डॉ. माईसाहेब आंबेडकर यांच्यावरील ‘सूर्यप्रभा’ ग्रंथाचं प्रकाशन संपन्न
डॉ. बाबासाहेव आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर
त्यांच्या मृत्यूला माईसाहेब कारणीभूत असल्याचा आरोप पहिल्यांदा केला तो शंकरानंद शास्त्री
यांनी. त्यानंतर माईसाहेबांवर सातत्याने आरोप होत राहिले आणि माईसाहेब अज्ञातवासात
गेल्या. तब्बल पंधरा वर्षं देशाच्या महानायकाची पत्नी दुर्लक्षित जीवन जगत होती. प्रचंड
अन्यायाला त्यांना सामोरं जावं लागत होतं. माईसाहेबांवर झालेल्या अन्यायाचं
परिमार्जन झालं पाहिजे, त्यांना अज्ञातवासातून बाहेर काढलं पाहिजे असा विचार
सर्वप्रथम दलित पँथरचे नेते राजा ढाले यांनी मांडला. ही गोष्ट १९७२ सालातली म्हणजेच दलित पँथर
स्थापनेच्या सुरुवातीच्या काळातली. पुढे सर्वच पँथर्सनी माईसाहेबांवरचा अन्याय दूर
करण्याची भूमिका कर्तव्य भावनेतून घेतली आणि ती तडीस नेली. माईसाहेवांना तब्बल 16
वर्षांच्या विजनवासातून बाहेर काढणं हे दलित पँथरचं सर्वात मोठं कार्य आहे असं प्रतिपादन
ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी काल केलं. त्यांनीच संपादित केलेल्या ‘सूर्यप्रभा’
ह्या डॉ. माईसाहेब आंबेडकर यांच्यावरील ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
हा प्रकाशन सोहळा काल २९ मे २०२३ रोजी म्हणजे माईसाहेब यांच्या विसाव्या
स्मृतीदिनी मुंबई मराठी पत्रकार संघात पार पडला.
दिवाकर शेजवळ पुढे म्हणाले की, माईसाहेबांचं “बाबासाहेबांच्या सहवासात”
हे आत्मचरित्र १९९० साली प्रकाशित झालं. प्रख्यात संशोधक आणि लेखक
विजय सुरवाडे यांनी ते शब्दांकित केलं आणि देवचंद अंबादे यांच्या सह ते प्रकाशित
केलं. हे आत्मचरित्र आल्यानंतर माईसाहेबांवर आलेलं संशयाचं धुकं विरळ होऊ लागलं.
त्यांचं बाबासाहेबांच्या जीवनातील आणि सामाजिक कार्यातील योगदान लोकांना कळू
लागलं. २०२२ साली नदीम खान यांनी ह्या ग्रंथाचं इंग्रजीत अनुवाद केल्यावर ते
जागतिक स्तरावर पोहोचलं आणि माईसाहेबांची महती सर्व जगाला कळलं.
ह्या ग्रंथ प्रकाशनाच्या कार्यक्रमाला केंद्रीय
सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवलेही उपस्थित होते. ते आपल्या भाषणात म्हणाले की, माईसाहेबांवर
त्यांच्या बाबासाहेबांसोबत झालेल्या लग्नापासूनच आक्षेप घेतले जात होते. बाबासाहेबांच्या
महापरिनिर्वाणानंतर तर त्यांच्यावर अनेक आरोप घेतले गेले. पण माईसाहेबांनी घातपात
केला असं म्हणणं म्हणजे बाबासाहेबांनी चूक केली होती असं म्हणण्यासारखं आहे. ना. आठवले
यांनी पँथरच्या काळात माईसाहेबांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. सोबतच आपल्या
खास शैलीत, “मला मिळाली पँथरमध्ये काम करण्याची मुभा, कारण माझ्या मागे उभी होती
सूर्यप्रभा,” ह्या काव्यपंक्तीने आपल्या भावनाही व्यक्त केल्या. त्यांच्या सोबत यावेळी
विचारमंचावर विजय सुरवाडे, नदीम झान, माईसाहेबांवर ‘ग्लोरी ऑफ द सन’ हा ग्रंथ
लिहिणाऱ्या वाल्मिका एलिंजे, ह्या कार्यक्रमाचे आयोजक राजर्षी शाहू महाराज
प्रबोधनचे अध्यक्ष रमेश जाधव, माजी पोलीस उपयुक्त सुरेश जाधव हे मान्यवर उपस्थित
होते.
विजय सुरवाडे यांनी आपल्या भाषणात माईसाहेबांसोबतच्या
आठवणींना उजाळा दिला. तर वाल्मिक एलिंजे यांनी “सूर्यप्रभा” ग्रंथातील काही
लेखांचा उल्लेख करून माईसाहेबांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली. माईसाहेब ह्या
सूर्याची प्रभा असल्या तरी त्यांनी अंधारच अधिक पहिला अशा शब्दात माजी पोलीस
उपयुक्त सुरेश जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘सूर्यप्रभा’ ह्या ग्रंथात माईसाहेबांच्या ‘माझी कैफियत’ आणि ‘देश एकपक्षीय लोकशाहीच्या दिशेने’ ह्या दोन लेखांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘विझणारी ज्योत पुन्हा प्रज्वलित झाली’ ह्या ‘दी बुद्ध अँड हिज धम्म’ ह्या ग्रंथाच्या अप्रकाशित प्रस्तावनेचाही समावेश केला गेला आहे. याशिवाय अहमद हुसेन मशहदी, दिवाकर शेजवळ, ना. रामदास आठवले, नामदेव ढसाळ, रावसाहेब कसबे, ज. वि. पवार, दत्ता भगत, भीमराव आंबेडकर, प्रा. दामोदर मोरे, डॉ. एस. बी. मजुमदार, सुनील खोब्रागडे, शांतीस्वरूप बौद्ध, विजय सुरवाडे, सुहास सोनावणे, डॉ. संजीवनी मुजुमदार, प्रा. रमेश जाधव, सुरेश बारशिंग, किशोर मेढे, दीक्षाताई राजा ढाले, अॅड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे, अरुण निकम, देवचंद अंबादे, अॅड. धम्मकिरण चन्ने, वैशाली राहुल भालेराव आणि चंद्रसेन कांबळे यांच्या लेखांचा समावेश आहे. ह्या ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश जाधव होते तर याचं सूत्र संचालन एकनाथ जाधव यांनी केलं.
'सूर्यप्रभा' हा दिवाकर शेजवळ संपादित ग्रंथ पुस्तक मार्केट पब्लिकेशनने (Pustak Market Publication) प्रकाशित केलं आहे. ३०० पानांच्या ह्या पुस्तकाची किंमत रुपये ४००/- आहे. हे पुस्तक मिळवण्यासाठी दिवाकर शेजवळ यांना 9022609692 ह्या क्रमांकावर संपर्क साधावा.
ग्रंथ विक्रेत्यांसाठी संपर्क: 9156118332
ई मेल: pustakmarket2020@gmail.com
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.