आजकाल मराठी चित्रपट सृष्टीत बायोपिक्सना सुगीचे दिवस आले आहेत. असावेत, 

त्यात वाद नाहीत. पण आज ज्यावेळी महाराष्ट्र भूषण सारखा बहुमान देण्यासारखी माणसं आपल्या महाराष्ट्रात नाहीत का? वारसा पद्धतीने चालत आलेलं अध्यात्मिक गुरु हे पद सांभाळणाऱ्या एका व्यक्तीला हा बहुमान का दिला जातोय? असे प्रश्न विचारले जातात, त्यावेळी महाराष्ट्रात किती महान आणि महाराष्ट्राला खरोखर भूषण ठरलेले लोक होऊन गेले याचा पडताळा घेणं ही आवश्यक ठरतं. शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारलेला “महाराष्ट्र शाहीर” हा चित्रपट यासाठीच महत्त्वाचा आहे. “महाराष्ट्र भूषण” च्या निमित्ताने सोशल मीडिया वर रान उठलेलं असताना अगदी योग्य वेळी हा चित्रपट आला आहे. किमान राज्यकर्त्यांना फक्त शाहीर साबळेच नाहीत तर असे अनेक भूषण आपल्या मातीत जन्मले, याची आठवण यामुळे झाली तरी तेही नसे थोडके!

शाहीर साबळेंच्या जीवनावर आधारित चित्रपट म्हणजे त्यात गाणं हाच युएसपी असणार अशी अपेक्षा आपली असणारच. ह्या अपेक्षेवर चित्रपट १०० टक्के उतरला आहे आणि चित्रपटाच्या पहिल्या फ्रेम पासून चित्रपटाच्या शेवटपर्यंत ही एक सांगीतिक मेजवानीच ठरली आहे. शाहीर साबळे यांनी गायलेली गाणी जशी या चित्रपटात आहेत तशीच अजय अतुलचं संगीत लाभलेली गुरु ठाकूरची गीतंही चित्रपटाला बहारदार बनवतात. त्यातील ‘गाऊ नको किसना’, ‘मधुमास’ आणि ‘पाऊल थकलं न्हाई’ ह्या गाण्यांनी तर म्युझिक लवर्सना वेड लावलं आहे. ‘गाऊ नको किसना’ हे गाणं तर चंद्रमुखीच्या गाण्याच्या वायरल व्हिडीओने घराघरात पोहोचलेल्या जयेश खरेने खूपच सुंदर गायलं आहे. श्रेया घोशाल आणि अजयच्या आवाजातील ‘मधुमास’ हे प्रेम गीत म्हणजे ७० च्या दशकाचा इसेन्स आणि शाहिरी प्रेमाचा भारदस्तपणा असलं आडनिड संगम असलेलं हे गाणं अगदी श्रवणीय झालं आहे. ह्या गाण्यावर तर गेले सहा महिने शेकडो रील्स बनत आहेत. महाराष्ट्रातीलच नाही तर टांझानियातील सोशल मीडिया सेन्सेशन किली पॉल आणि निमा या भावा बहिणीच्या जोडीनेही एक सुंदरसा रील केला आहे. संपूर्ण चित्रपट पकडून धरण्याचं काम करतात ते प्रतिमा कुलकर्णी यांची पटकथा आणि संवाद. प्रेम, बाणेदारपणा आणि अगतिकता सर्वच या संवादातून खूप सुंदररित्या आलं आहे.  

शाहिरांची काही गाणी मूळ स्वरुपात आहेत तर काही गाणी अजय गोगावलेने म्हटली आहेत. अजयचा आवाज हा भारदस्त पठडीतला असला तरी तो भारुडासारख्या भक्ती संगीतात जास्त चांगला वाटतो. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे शेवटी येणारं गाणं सुरुवातीला अजयने म्हटलं आहे. पण शाहिरांचा आवाज सुरु झाल्यावर मात्र हे गाणं सह्याद्रीच्या धडाडीची उंची गाठतं.



