बिल्किस बानो प्रकरणातील सर्व ११ दोषी पुन्हा गजाआड.
सर्वोच्च नायालयाने दिलेल्या अंतिम दिवस संपण्याच्या १५ मिनिटे आधी
केले समर्पण
दिनांक २२ जानेवारी २०२४ हा दिवस निश्चितच ऐतिहासिक
ठरला आहे. या दिवशी अयोध्येच्या अर्धवट बनलेल्या आणि न बनलेला भाग कपड्याने
झाकून राममंदिरात श्रीरामाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. याचा जल्लोष
रामभक्तांच्या म्हणण्यानुसार संपूर्ण देशात करण्यात आला. इतर धर्मियांच्या घरात, परिसरात,
आजही अनेक गोष्टींचं दुर्भिक्ष्य असलेल्या दूरदूरच्या गाव खेड्यात, अनेक समस्यांनी
ग्रस्त असलेल्या वस्त्या वाड्यांमध्ये हा जल्लोष करण्यात आला की नाही याच्याशी
त्यांचं काहीही देणं घेणं नाही. कारण मुळात बाबासाहेबांनी गांधीजींना एकदा
म्हटल्याप्रमाणे या लोकांना त्यांची भूमीच नाही. हे लोक याच देशात राहतात असं कधी त्या
जल्लोषवीरांना वाटतच नाही. त्यांना आपला कधीतरी येणारा माणुसकीच्या पुळक्याचं अन्नदान,
जलदान, वह्यादान, पाट्यादान, खडूदान, रक्तदान करून आणि प्रजासत्ताक दिनी त्यांच्या
वस्तीत झेंडावंदन करून ओथंबून वाहणाऱ्या राष्ट्रवादाच्या, राष्ट्रभक्तीच्या भावना प्रदर्शित
करण्यासाठी एका बाजूला ठेवलेलं आहे एवढंच. त्यांच्या जन्माचं सोयरं नाही की मरणाचं
सुतक नाही. त्यामुळे सर्व देशात ‘राम आए है’चा उन्माद ठणठणत असला तरी तो देशाच्या
कानाकोपऱ्यात सुरू असेलच असं नाही. असो. तर असा हा जल्लोष आदल्या रात्री पासून सुरू
असताना या जल्लोषाच्या मागे असलेल्या कारणाच्या एका पुर्वपिठीकेचे एक वर्तुळ याच
वेळी पूर्ण झालं. अनेक स्थित्यंतरे आणि चढ उतारातून गेलेल्या बिल्किस बानो
प्रकरणातील ११ आरोपी २१ जानेवारी २०२४ च्या रात्री बरोबर ११ वाजून ४५ मिनिटांनी पुन्हा
एकदा गजाआड झाले. राममंदिराचा सोहळ्याचा आंखो देखा हाल दाखवणाऱ्या प्रसार
माध्यमांनी (काही सन्माननीय अपवाद सोडता) या बातमीकडे सपशेल कानाडोळा केला. ही
बातमी आली ती युट्युब वर सजग असलेल्या काही वाहिन्यांवरून.
१५ ऑगस्ट २०२२ रोजी ज्या दिवशी प्रधानसेवक नरेंद्र
मोदी लाल किल्ल्यावरून महिलांच्या सुरक्षेवर भाषण देत होते त्याच वेळी या ११
आरोपींना सोडलं गेलं आणि त्यांच्या गावातील महिलांनीच त्यांचं हळद कुंकू लावून
ओवाळून त्यांचं स्वागत केल. यावर चाहुवाजूंनी टीका झाली. बिल्किसच्या
गुन्हेगारांना, बलात्काराचे आरोप असणाऱ्या लोकांच्या गळ्यात हार तुरे घालून त्यांना
‘संस्कारी ब्राम्हण’ म्हणत त्यांचं स्वागत करणाऱ्या बायकांवर अधिक ताशेरे ओढले.
आजही पुरुषसत्ताक मानसिकतेत बायका किती रमलेल्या आहेत, हे जितकं त्यादिवशी दिसलं
होतं तितकं आजही राम मंदिराच्या उद्घाटनाच्या उन्मादात दिसलं. भगव्या रंगाच्या
साड्या नेसून, ड्रेस घालून बायका नाचत गात, पूजेच्या थाळ्या घेऊन रामोत्स्वात तल्लीन
झाल्या होत्या. दिवसभर प्रसार माध्यमांवर सुद्धा तोच बँडबाजा सुरू असल्याने आपल्यासारख्याच एका स्त्रीच्या अब्रूला हात घालणाऱ्यांना सर्वोच्च
न्यायालयाने जेरबंद केलं आहे आणि त्या नराधमांना पाठिंबा देणाऱ्यांना आपण पाठिंबा
देत आहोत याचं भान त्यांना कुठून असणार!
८ जानेवारी २०२४ रोजी गुजरात सरकारने आगाऊपणाने घेतलेल्या निर्णयावर ओरखडे काढून २१ जानेवारी २०२४ च्या आत या अकराही जणांना कोर्टापुढे शरण येण्याचे
आदेश दिले तेव्हा बिल्किसची फार बोलकी प्रतिक्रिया आली होती. ती म्हणाली होती की, ‘गेल्या
दीड वर्षात मी पहिल्यांदा हसले आहे. मी माझ्या मुलांना मिठी मारली. माझ्या
छातीवरून डोंगराएवढा दगड उचलल्यासारखं मला वाटलं आणि आता मी पुन्हा श्वास घेऊ शकते.
