डॉक्टरांच्या कौशल्यांमुळे तिघा बालकांना मिळाले नवजीवन 

नाशिकमधील लोकमान्य हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी आपल्या कौशल्यांचा वापर करताना गेल्या ३ महिन्यांमध्ये गुंतागुंत व क्लिष्ट आजार असलेल्या तीन बालकांवर यशस्वी उपचार केले आहेत. त्यामुळे बालकांना नवजीवन मिळाले आहे.

२०२१ मध्ये नाशिकमधील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये हृदयरोगशस्त्रक्रिया दालन सुरू झाले. येथे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. नीलेश पुरकर, डॉ. नितीन ठाकरे, डॉ. अभयसिंग वालिया, लहान मुलांचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. ललित लवनकर यांसारखे हृदयशस्त्रक्रिया तज्ज्ञ हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाले. या डॉक्टरांनी बालकांवरील हृदयशस्त्रक्रिया करण्याचे शिवधनुष्य हाती घेतले. गेल्या तीन महिन्यांमध्ये अवघड अशा तीन शस्त्रक्रिया नुकत्याच लोकमान्य हॉस्पिटल येथे यशस्वीरित्या पार पडल्या. पहिल्या घटनेत इगतपुरी तालुक्यातील पाड्यावरील कार्तिकला 'टेट्रालॉजी ऑफ फेलो' (Tetralogy of Fallot) या हृदयाच्या आजाराने ग्रासलेले होते. यामध्ये एकाचवेळी हृदयामध्ये चार गुंतागुंतीचे बदल झालेले असतात. त्याचे प्लेटलेट सुद्धा ३० हजारापेक्षा कमी होते. त्यामुळे मुंबईच्या नामांकित हॉस्पिटलने शस्त्रक्रियेला नकार दिला होता. अशा वेळी डॉ. दत्ता देवकाते यांनी रुग्णाला लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आणले.

लोकमान्य हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया व उपचार केले. आज कार्तिक हसत खेळत सामान्य बालकांप्रमाणे जीवन जगतो आहे.

दुसऱ्या घटनेत नाशिकमधील अमरीन अत्तार या १२ वर्षांच्या बालरुग्णाला 'टोटल अॅनोमॅलस पल्मनरी व्हिनस कनेक्शन' (Total Anomalous Pulmonary Venous Connection - TAPVC) या हृदयाच्या गंभीर आजाराचे निदान झाले. हॉस्पिटलमध्ये डॉ. पुरकर, डॉ. ठाकरे व डॉ. वालिया या तिन्ही शल्यचिकित्सकांनी संयुक्त प्रयत्नांतून तिच्यावर यशस्वी उपचार केले. आज अमरीन स्वस्थ जीवन जगत आहे.

तिसऱ्या घटनेत जुनेरा शेख या ३ महिन्यांच्या व ४ किलो वजनाच्या मुलीला जन्मजात 'टीएपीव्हीसी' आजार होता. ४ किलो वजन आणि आजाराची क्लिष्टतेमुळे डॉक्टरांनी तिला मुंबईला हलविण्याचा सल्ला दिला.

पण आईने डॉक्टरांवर संपूर्ण विश्वास व्यक्त करताना, आम्ही कुठेही जाणार नसून लोकमान्य हॉस्पिटलमध्येच उपचार करावे अशी विनंती केली. त्यांची विनंती विनम्रतेने स्वीकारताना डॉक्टरांनी शस्त्रक्रियेची तयारी केली. त्यासाठी आवश्यक अनेक यंत्रसामग्री मागविली व शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली.

चौथ्या दिवशी मुलीला आईच्या हाती सोपवताना हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचे ऊर भरून आले होते. शल्यचिकित्सकांसोबतच लोकमान्य हॉस्पिटलमध्ये कार्यरत भुलतज्ज्ञ डॉ. नंदा सिन्हा, संजीवनी शास्त्र डॉ. मनोज सुर्वे, सहाय्यक शुभम कस्तुरे, संदेश घाटगे, साक्षी वाल्टे, पवन मेधणे, शिल्पा शेंडे आदींचे मोलाचे सहकार्य मिळाले.


या तिन्ही शस्त्रक्रियांसाठी लागणारा खर्च अमाप होता. शासनाकडून मिळणारे जीवनदायी योजनेचे पैसे तोकडे पडत असल्याने खर्च व अनुदान यांचा ताळमेळ बसत नव्हता. अशा वेळी 'दिल दोस्ती फाऊंडेशन' आणि 'स्वदेस फाउंडेशन' या संस्था हॉस्पिटलच्या मदतीस आल्या. आणि त्यांनी उपचारार्थ हॉस्पिटलला काही निधी उभारुन दिला. बालकांमध्ये असलेले हृदयरोग ही देशासाठी असलेली गंभीर समस्या आहे. त्याच्यावर लागणारे उपचार करण्याचे शिवधनुष्य लोकमान्य हॉस्पिटल उचलू पाहत आहे. त्याबद्दल वैद्यकीय क्षेत्रासह समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून त्यांचे कौतुक होते आहे. अधिकाधिक रुग्णांनी या आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमान्य हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र बोरसे यांनी केले आहे.