चित्रपटाची सुरुवात शाहिरांच्या लहानपणापासून होते. अगदी उमलत्या वयात आपल्या आवाजाची, गाण्याची जाण येऊन सुद्धा केवळ आईला आवडत नाही म्हणून त्यांना गाण्यापासून कसं दूर राहावं लागलं. साने गुरुजी, गाडगे महाराज यांच्या रदबदली नंतर सुद्धा त्यांना गाणं म्हणण्याची परवानगी मिळाली नाही. आईला वाटायचं की मुलाने चांगलं शिकून मोठा माणूस व्हावं. मोठा माणूस तर तो होणारच होता पण शालेय शिक्षणाच्या माध्यमातून नाही तर डफावर थाप मारून, आपल्या फक्कड आवाजात शाहिरी बाणा दाखवून. अर्थात हे भविष्य कोणाला माहित होतं. त्यामुळे शाहीर मोठे होऊन मुंबईतील गिरणीत कामाला लागेपर्यंत गाण्यापासून पळतच असतात. पण गाणं काही त्यांचा पाठलाग सोडत नाही. शेवटी साने गुरुजी ‘असा असतो शाहीर’ म्हणून त्यांना त्यांचं भविष्य दाखवून देतात आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शाहीर आकार घेऊ लागतो.

केदार शिंदेच्या या चित्रपटासाठी संगीत अभ्यासकांनी त्यांना धन्यवाद द्यायला हवेत कारण त्यांनी जर शाहिरांच्या गाण्यामागील कलमकारी कोणाची हे दाखवून दिलं नसतं तर अजूनही अनेकांना ते कळलं नसतं. शाहिरांनी महाराष्ट्रातील संत, कवी आणि स्वत:ची गाणी म्हटली पण त्यांना प्रसिद्धी मिळवून देण्यात त्यांची प्रथम पत्नी भानुमती बोरसाडे यांनी लिहिलेल्या गाण्यांचं योगदानही मोठं आहे. शाहिरांना जेवढा मान सन्मान मिळाला त्याच्या एक टक्का सुद्धा भानुमतीला मिळाला नाही. लोक फक्त शाहिरांच्या आवाजाच्या आणि संगीताच्या प्रेमात होते पण त्यातील शब्द नसते तर शाहीर नावारूपाला आले असते का ह्या भानुमतीच्या प्रश्नाला कोणाकडेही उत्तर नाही. कदाचित केदारना आपल्या या आजीचे ऋण व्यक्त करायचे असतील म्हणून त्यांनी तिच्या भूमिकेत आपल्या लेकीला म्हणजे सना शिंदेला आणलं आहे. शाहीर आणि भानुमतीच्या विभक्त होण्यात शाहिरांची चूक स्पष्टपणे दिसते. भानुमती आपल्या चारही मुलांना शाहीरांकडे का आणून सोडते हे मात्र स्पष्ट होत नाही. कदाचित प्रत्यक्षात काहीतरी वेगळं घडलं असेल असं राहून राहून वाटत राहतं. तो चित्रपटाचा विषय नसल्यामुळे असेल किंवा काही कौटुंबिक गोष्टी पडद्यावर आणून मूळ विषयाला बगल मिळण्याची शक्यता होती म्हणून असेल; केदारने ते येऊ दिलं नसेल. असो. भानुमती विषयी आज कळलं हेही फार महत्त्वाचं आहे.



