वाल्मिका एलिंजे – अहिरे यांच्या ‘रमाई’ पुस्तकाच्या प्रकाशनावेळी प्रतिपादन

बाबासाहेब आजारी होते तेव्हा त्यांनी दोन दिवस जेवण घेतलं नव्हतं. तेव्हा ते राजगृहावर न राहता आपल्या कार्यालयात रहात होते. रमाईला जेव्हा कळलं की बाबासाहेब जेवत नाहीयेत तेव्हा त्यांनीही जेवण टाकलं. बाबासाहेब जेव्हा दोन दिवसांनी जेवल्याचं रमाईना कळलं तेव्हाच त्या जेवल्या. या बाबतीत मला सिद्धार्थ गौतमाची पत्नी आठवते. ती सुद्धा अशीच होती. ती जेव्हा ऐकत होती सिद्धार्थाने मुंडण केलं आहे, तो वाडगं घेऊन भिक्षा मागून जगतो आहे. तेव्हा यशोधरा महालात राहून सुद्धा विरक्तीचं जीवन जगत होती. यावरून रमाई ही यशोधरेचाच वारसा चालवत होती, असं मला वाटतं, असं प्रतिपादन प्रा. आशालता कांबळे यांनी काल मुंबईत केलं.



रमाई यांच्या 88 व्या स्मृतीदिनी म्हणजेच 27 मे २०२३ रोजी मुंबईत दादर येथील आंबेडकर भवनात संपन्न झालेल्या प्रख्यात लेखिका वाल्मिका एलिंजे – अहिरे लिखित ‘क्रांतीसुर्याची महानायिका – रमाई’ ह्या ग्रंथ प्रकाशनावेळी प्रा. आशालता कांबळे बोलत होत्या. ह्या ग्रंथ प्रकाशनाला प्रख्यात विचारवंत विजय सुरवाडे, प्रा. शशिकांत लोखंडे, प्रा. उषाताई काळे, दामोदर मोरे आणि वाल्मिकाताईंचे पती आणि प्रकाशक रावसाहेब अहिरे हे विचारमंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक जी. डी. घोक्षे होते.   

वाल्मिकाताई यांनी ह्या ग्रंथात रमाईला देवपण न देता तिचं माणूसपण रेखाटलं आहे. यासोबतच फ्रेनी या बाबासाहेबांच्या मैत्रिणीचा उल्लेख करताना एका पुरुषाने आपल्यावर नितांत प्रेम करणाऱ्या स्त्रीचा सन्मान कसा करावा हे खूप सुंदररित्या वाल्मिकाताईंनी दाखवून दिलं आहे, असं सांगताना बाबासाहेबांचा हा आदर्श सर्व पुरुषांनी ठेवावा असंही सांगायला प्रा. आशालता कांबळे विसरल्या नाहीत. याशिवाय ऐतिहासिक सत्याला न डावलता हे लिखाण वाल्मिकाताईंनी केलं असल्याचंही त्यांनी नमूद केलं.   

वाल्मिका ताईंनी लिहिलेलं हे चरित्र म्हणजे रमाईचा शिलालेख आहे अशा शब्दात प्रा. शशिकांत लोखंडे यांनी ह्या ग्रंथाचा गौरव केला. दामोदर मोरे यांनी प्रांजळपणा आणि प्रामाणिकपणा हे ह्या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे हे सांगताना ग्रंथातील काही बारीक सारीक प्रसंगांवर टिप्पणी केली.   

या कार्यक्रमाला शिवा इंगोले, सुबोध मोरे, छायाताई कोरेगावकर, कुंदाताई निळे, सुरेखा पैठणे, मंगल सुरवाडे, वैभवी अडसुळे - कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रावसाहेब अहिरे यांनी प्रास्ताविक केलं तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार विठ्ठल कांबळे यांनी केलं. 

‘क्रांतीसुर्याची महानायिका – रमाई’ हा वाल्मिका एलिंजे अहिरे लिखित ग्रंथ रावसाहेब अहिरे यांनी प्रकाशित केला आहे. याची एकूण पृष्ठ संख्या २३2 असून किंमत रुपये ३००/- आहे. हा ग्रंथ हवा असल्यास ९८६७००५१२७ ह्या क्रमांकावर संपर्क साधावा.