यालाच न्याय म्हणतात. हा न्याय मला, माझ्या मुलांना आणि सर्व स्त्रियांना दिल्याबद्दल
मी भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानते आणि सर्वांना समान न्याय
मिळेल अशी आशा करते.’ बिल्किसची घुसमट बिल्किस सारख्याच एखादीला कळली तर कळेल.
२१ जानेवारीची तारीख सर्वोच्च न्यायालयाने दिली तरी २२ जानेवारीला होणाऱ्या श्रीराम प्राण प्रतिष्ठेचं वलय अधिक होतं. मुख्य प्रसार माध्यमे अशा तारखा जाणूनबुजून
विसरले की लोकांच्या तर ध्यानीमनी सुद्धा राहत नाही. अजित अंजुम यांच्या युट्युब
वाहिनी वर याची बातमी पहिल्यांदा कळली. मग टेलेग्राफ, मिंट वर मिळाली. अशीच माध्यमं
आहेत जे डोळे उघडे ठेवून नीट बघतात. पत्रही असतात आणि मित्रही.
१५ ऑगस्ट २०२२ रोजी गुजरात सरकारने ‘गुजरात माफी नीती
१९९२’चा आधार घेऊन राधेश्याम शाह, जसवंत नाई, गोविंद नाई, केसर वोहनिया, बाका वोहनिया, राजू सोनी, रमेश चंदना, शैलेश भट्ट, बिपिन जोशी, प्रदिप मोढिया आणि मितेश
भट्ट या अकरा जणांना सोडल्यानंतर याला विरोध करणारी एक याचिका बिल्किसने सर्वोच्च
न्यायालयात दाखल केली होती. सीपीआय (एम) नेत्या सुभाषिनी अली, तृणमूल कॉंग्रेस नेत्या
महुआ मोईत्रा, स्वतंत्र
पत्रकार रेवती लॉल आणि लखनऊ विद्यापीठाच्या माजी कुलगुरू रूप रेखा वर्मा यांच्यासह
अनेक जनहित याचिकांनी दोषींना दिलेल्या सवलतीला आव्हान दिले होते.
सर्व दोषींनी अंतिम मुदत वाढवण्याची विनंती केली होती यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला वृद्ध आईवडील, मुले लग्नायोग्य झाली आहेत, शेतीकडे पाहायचे आहे इत्यादी कामे असल्याची कारणं सांगून अंतिम मुदत वाढवण्यासाठी याचिका दिल्या. पण सर्वोच्च न्यायालयाने त्या फेटाळून लावल्या आणि त्यांना २१ जानेवारी २०२४ ला शरण येण्यास सांगितले. हा निकाल दिल्यापासून ते शरण येई पर्यंत ते सर्व आरोपी गायब होते असं दाहोदचे एसपी बलराम मीना यांनी सांगितलं. काही पत्रकारांनी दोषींच्या घरी चौकशी केली तेव्हा काहींच्या कुटुंबीयांनी ते १५ महिने घरी आलेच नाहीत तर काही लोकांनी ते बायको मुलासह दुसरीकडे निघून गेल्याचं सांगितलं. गावातील दुकानदारांनी मात्र सर्वच्या सर्व गुन्हेगार रविवार म्हणजे ९ जानेवारी पर्यंत गावातच होते असं सांगितलं. याचा अर्थ गेले दीड वर्षभर आयुष्य मजेत घालवून ८ जानेवारी २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी. व्ही. नागरथना आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने दोषींची माफी रद्द ठरवून त्यांना शरण येण्याचं फर्मान सोडलं आणि ते सर्व गायब झाले. पण कुठून कांडी फिरली आणि २१ जानेवारीच्या रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी हे सर्व ११ दोषी पंचमहाल जिल्ह्यातील गोधरा तुरुंगात शरण आले.
बाबरी मस्जिद पतन, राम मंदिराच्या उन्मदातला देशभरात
उसळलेला आगडोंब, गोधरा कांड, तिथलं हत्याकांड, बिल्किस बानो आणि तिच्या आईवर झालेले
बलात्कार, मुलीची आणि इतरांची हत्या, बिल्किसचा आक्रोश, त्या सर्व दोषींचा पळपुटेपणा,
येन केन प्रकारेण यातून सुटण्याची धडपड, शेवटी १४ वर्षांचा तुरुंगवास, राम मंदिराच्या
उभारणीला सुरुवात, पुन्हा फ्रॉड करून दोषींची तुरुंगातून सुटका, त्या विरोधात बिल्किसची
याचिका, सर्वोच्च न्यायालयाचे शरण येण्याचे आदेश, बिल्किसच्या चेहऱ्यावर पसरलेलं
हास्य, मुदत संपायच्या १५ मिनिटे आधी सर्व दोषी तुरुंगातील गजाआड... एक वर्तुळ
पूर्ण झालं.
आता राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा झाल्यावर पुढे कोणत्या
रेषा वर्तुळात येण्यासाठी घोंघावणार आहेत हा एक चिवित्र प्रश्न आहे. सध्या तरी
बिल्किस बानोचे दोषी गजाआड झाले हा न्यायप्रिय लोकांसाठी उत्सवाचे कारण नक्कीच ठरू
शकतो.
---- विनिशा धामणकर
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.