हे प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात चालवण्याची केली मागणी   

महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या अक्षय भालेराव ह्या तरुणाच्या हत्येने महाराष्ट्रात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान 6 जून रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अक्षयच्या कुटुंबियांची भेट घेतली. राज्य सरकारने हे प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात घ्यावे, कुटुंबियांना समाजकल्याण खात्याने आर्थिक मदत करावी, तसेच पोलिसांनी चार्जशीटमध्ये सर्व आरोपींचा यातील रोल स्पष्ट करावा व कुटुंबियांना सरकारने त्यांच्या पसंदीचा वकील द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. ही माहिती त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये दिली आहे.  



महाराष्ट्राच्या ज्या जिल्ह्यातून सुरज येंगडे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर केम्ब्रिज विद्यापीठात शिकणारा पहिला बौद्ध विद्यार्थी ठरला त्याच नांदेड जिल्ह्यात एका दुसऱ्या बौद्ध तरुणाची कट्टर जातीयतेमुळे हत्या करण्यात आली. हे अत्यंत घृणास्पद आहे. एकीकडे हा जिल्हा पुरोगामी आणि आंबेडकरी चळवळीचं केंद्र बनत असताना अक्षय भालेराव ह्या तरुणाच्या हत्येने प्रतिगामी शक्तींचा गड बनत चालल्याचं दिसत आहे. नांदेड मधील बोंढार ह्या गावात केवळ बाबासाहेबांची जयंती साजरी केली म्हणून नऊ कट्टर जातीवादी मेंदूंच्या लोकांनी अक्षय भालेराव ह्या केवळ 24 वर्षीय तरुणाचा चाकू सुऱ्यांनी खून केला. ह्या घृणास्पद कृत्याने पुरोगामी महाराष्ट्र अजूनही कसा मागास आहे हेच दाखवून दिलं आहे.



एप्रिल महिना सुरु झाला की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात सुरु होतो. आता हा उत्सव जगभर साजरा केला जातो. मात्र नांदेड जिल्ह्यातील बोंढार आणि आसपासच्या गावात अजूनही आंबेडकर जयंती साजरी केली जात नाही. ‘द वायर’ने घेतलेल्या स्थानिकांच्या मुलाखतीतून समजलं की ह्या गावात तथाकथित उच्च वर्णीयांचं वर्चस्व आणि दरारा आहे. इथे दर पाच सहा महिन्यातून एकदा दोन समाजात काही ना काही वाद होतो आणि दंगल सदृश परिस्थिती निर्माण होते. बौद्ध वस्तीतील कोणीही उच्च वर्णीयांच्या वस्तीत गेलं की त्यांना जातीवरून शिवीगाळ केली जाते. बौद्धांच्या मालकीची गायरान जमीन सुद्धा ह्या उच्चवर्णीयांकडे आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटाचा अनंतराव तिडके आणि तंटामुक्त गाव योजनेचा गावातील अध्यक्ष भाईजी हे दोघं अशा घटनांना खतपाणी घालत असतात. हे दोघे बौद्ध वस्तीवर हल्ला करण्यासाठी आपल्या बगलबच्चांना पाठवत असतात. जेव्हा ह्या गावात वंचित बहुजन आघाडीची ग्राम शाखा स्थापन झाली तेव्हा पक्षाने त्याला बळ दिल्याने गावात यावर्षी आंबेडकर जयंती साजरी करण्याचं ठरवलं गेलं.. अक्षय भालेराव हा ह्या वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी होता. गावात जयंती साजरी करण्यासाठी मार्चमध्ये गावातील सर्व जातीच्या लोकांसोबत मिटिंगही झाली होती. यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या घेतल्या गेल्या आणि २९ एप्रिल २०२३ रोजी गावात पहिल्यांदा आंबेडकर जयंती पोलिसांच्या कडक बंदोबस्तात साजरी झाली. ह्या उत्सवाला आणि रॅलीला चार तासांची परवानगी मिळालेली असताना केवळ अर्ध्या तासात पोलिसांनी हा कार्यक्रम आटोपता घेण्यास बौद्ध जनतेस भाग पाडलं. बौद्ध लोकांनीही याला अक्षेप न घेता कार्यक्रम थोडक्यात आटोपता घेतला. मात्र एवढा लहान कार्यक्रम सुद्धा ह्या गावातील तथाकथित उच्चवर्णीयांना झोंबला. हा सोहळा संपन्न झाल्यावर हे उच्चवर्णीय तरुण बौद्ध तरुणांना शिवीगाळ करत असत. धमकावत असत.

1 जून रोजी गावातील नारायण तिडके ह्या मराठा जातीच्या तरुणाचं लग्न होतं आणि त्याच्या वरातीत अनेक तरुण हातात तलवारी घेऊन नाचत होते. दरम्यान अक्षय आणि त्याचा भाऊ आकाश किराणा सामान आणायला दुकानावर गेले असता तिथून वरात जात होती. ह्या दोघांना पाहून त्यांना शिवीगाळ करत आणि नंग्या तलवारी नाचवत काही तरुण अक्षयच्या दिशेने आले आणि त्याला मारहाण कर लागले. दोघांनी त्याचे हात पाय पकडून त्याला उचलून फेकू लागले. दोघांनी त्याला चाकूने भोसकलं. आकाश मध्येच पडताच त्याच्या हातावर वार केला. हे सारं बघून त्यांची आई समोर आली तर तिच्यावर दगडफेक करत हे खुनी पळून गेले. अक्षयला त्याचा मोठा भाऊ संदेश हा रिक्षात घालून रुग्णालयात घेऊन गेला मात्र ते रुग्णालयात पोहोचेपर्यंत अक्षय हे जग सोडून गेला होता. दरम्यान आकाश भालेराव यांच्या तक्रारी वरून दत्ता विश्वनाथ तिडके, नारायण विश्वनाथ तिडके, संतोष संजय तिडके, कृष्ण गोविंद तिडके, नीलकंठ रमेश तिडके, शिवाजी दिगंबर तिडके यांच्यासह नऊ जणांवर अॅट्रॉसिटी कायदा १९८९ अंतर्गत कलम 3 (1) (R), 3 (1) (S), 3 (2) (VA) आणि आर्म्स अॅक्टच्या कलम 4, 25 आणि 27 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितलं.

अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिलं आहे –

बोंढार, नांदेड येथील मयत अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियांची काल रात्री भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. अक्षयचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला. आरोपींना पाठीशी घालणार्या कॉंग्रेस पदाधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी आम्ही कॉंग्रेस पक्षाकडे करणार आहोत. तसेच सोशल मीडियावर अक्षय भालेरावची बदनामी करणारे, संभ्रम निर्माण करणार्या पोस्टकर्त्यांची देखील चौकशी करण्यात यावी.

या घटनेमागील जो मेंदू आहे, त्याचाही शोध घेतला पाहिजे. या हत्येचा कट रचणार्या लोकांचा सीडीआर रेकॅार्ड तपासला जावा,

या संदर्भात लवकरच नांदेड एसपी, कलेक्टर यांची भेट घेवून आरोपींना आश्रय देणार्या लोकांची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत.

राज्य सरकारने हे प्रकरण फास्ट ट्रैक कोर्टात घ्यावे, कुटूंबीयांना समाजकल्याण खात्याने आर्थिक मदत करावी, तसेच पोलीसांनी चार्जशीटमध्ये सर्व आरोपींचा यातील रोल स्पष्ट करावा व कुटूबीयांना सरकारने त्यांच्या पसंदीचा वकील द्यावा. अशी मागणी आम्ही करत आहोत.