त्यावेळच्या कलाकारांमध्ये समाजाविषयीची बांधिलकी होती, म्हणूनच ते आपल्या कलाकृतीतून लोकांचे डोळे उघडतील असं नाट्य सादर करायचे. या सोबतच त्यांच्यात एकमेकात सुदृढ स्पर्धा होती. शाहीर साबळे यांची स्पर्धा शाहीर अमरशेख यांच्या सोबत होती. त्यात कुठेही द्वेष नव्हता. म्हणूनच जेव्हा राजा बढे आणि श्रीनिवास खळे शाहीर साबळेना ‘जय जय महाराष्ट्र माझा’ गाण्यासाठी विचारतात तेव्हा ‘हे शाहीर अमरशेखांना गाऊ द्या,’ असं ते सुचवतात. यातून त्यांचं मन किती नितळ होतं हेच दिसून येतं. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या सोबतचा प्रसंगही असाच. कलाकार कोणत्याही पक्षाची हुजरेगिरी करणार नाही असं ठामपणे सांगताना शाहीर जराही कचरत नाहीत. शाहिरांनी आपल्या मनात घोळत असलेलं आणि बाळासाहेब ठाकरे यांनीही सांगितलं म्हणून मराठी माणसाच्या नाकर्तेपणा आसूड ओढणारं ‘आंधळं दळतंय’ हे नाटक राजा मयेकर आणि इतर कलाकारांसोबत रंगमंचावर आणलं. या नाटकामुळे शिवसेनेला बराच फायदा झाला असला तरी शाहीर या पक्षापासून दोन हात लांबच राहिले आणि कर्ज काढून आपली कला साधना करत राहिले. वेगवेगळे प्रयोग करत राहिले. ज्यावेळी मोबाईल हा शब्द सुद्धा कोणाला माहित नव्हता तेव्हा त्यांनी मोबाईल स्टेज ही संकल्पना डिझाईन केली आणि प्रत्यक्षात आणून राबवली. त्यांचा स्टेज बघायला लोक यायचे, नाटकं चालायची. पण ७० च्या दशकातल्या दुष्काळाने त्यांचं कंबरडं मोडलं. ह्या कालावधीत झालेलं नुकसान कधीही भरून निघालं नाही. त्यांची दुसरी पत्नी आणि चार मुलं त्यांच्या सोबत होती हेच काय ते सुख.. पुढे मुलींच्याच प्रयत्नातून साकार झालेलं “महाराष्ट्राची लोकधारा” ह्या कार्यक्रमामुळे शाहीर आणि त्यांची गाणी पुन्हा लोकांपर्यंत पोहोचली आणि नव्याने लोकप्रिय झाली ती आजतागायत.

चित्रपट शाहिरांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या भागांना स्पर्श करतो पण त्यासाठी काही सीन उगीच दक्षिणात्य सिनेमाच्या प्रभावात आले आहेत की काय असं वाटतं. एक म्हणजे झाडाला बांधलेली रिबीन वाऱ्यावर उडण्याचं दृश्य. आधी ह्या दृश्यातून ती रिबीन छोट्या किसनाला या जोखडातून बाहेर पड असं सांगते असं वाटतं. पण हे दृश्य लांबल्यामुळे त्याची प्रत्ययकारीता लोप पावते. दुसरा सीन आहे तो शाहीर शाळेच्या छतावर बाहूबली टाईप चढतात आणि इंग्रजांचा युनियन जॅक फेकून तिथे तिरंगा फडकवतात.  

अभिनयात अंकुश चौधरीची मेहनत पूर्णपणे फळलेली दिसते. तरुण शाहिरांपासून ते साठीच्या शाहिरांपर्यंत अंकुश अगदी फिट बसला आहे. स्वत: गाण्याचं अंग अजिब्बात नसताना सुद्धा त्याने गाणी खूप छान खुलवलेली आहेत. सना शिंदे अभिनयात छान आहे पण तिचे संवाद फार हळुवारपणे येतात. पण विस्कटलेली भानुमती तिने अप्रतिम साकारली आहे. बाकी अश्विनी महांगडे (शाहिरांची दुसरी पत्नी मालती बाई – माई), योहाना वाच्छानी (चारुशीला), निर्मिती सावंत (आजी) अमित डोलवत (साने गुरुजी) दुष्यंत वाघ (बाळासाहेब ठाकरे), अतुल काळे (यशवंतराव चव्हाण), सर्व बाल कलाकार आणि इतर सर्वांच्या भूमिका छान झाल्या आहेत. अतिश आंबेरकर यांनी अंकुशला दिलेला शाहिरांचा लूक अगदी तंतोतत आहे.

शाहिरांची ही कहाणी म्हणजे नुसता चित्रपट नसून तो महत्त्वाचा दस्तावेज झाला आहे. आज महाराष्ट्राला अशा दस्तावेजीकरणाची गरजच आहे.

मी ह्या चित्रपटाला देत आहे 5 पैकी 4 गुण