सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महात्मा ज्योतिबा फुले
यांना जयंतीनिमित्त अभिवादन
दि १३ एप्रिल २०२५
पुणे : आज पुण्यातील वाडे जगप्रसिद्ध होत आहेत. कारण
फुलेंनी भिडे वाडा, गोखले वाडा या वाड्यामध्ये जे काम केले
ते पाहण्यासाठी तसेच जो हौद खुला केला ते पाहण्यासाठी जगभरातील लोक पुण्यामध्ये
येत आहेत. त्यामुळे पुण्यातील अनेक ठिकाणं आणि स्थळं जगप्रसिद्ध झाली आहेत. म्हणून
'फुले' नावाचा जो एक परिमळ आहे,
तो आज जगभर पसरत आहे, असे उद्गार ज्येष्ठ
साहित्यिक, विचारवंत आणि आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज. वि.
पवार यांनी काढले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९८ व्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानाच्या
कार्यक्रमात ते बोलत होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासकीय
इमारतीजवळील पुतळ्यास कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक ज. वि. पवार, प्र -
कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ.
ज्योती भाकरे, वित्त व लेखाधिकारी सीएमए चारुशीला गायके,
व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, अधिसभा
सदस्य, विद्यापरिषद सदस्य, परीक्षा व
मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. डॉ. प्रभाकर देसाई, अधिष्ठाता
प्रा. डॉ. विजय खरे, डॉ. अभिजित कुलकर्णी, डॉ. सदानंद भोसले विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख आदी
मान्यवरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून
अभिवादन केले.
'देशामध्ये फार मोठी समाजक्रांती घडवून आणण्याचे काम
क्रांतीबा फुले यांनी केले आहे. या देशातील भगिनी त्या काळात गुलाम होत्या
त्यांच्या पायात गुलामगिरीची बेडी होती ते तोडण्याचे काम फुले दाम्पत्याने केले.
आज सर्व क्षेत्रामध्ये महिला भगिनी उंच भरारी घेत आहे. हे फुले दाम्पत्यांनी त्या
काळी केलेल्या त्यागामुळे झाले आहे. त्यामुळे आपण त्यांचा अभिमान बाळगला पाहिजे,'
असे ज. वि. पवार यांनी यावेळी सांगितले. तसेच महात्मा ज्योतिबा फुले
यांच्यावरील कवितेचे सादरीकरण करून त्यातून महात्मा फुलेंचे चरित्र त्यांनी
उपस्थितांसमोर मांडले.
महाराष्ट्र राज्याच्या पुरोगामित्वाच्या जडणघडणीत व
विकासात महाराष्ट्रातील महान व्यक्ती व समाजसुधारकांच्या महत्वाच्या वाटा
राहिलेल्या आहेत. तसेच महाराष्ट्राच्या वैचारिक, सामाजिक,
राजकीय व शैक्षणिक बांधणीत राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या
समाजसुधारकांचे महत्वाचे योगदान असल्याचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी
आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. तसेच या महान व्यक्तींनी लिहिलेले साहित्य,
अभ्यासकाने लिहिलेले साहित्य, त्यांचा जीवनपट,
संघर्ष सामान्य लोकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत
पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने पुनर्मुद्रण
करण्याचे ठरविले आहे. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठही सहभागी असून आज
महात्मा फुले जयंतीदिनी 'महात्मा फुले समग्र वाङ्मय' या पुनर्मुद्रित ग्रंथाचे प्रकाशन सकाळी भिडे
वाड्यात पार पडले असल्याचे कुलगुरूंनी यावेळी सांगितले. याप्रसंगी प्राध्यापक,
शिक्षकेतर सेवक, विविध कर्मचारी व विद्यार्थी
संघटनांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.