नौका मालक आर्थिकदृष्ट्या अडचणीत
ऐन शिमग्यात मासेमारीवर संक्रांत आली आहे. मागील दोन
महिन्यांपासून मासेमारी व्यवसाय कोलमडून गेलेला असताना शिमग्याच्या सणात मच्छीमारांना मासळी मिळत
नसल्याने उपलब्ध मासळीचे दर गगनाला भिडल्याने खवय्यांची पंचाईत झाली आहे. समुद्रात
रोजच्या होणाऱ्या खर्चाइतकीही मासळी मिळत नसल्याने नौका मालक आर्थिकदृष्ट्या फारच
अडचणीत आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला १६७
कि.मी.चा समुद्र किनारा लाभला असून, २ हजार ५२० सागरी मासेमारी नौका आहेत. यातील २ हजार ७४
यांत्रिकी नौका असून, २७५ पर्ससीन नेट
मच्छीमार नौका आहेत. यातील ८० ते ९० टक्के नौका मालकांची आर्थिक स्थिती मासळी
रिपोर्ट नसल्याने कर्जबाजारीपणाची झाली आहे. समुद्रातील वादळी वाऱ्यांमुळे माशांचे
होणारे स्थलांतर आदी कारणांमुळे स्थानिक मच्छीमार नौकांना मासळी मिळत नाही. जी
काही किरकोळ प्रमाणात मासळी मिळत आहे त्याचे दर वधारले आहेत. पापलेट मासा दुर्मिळच
झाला आहे. याचा परिणाम म्हणून मार्केटमधील मासळीचे दर वाढले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रात मासा न मिळण्याची स्थिती
गेल्या दोन महिन्यांपासून आहे तशीच आहे. फिशींगसह पर्ससीन नेट नौकांचीसुद्धा हीच
अवस्था आहे. पर्ससीन नेट नौकांना आठवडाभर मासेमारी करायची झाली तर इंधन, पगार व खलाशांचा इतर किराणा माल आणि आठवड्याच्या
पगाराची रक्कम धरून ४ ते ५ लाख रुपये खर्च येतो. परंतु या आठवडाभरात केवळ ४० ते ५०
हजार रुपयांचीच मासळी मिळत असल्याचे मच्छिमारांनी सांगितले. याचा परिणाम म्हणून
गेल्या पंधरा दिवसांपासून नौका बंदरातच उभ्या ठेवल्या जात आहेत. जो काही मागील
खर्च झाला आहे तो नौका मालकांच्या अंगावर पडत असून, ते कर्जाच्या विळख्यात सापडले आहेत.
मिरकरवाडा बंदरावर दोन महिन्यांपूर्वी ३५० ते ४५० रुपये
किलोने मिळणाऱ्या सुरमईचा दर रविवारी ९०० रुपये प्रतिकिलो होता. सरंगा ३०० रुपये
किलो दराने मिळत होता तो ७०० रुपये किलो दराने विकला जात होता. सौंदाळा १०० रुपये
किलो दराने मिळत होता त्याचे दर २८० रुपये किलो आहेत. बांगडा ८० ते ९० रुपये किलो
दराने होता तो रविवारी १३० रुपये किलो दराने होता. जिल्ह्याच्या समुद्रातील पापलेट
मात्र गायबच होते. जे काही पापलेट विकले जात होते ते पॅकिंगचे किंवा फ्रोझनचे
होते. या पॅकींग पापलेटचा दरही ९०० ते १००० रुपये किलो इतका होता.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.