहे. याशिवाय उच्च न्यायालयाचे एक निवृत्त न्यायाधीशही ह्या समितीत असतील असं सांगितलं आहे.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने 12 मे रोजी आपल्या पत्राद्वारे कुस्ती महासंघाच्या सरचिटणीसांना त्यांच्या आर्थिक व्यवहारांच्या कागदपत्रांसह सर्व अधिकृत कागदपत्रे त्रिसदस्यीय पॅनेलकडे सुपूर्द करण्यास सांगितलं.

कुस्ती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या आदेशाचे पालन करण्यात त्यांना कोणतीही अडचण नाही. आणि ते सुरुवातीपासून सहकार्य करीत आहेत.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनची ही कारवाई आमच्या न्यायासाठीच्या लढाईतील पहिले पाऊल आहे. आमचा लढा अगदी प्रामाणिकपणे सुरू झाला आहे, हा आमच्यासाठी विजय आहेआणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू,” असे टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया म्हणाला.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती विनेश फोगट हिने सांगितले की “सत्ताधारी पक्षाच्या एकही खासदार महिलांच्या सन्मानासाठी आमच्या लढ्यात पाठिंबा देण्यासाठी एकाही कुस्तीपटूला भेटले नाही. म्हणून सोमवारपासून कुस्तीपटू सत्ताधारी पक्षाच्या सर्व महिला खासदारांना हाताने किंवा ई-मेलद्वारे पत्र देतील आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी सांगतील.” विनेश पुढे म्हणाली की, "जेव्हा ते देशातील महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलतात, तेव्हा त्यांनी आमचीही काळजी घेतली पाहिजे. आम्हीही त्यांच्या मुली आहोत. म्हणून त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे."

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या तीन सदस्यीय तात्कालिक समितीने हे स्पष्ट केले आहे की नवीन कुस्ती महासंघाचे पदाधिकारी निवडण्याची प्रक्रिया 45 दिवसांच्या कालावधीत पूर्ण केली जाईल आणि पदभार पुन्हा निवडलेल्या संस्थेकडे सोपविला जाईल.

निवडणुका झाल्या की, प्रशासकीय अधिकार कुस्ती महासंघाकडे परत जातील. नवनिर्वाचित अधिकारी कार्यक्रमाचे संचालन करतील. तोपर्यंत तात्कालिक समिती कुस्ती महासंघाच्या कारभाराचे व्यवस्थापन करतील,” असे एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.