आईच्या दुधानंतर गाईच्या दुधाला महत्त्व दिलं जातं हे आपणा सर्वांना माहित आहे. तान्ह्या बाळाला जर आईचं दूध मिळणं शक्य नसेल तर अशा वेळी गाईचं दूध पाजलं जातं. पण आज पाकिटातून किंवा बाटलीतून मिळणारं गाईचं दूध तुमच्यासाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी सुरक्षित आहे का? तर नाही. याविषयी जाणून घेऊया.  

पुढे जाण्याआधी आपल्या देशातील दूधर्निमिती विषयीची साधारण आकडेवारी बघूया. भारतात दूध देणाऱ्या गाई, म्हशी, बकऱ्या, उंटीणी इत्यादीं जनावरांची संख्या साधारण ३० कोटी (30,00,00,000) आहे. त्यात गाईंची संख्या आहे 8 कोटी. ही सर्व दुभती जनावरे मिळून वर्षाला किमान १८७ मिलियन टन म्हणजेच (१,६९,६०,९०,००,०००) १६९ अरब ६० कोटी ९० लाख लिटर दूध देतात. राष्ट्रीयडेअरी विकास बोर्डाच्या वेबसाईट नुसार भारतात वर्षाला २२१.1 मिलियन मेट्रिक टन म्हणजेच २०० अरब 44  कोटी ७० लाख लिटर (२,००,४४,७०,००,०००) एवढं दूध विविध प्रकाराने वापरलं जातं. दुधाचा हा विनियोग जगात सर्वात जास्त म्हणजे तब्बल 23 टक्के आहे असं ‘पत्र सूचना कार्यालया’च्या (पीआयबी) एका अहवालात म्हटलं आहे. वरील आकडेवरी नीट पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की भारतातील दूध उत्पादन हे त्याच्या वापरापेक्षा ३०,८३,८०,००,००० लिटरने कमी आहे. मग हे तब्बल 30 अरब लिटर दूध येतं कुठून? याचाच अर्थ आपल्यापर्यंत जे दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ येतात मग ते कोणत्याही जनावराचे दूध असो, ते बऱ्याच अंशी भेसळयुक्त किंवा पावडरपासून बनवलेलं असतं असं आपण म्हणू शकतो की नाही? याला आणखी एक जोड आहे ती म्हणजे देशी गाईंपेक्षा अधिक दूध देणाऱ्या परदेशी गाई या दुधाची उणीव भरून काढण्यासाठी आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठी वापरल्या जातात.

हे झालं दूध उत्पादनाविषयी. आता यातूनही तुम्हाला गाईचंच तेही गिर, सहिवाल, रथी, थारपारकर, खिल्लारी अशा देशी गायीचंच दूध मिळत असेल तर तुम्ही अगदी योग्य दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ घेत आहात. पण जर तुम्ही पाकिटात येणारं गाईचं आणि तथाकथित चांगल्या कंपनीचे दुग्धजन्य पदार्थ घेत असाल तर मात्र काही गोष्टी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे.

गाईच्या दुधामध्ये कॅल्शियम, रेबोफ्लेवीन, फॉस्फरस, विटामिन ए, बी 12, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक, आयोडीन आणि भरपूर प्रमाणात प्रथिनं असतात. ह्या सर्व पदार्थांमुळे दुधाला आपण पूर्णान्न म्हणतो. दुधात ८० टक्के कॅसिन प्रथिन असतं तर 20 टक्के व्हे प्रथिन असतं. कॅसिन प्रथिनं तीन प्रकारची असतात ती म्हणजे अल्फा, बीटा आणि कापा कॅसिन. यातील बीटा कॅसिनची पत गाईच्या प्रजातीप्रमाणे ए१ आणि ए२ ह्या प्रकारांवरून ठरते. जर्सी किंवा होलस्टीन फ़्रेशिअन सारख्या परदेशी गाईंमध्ये ए१ हे बीटा कॅसिन असतं. हे प्रथिन असलेलं दूध पिऊन पचन झाल्यावर बीसीएम 7 हे संयुंग बनवतं जे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी घातक असतं. हे संयुग बहिरेपणा, मधुमेह टाईप 1, अल्सरेटीव कोलायटीस, हृदयरोग, मल्टीपल स्क्लेरोसिस, मानसिक आजार, स्कीझ्झोफ्रेनिया, पार्कीन्संस, लठ्ठपणा, आर्टरियो स्क्लेरोसिस अशा आजारांना आमंत्रण देणारं ठरतं. आपण ह्या आजारांवर उपचार करतो मात्र ह्याचं मूळ आपण घेत असलेलं दुधात आहे हे आपल्या लक्षात येत नाही. अनेकांना दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनाने त्रास  होतो. त्यांना लॅक्टोस इनटॉलरंट म्हटलं जातं. यामुळेच सध्या विगन म्हणजे मांसाहारासोबतच दूध किंवा दुग्धजन्य पदार्थरहीत आहार स्वीकारणारे अनेक लोक जगभरात आपल्याला दिसतात.



