लठ्ठ व्हा नाहीतर लाठी
खा... असाही होतोय स्त्रियांवर अत्याचार
आजवरच्या फॅशन
क्षेत्रात अनेक बदल झाले ते स्त्री सौंदर्याला गृहीत धरून. मग त्यात कपड्यांच्या फॅशनपासून
ते आपली त्वचा आणि एकूण शरीरयष्टी कशी ठेवावी या बाबतीत अनेक अभ्यास झाले. त्या
प्रमाणे त्या त्या देशातील वातावरणाप्रमाणे तिथल्या स्त्रियांनी कशा प्रकारे आहार
विहार ठेवावा याचं मार्गदर्शन केलं जातं. यासाठी शेकड्याने वर्तमानपत्र,
नियतकालिके वेगवेगळी प्रसार माध्यमे माहितीचा वर्षाव करत असतात. यात प्रामुख्याने
स्त्रियांनी आपलं वजन नियंत्रणात कसं ठेवावं याविषयी भरभरून माहिती असते. कारण
सध्याच्या कॉर्पोरेट आणि सेमी कॉर्पोरेट क्षेत्रातील बसक्या कामाच्या पद्धतीमुळे
अनेक स्त्री पुरुषांची पोटं सुटू लागली आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जो तो या
माहितीचा मागोवा घेत असतो आणि त्याची येन केन प्रकारेण अंमलबजावणी करत असतो. मात्र
आपल्या पृथ्वीवरील जगात एक देश असा आहे जिथल्या मुली आणि स्त्रिया शक्य तेवढं जाड
होण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करीत असतात. तो देश आहे आफ्रिकेतील मॉरिटानिया.
मॉरिटानिया हा
आफ्रिकेतील ११ वा आणि जगातील २८वा सर्वात मोठा देश आहे. या देशाचा ९० टक्के प्रदेश
सहारा वाळवंटात येतो. ४.३ दशलक्ष लोकसंख्येपैकी जवळपास १० लाख लोक देशाच्या
समशीतोष्ण दक्षिणेकडे राहतात. यातील ९९ टक्के लोक सुन्नी मुसलमान तर १ टक्का लोक
शिया मुसलमान आहेत. नुआकशोत (Nouakchott) हे राजधानीचे शहर असून ते अटलांटिक समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे.
त्यामुळे मासेमारी आणि पर्यटन हा इथला मुख्य व्यवसाय आहे. २००९ मध्ये इथे तेलाच्या
खाणी सापडल्या पण त्यांच्यावर चीनने आक्रमण केल्याने त्या त्यांच्या अखत्यारीत
आहेत. यामुळे इथे सर्व प्रकारची नैसर्गिक सुबत्ता असूनही शिक्षण आणि पैसा या
दोन्हीत हे लोक पिछाडीवर आहेत. शिक्षणाच्या अभावामुळेच की काय इथली सर्वात जुनी
प्रथा म्हणजे मुलींना त्या ६ – ७ वर्षांच्या असल्या पासूनच त्यांना उन्टीणीचं, बकरीचं
दूध आणि खजूर खायला घालून जाड केलं जातं. हे करण्यामागे पुरुषी मानसिकता आहे ते
म्हणजे मुलगी जितकी जाड असेल तितकी ती सुंदर आणि मुलं जन्माला घालण्यास सक्षम असते
अशी इथली मान्यता आहे.
एवढ्या गरिबीत राहताना
सुद्धा इथले लोक मुलींच्या खाण्यापिण्याकडे अजिबात दुर्लक्ष करीत नाहीत. उलट
मुलांना कमी देऊन मुलीना मोठ्या प्रमाणात खाऊ घातले जाते आणि यात या मुलींच्या
आयांचा हात जास्त असतो. या प्रथेला ‘लेब्लो’ असं म्हणतात.
या मुली खाऊन खाऊन
किती खातील असा तुम्हाला प्रश्न पडेल. तर उत्तर वाचून तुमची तहान भूक हरपेल. इथली
एक मुलगी दिवसातून चार वेळा जेवते. खजूर आणि शेंगदाण्यांचं तेलात मिश्रण करून
त्याचे ३०० कॅलरीजचे अंड्याच्या आकाराचे किमान ४० गोळे दिवसाला खाते. सोबत १२
ग्लास उन्टीणीचं, बकरीचं दुध पिते. यामुळे दिवसाला ती १४,००० ते १६,००० कॅलरीजचं
सेवन करते. सर्व साधारणपणे एखाद्या १२ वर्षांच्या निरोगी मुलीने १५०० कॅलरीजचं
सेवन करण्याची शिफारस केली जाते. शिवाय एक प्रौढ पुरुष बॉडीबिल्डर ४००० कॅलरीजचं
सेवन करतो. म्हणजेच या सात आठ वर्षांच्या मुली त्याच्या चार पटीने अन्न खातात.
