एकीकडे देशासाठी ऑलिम्पिक आणि इतर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये देशाला मान सन्मान आणि मेडल्स
मिळवून देणाऱ्या पैलवान
मुली आणि महिला आपला लैंगिक छळ करणाऱ्या आणि रेसलर्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ब्रिजभूषण
शरण सिंग यांच्यावर कारवाई होऊन त्यांना अटक व्हावी म्हणून दिल्लीच्या जंतर मंतर
इथे गेल्या महिनाभरापासून आंदोलनाला बसल्या असताना आणि त्यांना अनेक खेळाडूंचा
पाठींबा मिळत असताना दुसरीकडे ज्यांना क्रिकेटचा देव म्हटलं जातं त्या सचिन
तेंडूलकरने मात्र याविषयी ब्रही काढला नाहीये. लोक त्याच्या खेळावर प्रेम करतात. त्यामुळे कोणत्याही खेळावर प्रेम करणारे किंवा
खेळासाठी आपलं अख्खं आयुष्य वेचणारे खेळाडू त्याच्या वक्तव्याकडे डोळे लावून बसणार
ह्यात वावगं काहीच नाही. सचिन तेंडुलकर हा खेळाडू आहे, समाजसेवक नाही हे मान्य. एखाद्या
प्रश्नावर बोलणं न बोलणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असं मानलं तरी सचिन जर या
मुद्यावर आंदोलनकर्त्यांच्या बाजूने बोलला तर एक खेळाडू म्हणून त्याची उंची अधिक वाढेलच.
कारण त्याच्या गप्प राहण्याने तो अन्यायकर्त्यांच्या बाजूने आहे का अशी शंका
व्यक्त केली जात आहे. सचिनचा हा हाताची घडी तोंडावर बोट पवित्रां ह्या लेखिकेला आवडला
नाही हे सुरुवातीलाच नमूद करते आहे.
आता सचिनचा आदर्श नजरेसमोर ठेवून केलेला ‘तेंडल्या’
ह्या चित्रपटाविषयी.
सचिनच्या वक्तव्याला जितकं महत्व आहे
तितकीच त्याची प्रत्येक कृती त्याच्या चाहत्यांसाठी ब्रीदवाक्य असते. आपल्या
खेळातून स्वप्न कशी साकार करायची याचं उदाहरण घालून देणारा सचिन अनेक स्वप्नाळू
मुलांसाठी प्रेरणास्थान आहे. अशाच काही जबरी चाहत्यांनी म्हणजेच सचिन जाधव आणि
नचिकेत वाईकर यांनी सचिनच्या निवृत्ती नंतर त्याला भेट म्हणून एक चित्रपट बनवला
आणि तो त्याला अर्पण केला, त्याचं नाव ‘तेंडल्या’. नावात तेंडल्या असलं तरी
सचिनच्या फोटो खेरीज सचिन ह्या चित्रपटात नाही आणि हा चित्रपटही सचिनवरचा नाही. ह्या
चित्रपटाच्या कथेपेक्षा चित्रपट निर्मितीची कथा फार रंजक आणि रोमहर्षक आहे. पण तो
आपला विषय नाही शिवाय ह्या चित्रपटाचं मेकिंग युट्युबवर उपलब्ध आहे. इथे वाचण्यापेक्षा
ते पाहिलेलं बरं, नाही का!
चित्रपटातील हा काळ आहे 19९७-९८ चा.
म्हणजे ज्यावेळी सचिन नावाचा तारा नुकताच क्रिकेट विश्वात झळाळू लागला होता. त्याचा
खेळ टीवीवर पाहणं ही पर्वणी असायची. पण मुंबई पुण्यासारख्या शहरात सोडलं तर बाकी
संपूर्ण ग्रामीण भारतातील घरात ब्लॅक अँड व्हाईट टीवी असणं हे एक दिवास्वप्नच होतं.
अशावेळी ज्यांच्या घरात लहानसा का होईना पण टीवी असेल तर त्या घरात अख्खं गाव जमून
क्रिकेटचे सामने पहायचा. सचिनच्या प्रत्येक स्ट्रोकला भरभरून प्रतिसाद द्यायचा, तो
आउट झाला की ‘ए अम्पायर, बोट उचलू नको,’ असं दरडवायचा पण सचिन स्वत:च क्रीझ सोडून तंबूत
परतू लागला की लोकही परतू लागायचे. “सचिन आउट झाला, आता काय! गेली मॅच!” असं म्हणत
हताश होऊन टीवीच बंद करणारे जसे मुंबई पुण्यात होते तसेच ते ग्रामीण भागात सुद्धा होते.
याचं मासलेवाईक चित्रण ‘तेंडल्या’ ह्या चित्रपटात केलं आहे.
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील इस्लामपूर
तालुक्यातील एका गावात अशी क्रिकेटवेडी माणसं रहात असतात. त्यातील दोन जणांच्या स्वप्नाळू
कहाण्या समांतरपणे चालतात. त्यातला एक आहे 10 वर्षांचा अमन कांबळे ज्याला गावातील
लोक ‘तेंडल्या’ म्हणून हाक मारतात. तर दुसरा आहे 22 वर्षांचा गज्या ज्याने कर्जावर
एक कमांडर गाडी घेतली आहे आणि त्या गाडीने तो एसटी स्टँड वरून लोकांना त्यांच्या
गावी सोडण्याचं काम करतो. तेंडल्या आणि गज्या हे दोघेही सचिन तेंडूलकरचे डायहार्ड
चाहते असतातच पण त्यांच्या गावातील अख्खा पुरुष वर्ग सचिनचा चाहता आहे. सचिनची बॅटिंग
पाहण्यासाठी ते कितीही महत्त्वाचं काम सोडून मिळेल त्या घरात ठाण मांडून बसलेले
असतात. म्हणूनच ह्या गावातील बायका त्यांच्या ह्या क्रिकेटवेडावर नेहमी बोटं मोडत
असतात.
