मुंबई (प्रतिनिधी) :
दिनांक २५ ऑगस्ट ( प्रतिनिधी ) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनता दल सेक्युलर पक्षाच्या मंत्रालया समोरील कार्यालयाच्या नऊशे चौरस फूट जागेपैकी तब्बल सातशे चौरस फूट जागा अचानकपणे आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला देऊन टाकली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे समाजवादी परिवारात प्रचंड संताप व्यक्त
केला जात आहे. सरकारने हा
निर्णय मागे घेतला नाही तर या विरोधात जनता दल सेक्युलर पक्षाचे पाच माजी आमदार
खासदार मंत्रालयासमोर आमरण उपोषण करतील असा थेट इशारा पक्षाचे राज्य महासचिव रवि
भिलाणे यांनी पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिला. या पत्रकार परिषदेला जनता दलाचे प्रभारी राज्य अध्यक्ष
नाथाभाऊ शेवाळे, उपाध्यक्ष सुहास
बने, राज्य महासचिव रवि भिलाणे, मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, मुंबई महासचिव ज्योती बडेकर, सलीम भाटी यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित
होते.
गेल्या महिन्यात बच्चू कडू यांनी १८ जुलै
रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली की, जनता दलाचे बंद असलेले कार्यालय आपल्या प्रहार जनशक्ती
पक्षाला देण्यात यावे. मात्र जनता दल कार्यालय बंद आहे ही मुख्यमंत्र्यांची दिशाभूल आहे. खुद्द सार्वजनिक बांधकाम विभागाने हे कार्यालय
कायमस्वरूपी कार्यरत असल्याचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाला देऊनही
मुख्यमंत्र्यांनी कोणतीही शहानिशा न करता एकतर्फी आदेश काढून २३ ऑगस्ट रोजी या कार्यालयाच्या नऊशे चौरस फूट जागेपैकी
तब्बल सातशे चौरस फूट जागा प्रहार जनशक्ती पक्षाला परस्पर बहाल करून टाकली. अशी माहिती जनता दलाचे प्रभारी राज्य अध्यक्ष नाथाभाऊ
शेवाळे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी माजी पंतप्रधान आणि जनता दलाचे राष्ट्रीय
अध्यक्ष एच.डी.देवेगौडा यांच्या पत्रालाही केराची टोपली दाखवली याबाबत शेवाळे
यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
या पक्षाने देशाला पाच पंतप्रधान दिलेत. ते पाचही पंतप्रधान या कार्यालयात येऊन गेलेत. मुख्यमंत्र्यांनी ही परंपरा तरी विचारात घेतली पाहिजे. असं मत प्रभाकर नारकर यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना ज्योती बडेकर म्हणाल्या की, एसआरएच्या योजनेत अनधिकृत बांधकामांनाही तीन नोटीसा पाठाल्या जातात. मात्र पन्नास वर्षे जुन्या असलेल्या ऐतिहासिक अशा जनता
दल कार्यालया बाबत अशी नोटीस सुद्धा दिली गेली नाही याचा मी निषेध करते.
जनता दलाचे राज्य महासचिव रवि भिलाणे
म्हणाले की, ज्यांनी पक्ष
फोडले, कार्यकर्ते पळवले, घरं फोडली ते आता
विरोधी पक्षाचे कार्यालय सुद्धा बळकावण्याचा प्रयत्न करू लागलेत. मात्र महाराष्ट्रातील जनता हे खपवून घेणार नाही. राज्यातील पुरोगामी जनतेने ही मनमानी संपविण्यासाठी हे
कार्यालय वाचविण्याच्या लढाईत सामील व्हावे असे आवाहन भिलाणे यांनी केले आहे.
---------------------
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.