लग्नासाठी मुलीने पूर्ण
तयार व्हावं म्हणून तिला लेब्लोहची प्रथा सहन करण्यासाठी अटार या निर्जन ठिकाणी
पाठवण्यात येतं. इथे श्रीमंत पालक आपल्या मुलीला प्रशिक्षित करण्यासाठी १५५ डॉलर्स
एवढा खर्च देखील करतात. या प्रशिक्षण केंद्रात या मुलीने खाण्यास नकार दिला तर
तिला भयंकर शिक्षा केली जाते. यातील एक म्हणजे ‘झायार’. या प्रकारात तिच्या
पायाच्या बोटांच्या दोन्ही बाजूच्या भागात काड्या अडकवून पाय आक्रसले जातात.
यामुळे मुलीला प्रचंड वेदना होऊन ती आपल्या इच्छेविरुद्ध खाऊ लागते. अशा प्रकारे या
केंद्रात या मुली लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी मानसिक आणि शारीरिक रित्या तयार
होतात.
हे सगळं करण्याचं कारण
एकच. जाडी मुलगी पाहून तिच्या लग्नाच्या वेळी, आम्ही खाते पिते खानदानातील आहोत असं
वरपक्षाला पटेल आणि ते लग्नाला तयार होतील. बारीक, सडपातळ मुलीचं लग्न होऊ शकत नसल्याने
ती घराण्याला अभिशाप असल्याचं मानलं जातं. घरातील मुलगी उजवणे हा या सर्व प्रकाराचा
उद्देश आणि त्यासाठी मुलीला एवढं खाऊ घालणं ही कुटुंबियांसाठी एक गुंतवणूक असते. असा
खर्च, अशी गुंतवणूक करायला लागू नये म्हणून मुलीचा जन्मच नाकारण्याची अमानवी पद्धत
अजून तरी इथे रुळली नाही याचं कारण हा मुस्लीम देश असल्याने जन्माला येणारं
प्रत्येक मूल ही ईश्वराची देणगी आहे, असं मानलं जातं. अशा खाण्यामुळे मुली थोराड
दिसायला लागून त्यांचं लग्न वयात येण्या आधी देखील लावले जातात. यामुळे संभोग,
गर्भधारणा आणि प्रसूती दरम्यान मुलींना मोठ्या गुंतागुंतीला आणि वेदनेला सामोरं
जावं लागतं.
आरोग्याच्या क्षेत्रात
जगभरात होत असलेल्या उलाढालींचं वारं मॉरिटानियातही पसरू लागलं तो काळ होता २००३चा.
कोणालाही सक्तीने आहार देणं हे नीतिमत्तेत बसणारं नाही अशी लोकांची धारणा होऊ
लागली होती. जरी या इस्लामिक प्रजासत्ताकात लेब्लो कधीही बेकायदेशीर ठरले नसले तरी, २००३ मध्ये सरकारने बाल शोषणाविरूद्ध लढा
देण्यासाठी आणि लठ्ठपणाच्या आरोग्याच्या जोखमींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी
मोहीम सुरू केली होती. शिवाय, पाश्चात्य फॅशनपासून नायजेरियन
पॉप संगीत आणि फ्रेंच टीव्हीपर्यंतचे वैविध्यपूर्ण जागतिक प्रभाव हळूहळू
जनतेपर्यंत पोहोचल्यामुळे, राजधानी नुआकशोत सारख्या शहरातील
तरुणी त्यांच्या मोठाल्या कपड्यांच्या आत सडपातळ होऊ लागल्या होत्या. परंतु
डिसेंबर २००७ मध्ये, अल कायदाच्या उत्तर आफ्रिकन विंगशी
संशयित संबंध असलेल्या बंदूकधाऱ्यांनी राजधानीजवळ चार फ्रेंच पर्यटकांची हत्या
केली तेव्हा वारं माघारी फिरलं. प्रगती थांबली आणि पर्यटन, परदेशी गुंतवणूक कमी
झाली. त्यानंतर, ऑगस्ट २००८ मध्ये, एका
लष्करी बंडाने लोकशाही सरकार उपटून टाकले आणि अमानवी परंपरेचे समर्थन करून ती
पुन्हा प्रस्थापित केली गेली.
असा अंदाज आहे की राजधानी
नुआकशोत पासून २५० मैल अंतरावर असलेल्या अटार, या व्यावसायिक केंद्राच्या आसपास, सक्तीने आहार
घेणाऱ्या मुलींचे प्रमाण ८० टक्क्यांहून अधिक झाले आहे. २००८ च्या सत्तापालटाच्या
आधीच्या सरकारी आकडेवारीनुसार ग्रामीण भागात हा दर ५० ते ६० टक्के आणि शहरांमध्ये २०
ते ३० टक्के होता.
२००१ मध्ये केलेल्या एका सरकारी सर्वेक्षणात असं आढळून आलं की १५ ते ४९ वयोगटातील प्रत्येक पाच
महिलांनी लेब्लोचे अनुकरण केले आहे. या सर्वेक्षणात आढळलं आहे की त्यापैकी ७० टक्के
महिलांना या प्रकारचा पश्चात्ताप झालेला नाही. कारण बारीक मुलींच्या वैवाहिक
भविष्याबद्दल काळजी असते. जाड मुलींच्या बाबतीत हा प्रश्न निर्माण होत नाही. आज मॉरिटानियातील
स्त्रियांचे लठ्ठत्व फक्त योग्य मानले जात नाही तर ती विवाहपूर्व अट देखील मानली
जाते.
- विनिशा धामणकर
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.