गावात 10-12 वर्षांच्या मुलांचे दोन गट असतात.
अर्थात सगळे एकाच शाळेत शिकत असतात. एकदा एका
टुर्नामेंटचे सामने टीवीवर थेट प्रक्षेपित होणार असतात. पण त्याच वेळी पेपरमध्ये बातमी
येते की सचिनची करंगळी दुखावली आहे आणि तो आजचा सामना खेळणार नाही. सगळेजण
आपापल्या कामाला पांगतात. गज्याही आपल्या कामावर जातो. पण नंतर कळतं की सचिन
खेळणार आहे. सगळ्या गावातील पुरुष मंडळी मिळतील त्याच्या घरात ठाण मांडून सामने
पहात असतात. शाळेतील मुलांचीही चुळबुळ सुरु असते. शिक्षकांचं चित्तही स्कोरकडे
लागलेलं असतं. अशात ते वर्गातील मुलांना स्कोर पाहून यायचं फर्मान सोडतात.
तेंडल्या सुटतो. त्यावेळी लोकांना गाडीने घेऊन येणारा गज्या रस्त्यात एकाला सहज
म्हणून स्कोर विचारतो तेव्हा त्याला कळतं की सचिन खेळतो आहे आणि नुसता बाउंडऱ्या मारतोय.
तेव्हा तो प्रवाशांना मध्येच उतरवून आपल्या गावाकडे गाडी हाकतो. तेंडल्या, गज्या
आणि त्याचा मित्र पैलवान (विक्रम पाटील) हे तिघं मॅच पाहण्यासाठी टीवी असणाऱ्यांच्या
घरी जातात. पण त्यांना संधी मिळत नाही. अखेर सचिन आउट होतो आणि त्यांना सचिनला
खेळताना पाहण्याची संधी हुकते. ही गोष्ट गज्याच्या मनाला फार लागते. त्याला वाटतं
की लोकांनी त्याला मॅच पाहू दिली नाही. म्हणून तो आपल्याच घरात रंगीत टीवी आणण्याचा
निश्चय करतो.
त्याच वेळी गावातील टग्या मुलांनी तेंडल्याला
एका मॅचच आव्हान केलेलं असतं. ह्या मॅचसाठी तेंडल्या सर्व काही पणाला लावतो. आपल्या
आईच्या मागे लागून सचिन वापरतो तशी एमआरएफची बॅट घेतो. पण त्याचं वेड पाहून आई ती बॅट
चुलीत जाळून टाकते. रुसलेल्या तेंडल्याला गज्या सांगतो की चांगला स्कोर एमआरएफच्याच
बॅटने होतो असं काही नाही. आपल्यात जर रग असेल तर फटकूळानेही बाउंडरी मारता येते. तेंडल्या
हे शब्द मनात कोरून ठेवतो.
गावातील ही मॅच तेंडल्या जिंकतो का? गज्या
रंगीत टीवी आणतो का? हे पाहण्यासाठीच नाही तर गावातील हा स्वप्नांचा प्रवास अनुभवण्यासाठी
चित्रपट नक्कीच पहायला हवा.
ज्याच्या नावातच सचिन आहे त्या सचिन जाधव आणि
नचिकेत वाईकर ह्या तरुणांनी सहा वर्षांपूर्वी सुनंदन लेले यांच्या मार्गदर्शनात हा
चित्रपट पूर्ण केला. त्याला अनेक पुरस्कारांसह राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.
गावातील मुलांमध्ये मॅच असली तरी तिचा थरार
काही वेळा कमी पडतो. फिरोझ शेख आणि अंकिता यादव ही नवीन जोडी यात आणली असली तरी अंकिताला
यात फार स्कोप नाही. प्रत्येक हिरोला हिरोईन असलीच पाहिजे हे भारतीय चित्रपटीय
मिथक आता दूर झालं पाहिजे.
या चित्रपटात विठ्ठल काळे (घर बंदूक बिरयानी तील जॉर्ज) यांच्या शिवाय इतर कोणीही कधीही कॅमेऱ्यासमोर उभे राहिले
नव्हते. नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर पुरस्कारात नवीन चेहऱ्याचा पुरस्कार झुंड
सिनेमातील डॉन अर्थात अंकुश गेडाम या अभिनेत्याला मिळाला. त्यामुळे नवीन कलाकारांचा
उत्साह नक्कीच वाढला आहे. महागड्या जुन्या कलाकारांना न घेता नवीन कलाकारांना घेऊन
चित्रपट करण्याचा नागराज मंजुळें यांचा फॉर्म्युला अनेक नवीन चित्रकर्ते अवलंबित आहेत
ही चांगली गोष्ट आहे. ह्या चित्रकर्त्यांना आणि त्यातील कलाकारांना पुढेही चांगली
संधी मिळो ही अपेक्षा. या सर्वांना घेऊन हा चित्रपट वेगवेगळ्या लोकेशन्स वर
चित्रित करणं हे खरंच महाकठीण काम ह्या चित्रकर्त्यांनी
केलं आहे. त्यांचं कौतुक करण्यासाठी एकदा तरी हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पहायलाच
हवा.
मी ह्या चित्रपटाला देते आहे. 5 पैकी 4.5
गुण
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.