माझ्या मराठीची कथा

शब्दे मांडियली व्यथा

लेक श्रीमंता घरची

दैन्य सासरी पडता....

 

माझ्या मराठीचा साज

गर्जे आसमंती नाद

शिवरायांच्या कौतुके

उठे कवनांची गाज.....

 

माझ्या मराठीचे गुण

गाती ज्ञानोबा तुकोबा

ताल अभंगाचा जनी

मुखी वसतो विठोबा..

 

माझ्या मराठीची रत्ने

पुलं, जीए, शांता, विवा

बहिणाबाईच्या साथीने

बा.सि. लावियती दिवा....

 

माझ्या मराठीची जाण

ज्योती साऊ देती भान

आंबेडकरांच्या जोडीला

कर्वे जागविती ज्ञान...

 

माझ्या मराठीची गोडी

चाखावी रे थोडी थोडी

तिच्या ऐश्वर्याची आब

आता राखावी बा थोडी....

 

माझ्या मराठीची हार

घडे परक्यांच्या हाती

तिला सावरूया आज

मुखी पडू द्या रे मोती...

 

माझ्या मराठीचे गान

चला गाऊया सांगाती

थोर लहानांच्या मुखी

वसो माऊली मराठी

माझी माऊली मराठी....

-      

---- विनिशा धामणकर