ज्याची समुद्रावर सत्ता तोच खरा सम्राट असं युद्धनीती सांगते. शिवाजी महाराज देखील हे मानायचे म्हणूनच त्यांनी सशक्त आरमार उभं केलं. 

म्हणूनच भारतीय नौदल छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांना "भारतीय नौदलाचे जनक" मानते. भारतीय नौदलाने ही आपल्या वकुबाला साजेशी कामगिरी आजवर केली आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने बेधडक कारवाई करीत भारतीय नौदलाच्या नौका थेट कराचीच्या किनाऱ्याला भिडवल्या होत्या़. विशाखापट्टणमवरचा हल्ला परतवण्यात आणि पूर्व पाकिस्तानातल्या नेव्हीचं उच्चाटन करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. विक्रांत या विमानवाहू नौकेवरील विमानांनी तर शत्रूवर बॉम्बगोळ्यांचा भडिमार केला होता़. या युद्धात गाझीही पाकिस्तानची पाणबुडीही भारतीय नौदलाने उद्ध्वस्त केली होती़. या कामगिरीचं नाव होतं ऑपरेशन ट्रायडण्ट. नौदलाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजयश्री मिळविणे अधिक सुकर झाले. ४ डिसेंबरला ही कामगिरी यशस्वी झाली. तेंव्हा पासून ४ डिसेंबर हा भारतीय नौदल दिन म्हणून साजरा करण्यात येतो.    

नौदलाच्या लष्करी कारवाईचं याहूनही ताजे उदाहरण घ्यायचं, तर श्रीलंकेच्या कारवाई अर्थात ऑपरेशन पवनअंतर्गत भूदलाला केलेल्या साहाय्याचे घेता येईल़ तसेच ऑपरेशन कॅक्टसअंतर्गत नौदलाने ताब्यात घेतलेल्या एमव्ही प्रोग्रेस लाइटमुळे मालदीवमधील बंड शांत करण्यातही मोठे साहाय्य झाले होत़े.

१९३४ साली ब्रिटीशांनी रॉयल इंडियन नेव्हीची स्थापना केली. तेंव्हापासून अनेक युद्धनौका आणि पाणबुड्या यांनी नौदलाची शान वाढवली आहे. स्वदेशी बनावटीची अण्वस्त्र आव्हानाला तोंड देण्याची क्षमता असलेली पहिली आण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंत ही २६ जुलै २००९ रोजी भारतीय नौदलात सामील झाली. हिची निमिर्ती कलपक्कम येथील 'इंदिरा गांधी सेंटर फॉर अँटोमिक रिसर्च' येथे 'भारतीय नौदल' आणि 'संरक्षण संशोधक आणि विकास ऑर्गनायझेशन'ने एकत्रित प्रयत्नांतून करण्यात आली आहे. आयएनएस विराट आणि आयएनएस विक्रमादित्यमुळे भारतीय नौदल जगात पाचव्या क्रमांकावर आहे. भारतीय नौसेनेकडे एकूण ५५ युद्धनौका, ९ विध्वंसक, १५ नौका, न्यूक्लिअर हल्‍ला करणारी एक पाणबुडी, १४ पारंपारिक पाणबुड्यांसह आधुनिक शस्त्रं आहेत. नौदलाकडे १५५ युद्धनौकांचा ताफा आहे. नौदलाच्या हवाई शाखेत धृव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. २०० मरीन कमांडों नौदलात आहेत. तसेच भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. विराट डेली क्लास, त्रिशूळ, आयएनएस बेटवा आणि मिसाईलचा मारा करणारी नौका विनाश या नौका तसेच संकुश पाणबुडी हे ही नौदलाचे भाग आहेत. १९५३ मध्ये हवेत मारा करणारी शस्त्रे आणि इ.स. १९६७ मध्ये पाणबुड्या ताफ्यात समाविष्ट झाल्या. युद्धनौका बांधणीचा प्रकल्प देशातच हवा म्हणून माझगाव गोदीमध्ये १९६६ साली लढाऊ जहाजाच्या बांधणीचे काम सुरू झाले. या माध्यमातून आजतागायत ८० युद्धनौकांची बांधणी करण्यात आली आहे. त्यात टेहळणी जहाजांपासून विनाशिकेपर्यंत आणि लढाऊ जहाजे, पाणबुडी यांच्यासह युद्धनौकांचाही समावेश आहे.

