उद्याचं जग कसं असेल, याविषयी आपल्या सगळ्यांच्याच मनात एक विलक्षण कुतूहल असतं.
आपल्या दैनंदिन जीवनात उद्या काय नवीन घडेल, याचा विचार करत असतानाच अनेक विषयांतील तज्ज्ञ, अभ्यासक भविष्यासंबंधी वेगवेगळ्या शक्यता व्यक्त करत असतात. काही शक्यता उत्साहवर्धक असतात, तर काही वेळा त्या विचारांनी मनात अस्वस्थता दाटते. एकीकडे उद्याचं जग थक्क करणाऱ्या संधी घेऊन येतंय, तर दुसरीकडे ते अनेक चिंता आणि अनिश्चिततांचा गडद धुरकट पडदा पसरवतं. या साऱ्या विचारांमधून एक गोष्ट सातत्यानं समोर येते ती म्हणजे 'बदल'. हा बदलच आपल्या जगण्याची दिशा ठरवणारा आहे. जो बदलांना सामोरं जाण्याची धडाडी दाखवेल तोच या लाटेत टिकून राहू शकेल हे आज सगळीकडे सातत्याने सांगितलं जातंय.
आजच्या जगात बदलांचा वेग झपाट्याने वाढत चालला आहे. अमेरिकेमध्ये चालकविरहित गाड्या प्रत्यक्ष वापरात आहेत. जर्मनीतल्या काही कारखान्यांमध्ये तर माणसांची गरजच नाही; आता यंत्रमानव तिथलं काम करतात. सौदी अरेबियानं २०१७ साली 'सोफिया' नावाच्या एका (महिला) यंत्रमानवाला अधिकृत नागरिकत्व दिलं आहे. आयबीएम कंपनीच्या 'वॉटसन' नावाच्या सॉफ्टवेअरनं अनेक वकिलांच्या नोकऱ्यांवर परिणाम घडवून आणला आहे. जगभरात अनेक ठिकाणी यंत्रमानव सर्रास शस्त्रक्रिया करायला लागले आहेत. भारतात काही ठिकाणी स्मार्ट सिंचन प्रणाली वापरली जात असून यामध्ये शेतीला आपोआप योग्य तेवढंच पाणी देण्यासाठीची यंत्रणा संगणकांद्वारे चालवलेली पाहायला मिळते. चेन्नईमध्ये एका हॉटेलात तर ग्राहकांना ऑर्डर आणून देणं, अन्नाची डिश टेबलवर ठेवणं इत्यादी सर्व कामं यंत्रमानव करतात. प्रगत तंत्रज्ञानाची ही तर अगदी मोजकीच उदाहरणं आहेत. हे सगळं शक्य झालंय एका क्रांतीमुळे. ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता- Artificial Intelligence.
यंत्र किंवा संगणक माणसांसारखंच अनुभूती घेऊन वागू, पाहू, चालू, ऐकू किंवा विचार करू शकतील का? अशा अनेक कल्पना शतकांपासून माणसांच्या मनात घर करून होत्या. यंत्रांना कृत्रिमपणे हुशार बनवायच्या याच प्रयत्नांना 'कृत्रिम बुद्धिमत्ता' असं म्हणतात. १९५६ मध्ये न्यू हॅम्पशर येथील डार्टमाऊथ कॉलेजात झालेल्या एका परिषदेत प्रथमच या शब्दाचा वापर झाला. ही परिषद भरवण्यात जॉन मॅकार्थीचा पुढाकार होता. बुद्धिमत्तेचा हा नवीन अवतार आज आपल्या जीवनात वेगाने रुजतो आहे. १९९७ मध्ये आयबीएम कंपनीच्या 'डीप ब्ल्यू' या संगणकाने जागतिक विजेता गॅरी कॅस्परॉव्हविरुद्धच्या बुद्धिबळाच्या सामन्यात विजय मिळवला होता. यावरून कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना किती महत्वाची आहे याचा अंदाज आपल्याला येतो.
आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेने आपली ठसा उमटवायला सुरुवात केली आहे. या विकसित तंत्रज्ञानामुळे आपल्याला दैनंदिन जीवनव्यवहारात अनेक फायदे झाले आहेत. उदाहरणार्थ, बँक, विमा कंपन्या तसेच म्युच्युअल फंड संस्थांनी आपल्या ग्राहकसेवेसाठीच्या यंत्रणेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू केला आहे. ग्राहकांना पडणाऱ्या, सर्वसामान्य प्रश्नांची उत्तरं आता इमेल, फोन अशा माध्यमांचा वापर करून देण्याऐवजी स्वयंचलित यंत्रणांद्वारे म्हणजेच 'बॉट्स'द्वारे देण्याकडे या संस्थांचा कल दिसतो. गुंतवणुकीच्या संदर्भातही, कुठल्या माणसानं कोणत्या परिस्थितीत शेअर्स, म्युच्युअल फंड्स यापैकी कशामध्ये गुंतवणूक करावी, या सगळ्याचं प्रमाण किती असावं, नेमक्या कुठल्या योजना निवडाव्यात, या गोष्टी आता अनेकदा 'रोबोट ॲडव्हायजरी' या नावानं ओळखल्या जाणाऱ्या यंत्रणेकडून ठरवल्या जातात. वाहतूक क्षेत्रात एआय, ट्रॅफिकचा अंदाज लावण्यास, fastest route सुचवण्यासाठी मदत करते. तसेच स्वयंचलित वाहनेही एआयमुळे प्रत्यक्षात येत आहेत. आरोग्यसेवेतही एआय उपचार संशोधन, चाचणी विश्लेषण आणि उपचारांसाठी वापरले जात आहे. कृषिक्षेत्रात शेतकऱ्यांना योग्य पीक व्यवस्थापन, हवामान अंदाज, आणि संसाधन वापरासंबंधी सूचना देण्यास एआय मदत आहे.
एआय चा वापर सध्या ज्या क्षेत्रात सर्वात जास्त झालाय ते म्हणजे शिक्षण क्षेत्र. एआयमुळे विकसित झालेले Chatgpt सारखे स्मार्ट ट्यूटर विद्यार्थ्यांना चोवीस तास मदत करु शकतात. शिक्षकांना एआयचा वापर करून शिक्षण परस्परसंवादी करता येऊ शकते. अंध किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एआय आधारित टूल्स जसे की स्क्रीन रिडींग अतिशय उपयुक्त आहेत. शिक्षण क्षेत्रातील अनधिकृत प्रतिलेखन किंवा साहित्यचोरी देखील एआयद्वारे तपासली जाऊ शकते. एआयची २४ तास उपलब्धता, प्रभावी कार्यक्षमता, अचूक परिणाम हा त्याचा सर्वात मोठा आणि सर्वात उल्लेखनीय फायदा आहे.
एआय हे एक शक्तिशाली, आश्वासक तंत्रज्ञान महत्वपूर्ण संधी आणि जोखीम दोन्हींनी भरलेला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे जसे फायदे आहेत तसे काही गंभीर तोटे आणि आव्हाने देखील आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आणि यंत्रमानवांच्या तंत्रज्ञानात जसजशी प्रगती होत जाईल, तसतसे मानवी रोजगार कमी होत जातील अशी रास्त भीती अनेकदा व्यक्त केली जाते. ही तंत्रज्ञानं माणसाला पर्याय ठरू शकतील आणि स्वाभाविकपणे माणसांना नोकऱ्या मिळणं कठीण होऊन बसेल असा यामागचा अंदाज आहे. यासाठीच आपण प्रत्येकाने भविष्यात येऊ घातलेल्या या संकटांचा सामना करण्यासाठी नवीन कौशल्य संपादित करणं अत्यंत गरजेचं आहे.
