वात विझताना मोठी होते तसं महाराष्ट्राच्या राजकारणाचं झालं आहे. आता ट्रिपल इंजिनामुळे वात मोठी झाली आहे पण ही वात विकासाचा प्रकाश पाडण्यासाठी नाही तर हे राजकारणच पूर्णपणे विझवून टाकण्यासाठी मोठी झाली आहे हे आता महाराष्ट्रातल्या डाव्या – उजव्या, उभ्या - आडव्या – तिडव्या, सरळ - तिरक्या, लहान-थोर, बाया-बापड्या, मराठी – अमराठी, आस्तिक – नास्तिक, असतील नसतील त्या सर्व नागरिकांना पुरेपूर कळून चुकलेलं आहे. काहीतरी नाही तर बरंच काही चुकलेलं आहे हेही कळून चुकलेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची बदनामी नाही तर हसं कसं कसं होत आहे हे मिम्स, विनोद, ट्रोल्स यावरून दिसतंच आहे. हे हसं महाराष्ट्राचं होत आहे म्हणजे आपलं होत आहे. आपण या विनोदावर हसतो म्हणजे स्वत:वर निर्लज्जासारखे हसतो. कोणीही यावे आणि टिचकी मारुनी जावे इतकं आपल्याला गृहीत धरलं जात आहे. विकासाच्या नावावर एकत्र आलो म्हणणारे Washing Machine मध्ये कसे धुतले जातात हे आता सोम्या गोम्यालाही कळत आहे. आणि जनतेला कळलं आहे हे पहाटेच्या आणि दुपारच्या XXX विधीला पळाल्यासारखे शपथविधीला पळणाऱ्या तथाकथिक लोकप्रतिनिधींनाही माहित आहे. तरीही हे मूर्ख बनविण्याचं काम बिनबोभाट सुरु आहे. महाराष्ट्रातले शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटले, आता त्यांना पक्षाचं नाव आणि पक्ष चिन्ह ह्या कोर्ट कचेऱ्यात गुंतवून पुढील टार्गेट गाठायला टारगटनीस लोक तयार होतील. म्हणून आता नुसते जोक्स मारून वेळ मारून नेता येणार नाही. कारण देशातील लोकशाही अजून संपलेली नाही. पुढे येणाऱ्या अनेक निवडणुकात आपल्याला कोणा ना कोणाला निवडून द्यावंच लागेल. पुढे ते आपापल्या चुली बांधतील, मग त्यावर भाकऱ्या भाजतील, परतवतील की करपवतील हे त्यांचं त्यांना ठाऊक. पण या लोकशाहीत कोणाच्या तरी हाती राज्यकारभार जाणारच. विरोधी पक्ष आणि विरोधी पक्ष नेता असेल नसेल कोण जाणे! त्यामुळे नागरिकांनीच आता विरोधी पक्षाची भूमिका निभवायला हवी.
सगळ्यात आधी तर सर्वच राजकीय नेत्यांना
काही प्रश्न विचारायला हवेत. जसे की,
“तुम्हाला इडी बिडीची भीती वाटत असेल तर
एवढा भ्रष्टाचार करताच कशाला? की आता नंदीबैलांना पुरोगामी महाराष्ट्रात सच्छील
वागणं कठीण झालं आहे?
महाराष्ट्र पुरोगामी तरी आहे ना? की महाराष्ट्राला
पुरोगामी न म्हणता भ्रष्टाचारात पुढारलेला म्हटलेलं ऐकायचं आहे?
स्वत:च्या तुंबड्या भरून घेतल्याने तुमची
पुढची पिढी अभिमानाने जगू शकेल काय? की त्यांनाही पैशाच्या जोरावर परदेशात स्थायिक
करून द्यायचं आहे म्हणून इथे चिखल केला तरी चालेल असा एकंदर प्लान आहे?
नवनवीन खेळ्या खेळून, मास्टर स्ट्रोक मारून
स्वत:ला चाणक्य बिणक्य म्हणवून घेण्याच्या भरात छत्रपतींची शिकवण विसरलात का? गरीबाच्या
भाजीच्या देठाला हात लावू नका म्हणणाऱ्या राजाच्या नावावर आपली कोठारं भरणारे
तुम्ही, राज्यकारभाराच्या नावावर कलंक आहात याची तुम्हाला लाज वाटत नाही का?
तुम्ही तुमच्या भाकऱ्या करपेपर्यंत भाजता नाही
तर करपायच्या आधी परतवता; पण आमची तर पीठंच तुमची उंदरं पळवतात. ह्या बिळातल्या
उंदरांवर कारवाई करायची सोडून तुम्ही आपलीच गोदामं भरता?
राज्यकारभारच एखाद्या लुबाडू
वतनदाराप्रमाणे नाही तर एखाद्या लढवय्या शिलेदाराप्रमाणे चालवला असता तर ही इडीची
शिडी कशाला लागली असती? कोण तुमच्या बोकांडी बसलं असतं? कोणाच्यात सत्ता ओरबाडून
घेण्याची ताकत असती?
इडीच्या भयाने रडीचा डाव कशाला खेळता?
सच्छील वागण्याने एकत्र येऊन हुकुमशाही
राजवट आणू पाहणाऱ्यांना चाप का बसवू शकत नाही?
का नाही Enforcement Directorate लाच धाब्यावर
धरत तुम्ही? का त्यांना जाब विचारत नाही की भ्रष्टाचाराचे आरोप केलेत आता सिद्धही करा
नाहीतर कारवाई करा. पण आम्ही इडीची शिडी लावून राजभवनात जाणार नाही, असं निडरपणे
का बोलू शकत नाही?
का स्वत:ला धुवून घेता? केला असेल गैरव्यवहार
तर शिक्षा होऊ द्या ना. पण असल्या धमकावण्याचं सत्र सुरु करणाऱ्या तथाकथित 56
इंचाची छाती बडवून “कारवाई तो होगी” म्हणणाऱ्या राज्यकर्त्यांसमोर मान तुकवणार
नाही अशी भूमिका का घेत नाही? तुमच्या पुढील राज्यकर्त्यां समोर आदर्श का निर्माण
करत नाही?”
असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात असतील जे
त्या सर्व राजकीय नेत्यांना, पुढाऱ्यांना विचारायचे असतील.
पण आता हे प्रश्न विचारायचे कसे हा प्रश्न
आहे. कारण पत्रकारिता तर....
असो. सर्वांच्या मनातील ह्या प्रश्नांना उत्तरं
देणारे मात्र सध्या पदरात पडलेल्या मंत्रिपदात मश्गुल आणि कुठेतरी गुल आहेत. या
सत्तेच्या नशेतून जागे झालेच तर ठीक.
नाहीतर वेळ येईल तेव्हा हे प्रश्न नागरिकांनी
विचारलेच पाहिजेत, इतकंच!
(प्रसंग - 2 जुलै २०२३ ला शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पुढे आणखी 20 आमदार शपथ घेण्याची शक्यता आहे.)
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.