अन्य राष्ट्रांच्या विनंतीवरून भारतीय नौदल त्या त्या राष्ट्रांच्या समुद्रसीमेतही तैनात होऊ लागले. इतर राष्ट्रांच्या बंदरांना भेटी, संयुक्त कवायत, प्रशिक्षण व आपत्कालीन मदत याद्वारे मैत्रीचे संबंध बळकट करण्यात आले आहेत. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, फ्रान्स, रशिया, चीन आदी राष्ट्रांबरोबर नौदलाने संयुक्त कवायतींमार्फत ज्ञानाचे आदानप्रदानही केले आहे. २००४ साली त्सुनामी संकटात श्रीलंका, इंडोनेशिया आणि मालदीव या देशांना तात्काळ मदतीचा हात दिला.

पारंपरिकरीत्या देशाच्या संरक्षणाबाबत नौदल लष्करी कारवाया करणे, रखवालदारी आणि धोरणात्मकता या तीन भूमिका़ बजावत़े. याशिवाय मानवतावादी साहाय्य आणि आपत्ती निवारण़ ह्या जबाबदार्‍याही आता नौदलाकडे आह़ेत. आपली सागरी मालमत्ता, किनारपट्टी यांचे रक्षण करणे, एवढ्यापुरतीच नौदलाची लष्करी भूमिका मर्यादित नाही; तर प्रत्यक्ष युद्धप्रसंगांत देशाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी साहाय्य करणे, हीसुद्धा नौदलाची जबाबदारी आह़े

१९९९ साली कारगीलच्या युद्धात आणि त्यानंतर ऑपरेशन पराक्रमया मोहिमेच्या वेळी नौदलाने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानी युद्धनौकांना त्यांच्या नाविक तळातून बाहेर पडणंही अवघड झालं होतं.

पांढर्‍या शुभ्र गणवेशातील नौदल सैनिकांना निळ्या समुद्रावर कायदेशीर आणि विधायक उपक्रमांना साहाय्य करत असताना समुद्रात अनेक बेकायदेशीर गोष्टीही पाहायला मिळतात़. जशा की, चाचेगिरी, शस्त्र- अमली पदार्थ यांची अवैध वाहतूक, मानवी तस्करी, अनधिकृत मासेमारी, समुद्रतळातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा अवैध उपसा, विध्वंसक शस्त्रास्त्रांचा प्रसार आणि समुद्रोद्भव आतंकवाद अशी काही समुद्रात चालणाऱ्या बेकायदेशीर गोष्टींची उदाहरणे आहेत़. ऑक्टोबर २००८ पासून एडनच्या आखातात भारतीय नौदल चाचेगिरीविरोधात घेत असलेले श्रम हा रखवालदारम्हणून नौदल बजावीत असलेल्या कामगिरीचे उत्तम उदाहरण आह़े. त्यांनी दोन हजारांहून अधिक नौकांची समुद्र प्रवासात सुरक्षेसाठी सोबत केली आह़े. मोठा संख्येने चाच्यांना ताब्यात घेतलं आह़े. तसेच सोमालियन चाच्यांकडून त्यांचे प्रभावक्षेत्र वाढविण्याचे होणारे प्रयत्नही आम्ही सातत्याने हाणून पाडले आहेत.

ज्या भारतीय नौदलाकडे १९४७ साली अर्ध्या डझनापेक्षाही कमी गलबतं होती, तेच नौदल आज जगातील मोठ्या नौदलांपैकी एक झालं आहे आणि म्हणूनच भारतीय नौदल प्रगतिपथावर असलेल्या भारताचा महत्त्वाचा घटक आह़े.

विनिशा धामणकर