एआय श्रमिक बाजारपेठेत व्यत्यय आणू शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामुळे, बेरोजगारी वाढण्याची आणि अनेक पारंपरिक उद्योग- व्यवसाय देशोधडीला लागण्याची शक्यता आहे. एआय सर्वगुणसंपन्न असले तरी मूळ विचारांचा, भावनांचा, सहानुभूतीचा त्यात अभाव आहे. म्हणूनच, एआय कधीही शिक्षकांची जागा घेणार नाही असा युक्तिवाद आपण मांडू शकतो. एआयचा सर्वात मोठा तोटा म्हणजे जसाजसा एआयचा वापर अधिक व्यापक होत जातो तसतसे नैतिक आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाचे धोके देखील वाढत जातात. तसेच एआय कधीकधी चुकीचे परिणाम देत असल्याने भ्रम निर्माण होतो.
एआय हे एक उत्तम साधन आहे आणि ते क्रांतिकारी असू शकते, परंतु ते आपल्याविरुद्ध देखील वापरले जाऊ शकते याचा आपण विचार करायला हवा. मानवी मेंदूची क्षमता कृत्रिम बुद्धिमत्ता कधी पार करू शकेल का, हा आज वैज्ञानिकांना पडणारा सर्वांत मोठा प्रश्न आहे. २०१७ साली चीनमधील चीअर्स पब्लिकेशन्स संस्थेने ‘सनशाईन मिसेस विंडोज’ हा जगातील पहिला शाओआइस या मायक्रोसॉफ्टच्या एआय प्रणालीने लिहिलेला काव्यसंग्रह प्रकाशित केला. २७६० तासात १०,००० पेक्षा जास्त कविता लिहिल्या गेल्या असून १३९ कविता या संग्रहात आहेत. अशीच अजून एक महत्वाची घटना म्हणजे २५ ऑक्टोबर २०१८ रोजी, ख्रिस्तीज या कलेतील लिलावासाठी जगप्रसिद्ध असलेल्या संस्थेने, कृत्रिम बुद्धिमत्तेने चितारलेल्या जगातील पहिल्या चित्राचा लिलाव केला. एडमंड डी बेलामी या काल्पनिक व्यक्तीचे पोट्रेट अस्पष्ट चितारलेल्या या चित्राला सात ते दहा हजार डॉलर मिळतील, असा अंदाज होता ते चित्र ४ लाख ३२ हजार ५०० डॉलर्सना विकले गेले. वरील उदाहरणांवरून मानावाकडे असलेल्या सर्जनशीलतेचा, कौशल्यांचा ताबा एआयने कसा मिळवला आहे तसेच ते किती प्रगत होऊन माणसाची बरोबरी करू लागले आहेत याचा अंदाज येतो.
यावरून माणसाचे भवितव्य काय असा प्रश्न सहजच निर्माण होतो. वरील अविश्वसनिय वस्तुस्थिती पाहिली की यंत्रमानवांकडे, तंत्रज्ञानाकडे आपल्या आयुष्याची दोरी जात नाही ना, एवढी खबरदारी घेत हे तंत्रज्ञान पुढे नेण्याचं बिकट आव्हान आपल्यापुढे आहे. आज माणसाचा गुलाम असलेला हा यंत्रमानव उद्या माणसालाच आपला गुलाम बनवेल, अशी भीती अनेकांना वाटायला लागली असताना या अटळ भविष्याशी आपण कसं जुळवून घेतो यावर प्रत्येकाचं भवितव्य अवलंबून आहे. आज सिरी किंवा अलेक्सा यांसारखे voice assistants एका हाकेवर उपलब्ध असतांना या तंत्रज्ञानाचा आपण कसा आणि किती वापर करतो यावर सगळा परिणाम अवलंबून आहे. आणि म्हणूनच मानवी मूल्ये आणि हितसंबंधांचा आदर राखून, जबाबदारीने आणि नैतिकतेने एआय विकसित करणे आणि वापरणे महत्त्वाचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता जरी विकसित होत असली तरी मानवी विवेक अजूनही श्रेष्ठ आहे. त्यामुळे आपण सगळेच स्मार्ट मशीन पेक्षा स्मार्ट वापरकर्ते होऊया!
-कल्याणी नेवे
3 Comments
👍
ReplyDelete👏
ReplyDelete👍🏻
ReplyDeletePost a Comment
Please do not add any spam link in the comment box.