“मी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेत आहे.” 

शरद पवारांनी ही घोषणा केली आणि फक्त राष्ट्रवादीतच नाही तर देशाच्या राजकारणात भूकंप होऊ लागला आहे. काल 2 मे २०२३ रोजी शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ ह्या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात शरद पवार बोलत होते. छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना शरद पवार साहेबांनी आजवर आमची साथ दिली, आज पक्षाला तुमच्या अनुभवांची जास्त गरज असताना त्यांनी हे पद सोडू नये, अशी साश्रू नयनांनी विनंती केली. मात्र, ‘साहेब हेच आपले मार्गदर्शक असतील, त्यांच्या नजरेसमोरच नवीन अध्यक्ष झाला तर त्याला साहेब योग्य मार्गदर्शन करू शकतील,’ असं मत व्यक्त करून साहेबांचं वय आणि तब्बेत लक्षात घेऊन त्यांचा राजीनामा देण्याचा निर्णय योग्य असल्याचं अजितदादा पवार यांनी सांगितलं.

काही दिवसांपूर्वी “भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे,” ह्या शरद पवार यांच्या वक्तव्या वरून राज्यातच नाही तर देशात उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. त्यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर या चर्चांना आता पूर्णविराम लागला असला तरी शरद पवार खरंच निवृत्त होणार का? मग पुढे राष्ट्रवादीचा किंवा राष्ट्रवादीची अध्यक्ष कोण असेल? अशा प्रश्नां वर चर्चा झडू लागल्या आहेत.  

1 मे १९६० पासून शरद पवार राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षातून प्रत्यक्ष राजकारणात रुजू झाले. १९९९ मध्ये सोनिया गांधी यांच्या प्रधानमंत्री बनण्याच्या मुद्यावरून त्यांनी राष्ट्रीय कॉंग्रेसचा राजीनामा दिला आणि पी. ए. संगमा, तारिक अन्वर यांच्या सोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची निर्मिती केली. महाराष्ट्र आणि देशातील दिग्गज काँग्रेसी या पक्षात सामील झाले. अल्पावधीतच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष एक बलाढ्य पक्ष म्हणून समोर आला. दरम्यान २०१६ मध्ये संगमा यांचे निधन झाले आणि २०१८ मध्ये तारिक अन्वर पुन्हा राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये गेले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची कमान शरद पवार यांच्याच खांद्यावर आली आणि त्यांनी ती पूर्ण क्षमतेने सांभाळली. पक्ष अध्यक्ष पदासोबतच ते अनेक संस्थांचे पदाधिकारी आहेत. गेल्या ६० वर्षांच्या आपल्या झंझावाती कारकिर्दीनंतर त्यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्त होण्याचा मनसुबा जाहीर केला आहे.

यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या भावना ज्या प्रकारे व्यक्त केल्या ते पाहून वाटत होतं की एक तर हे लोक अजूनही साहेबांची मर्जी सांभाळण्यासाठी फार नाटक करत आहेत किंवा यांना नवीन नेतृत्व नको आहे. अजित पवार यांचं या बाबातीतील वक्तव्य या सगळ्यात उजवं वाटलं. जरी आज पवार साहेबांच्या निवृत्ती नंतर अध्यक्षपदावर अजित दादा आणि सुप्रिया सुळे हेच मुख्य दावेदार असले तरी अजित पवार यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सुनावलेले चार शब्द शहाणपणाचे वाटले. आज कॉंग्रेसमध्ये सोनिया गांधी यांना सर्वच मानतात, त्यांच्या शब्दाला वजन आहे, पण अध्यक्ष मात्र मल्लिकार्जुन खर्गे आहेत. त्यामुळे आपल्यालाही साहेबांचं मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहील. पुढे जो कोणी अध्यक्ष होईल त्याला आपण सुद्धा सांभाळून घेऊ, मार्गदर्शन करू. देशाच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये, भागामध्ये कोणीही अध्यक्ष झाले तरी साहेबांच्या जीवावरच पक्ष चालणार आहे हे सांगण्यासाठी कोणा किडमिड्या ज्योतिष्याची गरज नाही. त्यांनी निवृत्ती जाहीर केली म्हणजे त्यांनी पक्ष सोडलेला नाही, हे तुम्हाला कळत कसं नाही अशा शब्दात दरडावतच अजित पवार यांनी आपल्या काकांच्या निर्णयाला दुजोरा दिला.  

वयाच्या ८२ व्या वर्षी सुद्धा एखाद्या माणसाने सतत कार्यरत राहण्यासाठी त्यांना गळ घालणं योग्य नाही. कोणत्याही पक्षाच्या अध्यक्षावर अनेक जबाबदाऱ्या असतात. सतत दौरे, सभा, मिटींगा, पक्ष कार्यकर्त्यांचे प्रश्न, राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या घटनांवर भूमिका घेणं अशा अनेक जबाबदाऱ्या ह्या वयात झेपणं आणि पक्षाने त्यांच्याकडून तशी अपेक्षा करणं हा त्या माणसावरच केलेला अन्याय आहे, हे आता पक्ष नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना समजलं पाहिजे. हा भार आपणच कमी करण्याचा शरद पवार यांचा निर्णय योग्य आहे. ते हळूहळू इतर जबाबदाऱ्या सुद्धा कमी करण्याची शक्यता आहे. आपल्याला या बाबतीत काय वाटतं ते जरूर कळवा.