नात आणि आजीने जिंकले रौप्य पदक

तिच्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती. पण समाजाच्या भयाने पालकांनी कधी तिच्या आकांक्षांना पंखच लाभू दिले नाही. मात्र मनातली ही उर्मी अशी सुप्तावस्थेत किती काळ दडपून राहील! अखेर तिने बाहू फैलावले आणि झेपावली! ती पक्षिणी आहे गीता गोदारा! दिल्ली जवळील गुरूग्राम इथे राहणाऱ्या 59 वर्षीय गीता गोदारा ह्यांनी हरयाणाच्या चंद्रो तोमर आणि प्रकाशी तोमर ह्या दोन शूटर दादीज पासून प्रेरणा घेतली असली तरी आता गीता स्वत: अनेकांच्या प्रेरणास्थान बनल्या आहेत. त्यांनी नुकत्याच दुबईमध्ये झालेल्या ‘बुदोकान कप’ ह्या आंतरराष्ट्रीय कराटे चँपियनशिपमध्ये वयोवृद्धांसाठी असलेल्या श्रेणीत रौप्य पदक पटकावले आहे.

गीता गोदारा आणि आश्का गोदारा 


गीता यांना लहानपणी सैन्यात जाण्याची, कमांडो होण्याची इच्छा होती. पण मुलगी असल्यामुळे त्यांना अशा क्षेत्रात काम करण्याची परवानगीच नव्हती. प्राथमिक शिक्षणा नंतर त्यांचं शाळेतून सुद्धा काढण्यात आलं. मुलीने जास्त शिकून करायचंय काय ह्या बुरसटलेल्या विचारांमुळे एक फुलत चाललेलं व्यक्तिमत्व दडपून टाकलं गेलं. गीताचं लग्न हरयाणातील सरकारी अधिकारी प्रदीप गोदारा यांच्याशी झालं. त्यानंतर दोन मुलं झाली. त्यांची लग्नं झाली. मग दोन नाती झाल्या.

ह्या संसाराच्या रगाड्यात पुरत्या अडकलेल्या असल्या तरी गीता यांनी आपल्या तब्बेतीकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही. काहीतरी करून दाखवण्याची उर्मी त्यांना शांत बसू देत नव्हती. त्या योगसाधना करणे, सायकलिंग करणे, जिममध्ये जाऊन व्यायाम करणे ह्या गोष्टी सातत्याने करत होत्या. शिवाय आपली एक नात ज्या क्लासमध्ये कथ्थक नृत्य शिकते तिथेच त्या सुद्धा कथ्थक शिकू लागल्या. कोणताही आजार त्यांना आतापर्यंत जडलेला नाही. अत्यंत सुदृढ असणाऱ्या गीता यांच्या मनातील काहीतरी करून दाखवण्याच्या उर्मीने मग उचल खाल्ली. आणि त्यांनी सहज म्हणून आपली १३ वर्षांची नात आश्का गोदारा ही ज्या साई कराटे अकादमीमध्ये कराटे शिकत आहे तिथे वृद्धांसाठी काही योजना आहे का अशी चौकशी केली. आणि दोनच महिन्यात त्या क्लासमध्ये रुजू झाल्या.

सुनील सैनी ह्या त्यांच्या कोचने त्यांना जे जे शिकवलं आणि जे जे व्यायामाचे प्रकार करायला सांगितले ते सर्व त्यांनी विनातक्रार केले. यात टायर वर हथोडीने मारण्याचा (Sledgehammer tire workout) बॅटल रोप्स, पुश अप्स अशा कठीण कसरती होत्या. त्या सुद्धा गीता यांनी केल्या. केवळ दोन महिन्यांपूर्वी गीता यांनी तयारी सुरु केली आणि त्यांना लगेचच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपलं कसब दाखवण्याची संधी मिळाली.



दुबईमध्ये संपन्न झालेल्या ‘बुदोकान कप ह्या आंतरराष्ट्रीय कराटे चँपियनशिपमध्ये एकूण 22 देशातील २५०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. हे सर्व खेळाडू विविध श्रेणीतील होते. यात भारताकडून 30 स्पर्धक उतरले होते. यात गीता गोदारा आणि त्यांची नात आश्का गोदारा यांचीही वर्णी लागली. यातील चार भारतीय स्पर्धकांनी विविध श्रेणीत तीन कांस्य, तीन रौप्य आणि एका सुवर्ण पदकाची कमाई केली.  

दुर्जोयदूर सिंग या सहा वर्षीय मुलाने 22 किलो वजनी गटात सुवर्ण आणि रौप्य तर आत्मन जैन या 11 वर्षीय मुलाने 40 किलो वजनी गटांना दोन कांस्य पदक पटकावले. आश्का गोदारा (13) हिने 47 किलो वजनी गटात कांस्य आणि रौप्य पदक कमावले तर गीता गोदारा यांनी ८३ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले. गीता गोदारा यांनी आपल्या यशाचं श्रेय आपले प्रशिक्षक सुनील सैनी आणि विक्रम तिहाल यांना दिलं आहे.

गीता गोदारा यांच्यासाठी हा आनंदाचा क्षण असला तरी भारतातील सर्व स्त्रियांसाठी ही बाब निश्चितच रणादायक आहे. आपल्याला हव्या असलेल्या क्षेत्रात काम करण्यासाठी, दैदिप्यमान कामगिरी करण्यासाठी वयाची अट नसते. आपल्याला, आपल्या कुटुंबियांना आणि आपल्या देशाला अभिमान वाटेल असं काम आपण कोणत्याही वयात करू शकता; फक्त त्यासाठी मेहनत घेण्याची तयारी हवी, हे गीता यांनी स्वत:च्या उदाहरणातून दाखवून दिलं आहे. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना भरभरून शुभेच्छा!