वर उल्लेखिलेल्या देशी गाईंच्या दुधात ए2 प्रकारचं बीटा कॅसिन असतं जे शरीरासाठी उपयुक्त असतं. यात सायटोकाईन सारखे मायक्रो न्युट्रीएन्ट्स आणि खनिज द्रव्यं असतात ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. भारतातील ए२ दूध देणाऱ्या गाई ह्या त्यांच्या कुबडावरून सहज ओळखता येतात. योगसाधना माहित असलेल्या लोकांसाठी ही माहिती उपयुक्त ठरेल की गाईच्या ह्या कुबडात सूर्यकेतू नाडी असते जी सूर्याची किरणं अधिकाधिक खेचून घेते. ज्यामुळे डी विटामिनचा साठा ह्या दुधात होतोच शिवाय यामुळे दुधाला पिवळा रंग मिळतो. वाचकांनी लक्षात घ्यावं की सूर्यकेतू नाडीच्या या माहितीला पुष्टी देणारा वैज्ञानिक आधार आम्हाला तरी मिळाला नाही. या व्यतिरिक्त बाकी माहिती आपल्याला ए 2 दुधाची माहिती देणाऱ्या कोणत्याही स्त्रोतातून मिळेल.    

आता आपल्याला प्रश्न पडेल की एवढं पौष्टिक दूध देणाऱ्या गाई आपल्या देशातच होत्या तर मग परदेशी गाईचं दूध आपल्या वापरात कसं आलं? त्याचं झालं असं की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षातच आपल्या देशात दोन मोठे दुष्काळ पडले. अन्न आणि दुधाचा मोठा तुटवडा निर्माण झाला. त्यावेळी हरित क्रांती आणि पद्मश्री वर्गीस कुरियन यांच्या पुढाकाराने झालेल्या श्वेत क्रांतीने देशाला अन्नान्न दशेतून बाहेर काढलं. याचे दूरगामी परिणाम वाईटच होणार हे अनेकांना कळत होतं पण त्यावेळी ही गरज भागवणं अधिक आवश्यक होतं. अर्थात आपण आता ते परिणाम भोगत आहोत. श्वेत क्रांतीत जास्त दुधाची निर्मिती व्हावी म्हणून देशी आणि परदेशी गाईचं क्रॉस ब्रीडिंग म्हणजे संकर करण्यात आला. यातूनच आपल्या दुधात ए१ ह्या प्रथिनांचा शिरकाव झाला. तरीही अजूनही अनेक ठिकाणी फक्त देशी गाईंची पैदास आणि दुध निर्मिती केली जाते. परदेशात ए2 दुधाची महती कळल्यावर तिकडे अनेक भारतीय देशी गाई आयात करून तिथे त्यांची पैदास होत आहे. आपल्याकडे मात्र पिशवीतील आजाराला आमंत्रण देणारं दूध दिलं जात आहे. पनीर, चीज, आईसक्रीम अशा दुग्धजन्य पदार्थांची वारेमाप जाहिरात करून ए1 दूध आपल्या माथी मारलं जात आहे. ए2 दूध हेच आपल्या आणि आपल्या मुलांच्या शारीरिक मानसिक आरोग्यासाठी योग्य आहे. आजच्या महाजालाच्या काळात हे दूध कुठे मिळेल हे शोधणं कठीण नाही. पण जर हे दूध मिळत नसेल तर प्लास्टीकच्या थैलीतील ए१ दूध पिण्यासाठी, चहा कॉफीसाठी किंवा अन्य कोणताही पदार्थ करण्यासाठी वापरू नका, हा साधा सल्ला आहे. ए२ दूध हे ए१ पेक्षा आपल्याला महाग वाटत असलं तरी पुढे येणाऱ्या आजारांच्या तुलनेत ते स्वस्तच म्हणायला हवं. मग तुम्ही कधीपासून ए२ दूध घ्यायला सुरुवात करणार?  

 

---- विनिशा धामणकर